क-हाडचा पंतप्रतिनिधींचा भुईकोट


क-हाडला बहामनी राजवटीत (हे दक्षिणेतील सुलतान घराणे.) मोठा भुईकोट (जमिनीवरील किल्‍ला) बांधला गेला. तो एकेकाळी क-हाडचा किल्ला म्हणून ओळखला जात असे. शहराच्या वायव्य दिशेकडे सुमारे चौ-याऐंशी चौरस मीटर क्षेत्रावर उंच जागी त्या किल्ल्याचे काही अवशेष (नाममात्र) आहेत. किल्ला थोरल्या शाहू महाराजांच्या राजवटीत प्रतिनिधींच्या (राजाच्‍या गैरहजेरीत कारभार पाहणारा.) ताब्यात गेला. किल्ल्याचे दोन बुरूज त्यांचे अस्तित्व कसे तरी टिकवून उभे आहेत. तटबंदीचे अवशेष चारही बाजूंस भग्नावस्थेत आहेत. किल्ल्यातील प्रतिनिधींचा वाडा पूर्णपणे उद्धस्त झालेला आहे. सातारा जिल्हा गॅझेटियरमध्ये (1999) त्याचे वर्णन लिहिलेले दिसते. त्या वेळी मुख्य प्रवेशद्वार आणि त्यास घट्ट पकडून ठेवणा-या दोन बुरुजांचे अवशेष ब-यापैकी शिल्लक होते. तो किल्ला चौरस आकाराचा व ईशान्येकडे थोडा पुढे आलेला होता. किल्ल्याला अठरा बुरूज होते. दगडमातीच्या तटबंदीला जंग्या (कोटाच्‍या किंवा किल्‍ल्‍याच्‍या तटबंदीत ठिकठिकाणी ठेवलेली छिद्रे. त्‍यातून पूर्वी दगडांचा आणि तयानंतरच्‍या काळात बंदूकीचा मारा केला जात असे.) होत्या. भोवताली सुमारे दोन मीटर खोलीचा खंदक होता. कोयना नदीच्या पात्रातून, चौदा ते तीस मीटर उंचीवर किल्ला एके काळी भुईकोटांचा जणू राजा दिसे. त्या क-हाडच्या भूमीवर राज्य करणा-या चालुक्य, राष्ट्रकूट, शीलाहार यांनी राज्य केले. त्या मंडळींनी तो वापरला असावा.

किल्ल्यातील प्रतिनिधींचा वाडा म्हणजे मराठाकालीन वास्तुशैलीचे अप्रतिम उदाहरण आहे. वाड्याच्या दक्षिणेस 259|| मीटर लांब-रूंद व 4 मीटर उंच असा दरबार हॉल होता. त्याच्या दोन्ही बाजूंस दोन स्वतंत्र दालने होती व पूर्वेस भवानीदेवीची छत्री. ते मंदिर पाहण्यास मिळू शकते. मंदिरातील मूर्तीचे मूळ अधिष्ठान हे तेराव्या शतकातील असावे. दरबाराच्या तक्तपोशीवर जाळीदार नक्षीकाम होते. परशुराम निवास प्रतिनिधींच्या मातोश्री काशीबाई यांनी या वास्तूच्या बांधकामास 1800 च्या सुमारास सुरुवात केली व वडिलांनी ते काम पूर्ण केले. किल्ल्याच्या परिसरात स्लॅबची घरे आहेत. कालांतराने किल्ला तेथे होता का, हा प्रश्न उभा राहील! कोयना पात्रालगतची तटबंदी 1875 च्या महापुरात नष्ट झाली असावी.

