महाराष्ट्राचे मानचिन्ह - शेकरू


संडेच्या सुटीचा मूड. मस्त ताणून दिलेली. मोबाईलची ट्रिंग ट्रिंग वाजल्याने साखरझोप डिस्टर्ब झाली. मित्र बोलू लागला. ''फार बोअर झालोय यार. कुठेतरी जंगलात जाऊ भटकायला... येतोस का?'' जंगल हा माझा एकदम विकपॉईंट! झोपेतच मित्राला ग्रीन सिग्नल दिला. उठलो. फटाफट उरकले. गरजेचं सामान घेतले. बाईकला किक मारली. निघालो... कुठे जायचे, ते काही ठरवले नव्हते.

''तू शेकरू पाहिलंस का रे?'' मी मित्राला विचारले. ''नाही यार दोन-तीनदा जाऊनही काही उपयोग झाला नाही. त्याबाबतीत मी फार अनलकी आहे.'' मोर्चा तोलारखिंडीच्या दिशेने वळवला. अकोलेहून दीड तासात तोलारखिंड गाठली. सकाळची वेळ. कोवळे उन पडलेले. निसर्ग मस्त खुललेला. ताजा टवटवीत अनुभव. कोथळे नामक आदिवासी खेड्यात बाईक उभी केली. वाट तुडवायला सुरुवात केली. एव्हाना जंगल जागे झालेले. पाखरांची किलबिल कानाला-मनाला आनंद देते होती. दूरच्या निर्झारांचे गाणे ऐकू येत होते.

घनदाट म्हणावे असे जंगल. झाडांच्या अगणित फांद्या एकात एक गुंतलेल्या. सूर्यप्रकाशाचे कवडसे तेवढे जमिनीवर येत होते. इतक्यात एका हालचालीची चाहूल लागली. आम्ही जागेवर थबकलो. पाहतो तर वानरांची टोळी झाडांच्या फांद्यांना झोके घेत होती. ज्यासाठी आलो होतो ते शेकरू दिसेना. मित्र उतावळा झाला.

आम्ही पावले हळुवार टाकत तोलारकडे चाललो. माळशेज घाटाच्या दिशेने. माणसाची साधी चाहूलही शेकरूच्या लगेच लक्षात येते. इतका तो संवेदनशील आहे.

इतक्यात एक निराळा आवाज कानावर पडला. जागेवर शांत उभे राहून कानोसा घेतला. एका झाडाच्या टॉपला मोठ्ठ्या खारुताईसारखी आकृती दिसली. मी कॅमेरा घेऊन अटेंशनमध्ये! आनंदभराने मित्र ओरडणार... मी खुणेनेच त्याला शांत केले. नजरेची पापणी लवायच्या आत या फांदीवरुन त्या फांदीवर टुणकन उड्या मारत शेकरू त्यााच्या घरट्यात जाऊन बसले!

मित्र शेकरू पाहायला मिळाल्याच्या आनंदाने नाचत होता! शेकरू ही खारींची प्रजात आहे. शेकरू महाराष्ट्र राज्याचा मानचिन्ह असलेला प्राणी म्हणून ओळखला जातो. इंग्रजीत त्याला इंडियन जायंट स्क्विरल म्हणतात. वेगवेगळ्या प्रदेशांतील शेकरूंचा रंग बदलत जात असल्‍याचे निदर्शनास येते. तो लाजाळू प्राणी म्‍हणून ओळखला जातो. ती मोठी खार पानगळतीच्या जंगलात माडत, किंदळ, उंबर यांसारख्या झाडांवर हमखास दिसते. जंगलतोडीमुळे तिचा नैसर्गिक अधिवास संकटात सापडला आहे. शेकरू राज्यात भीमाशंकर, फणसाड, आजोबा डोंगररांगा, माहुली, वासोटा, मेळघाट, ताडोबा, पश्चिम घाटात सिंधुदुर्ग ते नाशिक या परिसरातील निमसदाहरित वने, तसेच विदर्भात गडचिरोली वनविभागाच्या आलापल्ली आणि सिरोंचा भाग या प्रदेशात आढळते. भीमाशंकरच्या जंगलात भीमाशंकरी ही राज्यातील इतर शेकरूपेक्षा वेगळी जात सापडते. शेकरू एकेकाळी गोव्‍यातील सधन जंगलांचे वैशिष्‍ट्य समजले जात असे.

शेकरू शेपटीसह मीटरभर लांब असते. तिचे वजन दोन ते अडीच किलोपर्यंत असते. तिचे डोळे गुंजीसारखे लालभडक असतात. चंद्रपूर, गडचिरोली, दांडेली यांसारख्‍या उष्णता अधिक असलेल्या भागातील शेकरुंच्या कातड्याचा रंग गडद असल्‍याचे आढळले आहे. तशाच रंगाचे शेकरूू सावंतवाडी येथे आढळले आहेत. विदर्भातील शेकरुंच्या रंगापेक्षा भीमाशंकरच्या शेकरुंच्‍या शरिराच्‍या वरच्या बाजूचा रंग गडद असतो. याहीपेक्षा गडद रंगाच्या कातड्याचे शेकरु सावंतवाडीत आढळले आहेत. शेकरूची शेपटी शरीरापेक्षा लांब आणि झुपकेदार असते. तिला तोल सांभाळण्यासाठी शेपटीचा उपयोग होतो. पाठ तपकिरी, पिवळसर-पांढरा गळा, छाती, पोट, तोंडावर रुबाबदार लांब मिशा, लांब सुळ्यासारखे दात, पायाला टोकदार वाकडी नखे असल्याने तिला कितीही उंच झाडावर सरसर चढता येते; एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर वेगाने पळता येते. उंबरे, जांभळे, करवंदे, रानआंबे आणि इतर विविध प्रकारची फळे शेकरूचे खाद्य. फळे नाही मिळाली तर ती झाडांची हिरवी साल कुरतडून खाते. रानफुलांतील मधुररस तिच्या विशेष आवडीचा. फळे खाऊन त्यांच्या विष्ठेतून बियांचे कठीण कवच निघून गेल्याने तशा बिया लवकर रुजतात. त्यांची रोपटी वेगाने वाढून झाडे होतात. शेकरू जंगलवाढीसाठी मदत करते.

भारतात जायंट स्क्विरल प्रजातीच्या सात उपजाती आढळतात. पैकी 'राटूफा इंडिका' (RATUFA INDICA) ही उपजात फक्त महाराष्ट्रात आढळते. शेकरू वर्षातून एकदाच डिसेंबर-जानेवारीमध्ये पिलाला जन्म देते. एक शेकरू सहा ते आठ घरे तयार करते. एका झाडावरुन दुस-या झाडावर सहज झेप घेणारी शेकरू पंधरा ते वीस फुटांची लांब उडी मारू शकते. शेकरू डहाळी व पाने वापरून गोलाकार आकाराचे घरटे शेकरू बनवते. घरटे बारीक फांद्यांवर बांधलेले असते, जेथे अवजड परभक्षी पोचू शकत नाही. शेकरू एकाच झाडावर सहा ते आठ घरटी बांधतात. सतत घरटी बदलत राहिल्याने शेकरू सहजासहजी शत्रूच्या हाती लागत नाही!

महाबळेश्‍वरमध्‍ये 2015 साली शेकरूच्‍या दोन नव्‍या जातींची नोंद करण्‍यात आली आहे. महाबळेश्वरमधील लिंगमळा परिसरात संपूर्ण शरीर पांढऱ्या रंगाचे असलेले (अल्बिनो) शेकरु आढळले. या शेकरुंचा पांढरा रंग शरीरात मेलॅनिन द्रव्याची कमतरता असल्यामुळे आलेला असतो. या शेकरुंचे डोळे गुलाबीसर आहेत. महाबळेश्वरमध्ये डोळे, नाक आणि पाय सोडून उर्वरित शरीर पांढऱ्या रंगाचे असलेल्या शेकरुंचीही नोंद झाली आहे. त्या शेकरुंची गणना 'ल्युसिझम' या वर्गात करण्‍यात येते. त्यांचा पांढरा रंग मेलॅनिन नसल्यामुळे नव्हे, तर जनुकीय बदलामुळे असावा असा अंदाज मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये यांनी व्‍यक्‍त केला आहे. महाराष्‍ट्रात 2015 साली करण्‍यात आलेल्या शेकरूंच्‍या गणनेमध्‍ये शेकरूंची 19,769 घरी आढळली. त्यावरुन राज्यात ३३०० शेकरु असल्याचा वन विभागाचा अंदाज आहे. त्‍यातील १०७८ शेकरु गणना करताना प्रत्यक्ष दृष्टीस पडले आहेत. प्रत्येक शेकरु आपल्या परिसरात सहा ते आठ घरटी बांधत असल्यामुळे एकूण घरट्यांच्या संख्येला सहाने भागून शेकरुंची अंदाजे संख्या काढली जाते.

पुणे व पिंपरी-चिंचवड येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य क्रीडा स्पर्धा १९९५ चे शेकरू हे शुभंकर होते. कोल्‍हापूर वनविभागाचे मुख्‍य वनसंरक्षक एम. के. राव आणि वन्‍यजीव अभ्‍यासक डॉ. रेने बोर्जिस यांनी एकत्रितपणे शेकरू प्राण्‍यावर केलेल्‍या लेखनाचे पुस्‍तक प्रसिद्ध झाले आहे.  

- भाऊ चासकर

लेखी अभिप्राय

सिंधुदूर्ग जिल्ह्यातही शेकरू मोठ्या प्रमाणावर आढळते. ब-याचदा नारळाच्या झाडावर असते. शेकराला नारळ फार आवडतात. त्याचे दात अणकुचीदार असतात त्यामुळे ते अख्खा नारळ फोडून सहज खाऊ शकते. इथे अनेकदा शेकराची शिकारही करतात व त्याचे मटण खायला म्हणे खूप चविष्ट असते.

विनय सामंत08/07/2015

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.