किल्ल्यात अप्रतिम अशी पायविहीर आहे. तिला ‘नकट्या रावळाची विहीर’ असे म्हणतात. ती कोटाच्या पश्चिम टोकाला, कोयनेच्या पात्रापासून सुमारे पंच्याहत्तर फूट उंचीवर आहे. विहिरीची लांबी 120 × 90 फूट आहे. विहिरीत उतरण्यासाठी पा-यांच्या चोहो बाजूंनी मार्ग असून वरून बारवेचा आकार सुरेख दिसतो. मुख्य विहीर अकराशे अकरा चौरस मीटरची आहे. तिच्या ईशान्य बाजूचा भाग थोडा गोलाकार दिसतो. एकूण ब्याऐंशी पाय-या असून प्रत्येक वीस पाय-या संपल्यावर मोठी पायरी म्हणजे (Landing) थांबण्याची जागा आढळते. पाय-यांच्या अखेरीस दोन दगडी खांब असून त्यावर सुरेख कमान दिसते. विहिरीचे बांधकाम रेखीव अशा चि-यांचे आहे. ते चुन्यातून घट्ट केले आहे. बांधकामामध्ये ठरावीक अंतरावर खाचा दिसतात. विहीर केंद्रीय पुरातत्त्व खात्याने संरक्षित स्मारक म्हणून ठरवली आहे. विहिरीत खापरी पाटामार्फत (भाजलेल्‍या मातीचा पाईप किंवा पाट) कोयनेचे पाणी सोडले जात असावे. त्यामुळे तिची खोली कोयनेच्या पात्राइतकी असावी. अनेक मजल्यांच्या विहिरीचा उपयोग पाणीपुरवठ्यासाठी किंवा वस्तूंच्या साठ्यासाठी करत असावेत असे सातारा गॅझेटियर म्हणते.

बहामनीच्या अलि अदिलशहा याची सत्ता क-हाडवर 1558-1580 या कालखंडात होती. त्या कालखंडात उपरोक्त कोट बांधला गेला असावा. विजापूरचा सुलतान महंमद अदिलशहाने शहाजीराजांना क-हाड प्रांतातील बावीस गावांची देशमुखी दिली होती. ती मुधोळकर बाजी घोरपडे यांना 1653 मध्ये देण्यात आली. विजापूरचा अली अदिलशहा-दुसरा जानेवारी 1661 मध्ये सैन्यासह क-हाडमध्ये थांबला होता. औरंगजेबाने क-हाडजवळील ‘वसंतगड’ हा किल्ला 1699 मध्ये जिंकला. त्या वेळी क-हाड हे स्थान परगण्याचे मुख्यालय म्हणून होते. मोगलांचा सरदार पडदुल्ला खान हा 1771 मध्ये कोटात राहत असे. त्याला शाहू छत्रपतींनी बाळाजी विश्वनाथ यांच्या साहाय्याने घालवून दिले. त्यानंतर शाहू महाराजांच्या कारकिर्दीत, क-हाड प्रांत मराठ्यांच्याकडे आला. त्या वेळी पंतप्रतिनिधी यांनी त्यांचा कारभार उपरोक्त कोटातून चालू केला. त्यानंतर प्रतिनिधींनी त्या कोटात दरबार हॉल बांधला असावा. दुस-या बाजीरावाने श्रीनिवास प्रतिनिधी यांच्याकडून क-हाड घेण्याचा कट 1805 मध्ये  केला होता. दुसरा बाजीराव पेशवा व दौलतराव शिंदे यांनी 1805 च्या सुमारास परशुरामपंत श्रीनिवास प्रतिनिधी यांना पकडण्याचा बेत केला होता. तेव्हा त्यांना चुकवून पुण्याहून प्रतिनिधी क-हाडला पळून आले. ब्रिटिशांनी क-हाडचा मोबदला देऊन कोट त्यांच्या ताब्यात ठेवला तो 1852 साली. प्रतिनिधींची कचेरी कोटात 1889 पर्यंत होती. कृष्णा नदीला 1844 मध्ये आलेल्या पुरात किल्ल्याच्या भिंतींच्या वर वीस फूट उंच पाणी होते. त्या वेळी कोटाची वायव्येकडील तटबंदी वाहून गेली. कचेरी1889 नंतर कुंडलला हलवण्यात आली.

- डॉ. सदाशिव शिवदे
(छायाचित्र - सदाशिव शिवदे)

Last Updated On - 31st July 2016

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.