हळदुगे येथील फुलपाखरांची शाळा


मुले ही फुलपाखरे, निरनिराळ्या विषयांचे वर्ग म्हणजे ही फुले, त्या वर्गात उपस्थित असणारे शिक्षक हे ज्ञानरूपी मकरंदाचे साठे आणि त्यांच्याकडील मकरंद म्हणजे ज्ञानरस. तो मुलांनी ग्रहण करायचा. एका वर्गातून दुसऱ्या वर्गात बागडणारे तसे बाल्य पाहायचे असेल तर हळदुगे गावात ‘अॅड. दिलीपराव सोपल माध्यमिक शाळे’त चला. ते गाव सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यात आहे.

ह्या छान कल्पनेला प्रत्यक्षात आणणारे शिक्षक आहेत प्रणित साहेबराव देशमुख. ते सोलापूर जिल्ह्यातील सर्वांत तरुण मुख्याध्यापक आहेत. त्यांनी वयाच्या पस्तिशीतच शाळेला प्रगतिपथावर नेले आहे. ते ‘यशदा’ पुणे ह्या संस्थेच्या ‘मुख्याध्यापक प्रशिक्षण कार्यक्रमा’चे तज्ज्ञ मार्गदर्शकही आहेत.

त्यांनी अंमलात आणलेला हा ‘बटरफ्लाय पॅटर्न ऑफ लर्निंग’ त्यांना कसा सुचला? ह्या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले, “विज्ञान विषय शिकवताना वर्गात प्रयोग दाखवणे शक्य नसे. प्रयोग वाचून दाखवावे लागत. सर्व प्रयोग प्रयोगशाळेत जाऊन करणेही शक्य नसे. त्यावर उपाय म्हणून ठरवले, की प्रयोगशाळेचाच वर्ग करायचा.”

ती कल्पना प्रत्यक्षात कशी आली ते खूप मनोरंजक आणि उद्बोधकही आहे. हळदुगे हे हजार-दीड हजार वस्तीचे छोटेसे गाव आहे. तेथे ही माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आहे. तो पॅटर्न माध्यमिक वर्गांसाठी म्हणजे पाचवी ते दहावीच्या वर्गांसाठी राबवला जातो. शाळेच्या इमारतीत चौदा खोल्या आहेत, पण पाचवी ते दहावीच्या सहा वर्गांना सहाच खोल्या पुरेशा होतात. प्रत्येक वर्गात साधारण तीस विद्यार्थी आहेत. ते विद्यार्थी सहा वर्गांत, सहा विषयांच्या तासांना, त्या त्या विषयाच्या वर्गात उपस्थित असलेल्या सहा शिक्षिकांकडे शिस्तीत स्थलांतर करतात. प्रत्येक तासिका चाळीस मिनिटांची असते, पण येथे ह्या वर्गातून त्या वर्गात स्थलांतर होताना मुलांना तीन मिनिटेच लागतात. शिस्तीत होणाऱ्या त्या स्थलांतराने मुले प्रफुल्लित होतात.

प्रत्येक सुसज्ज वर्गात त्या विषयांचे शिक्षक वाट पाहत असतात. सुसज्ज म्हणजे काय तर विज्ञानाच्या वर्गात प्रयोग करण्यासाठी लागणारे साहित्य हजर असते. वर्गांची रचना अशी, की मध्यभागी टेबल, सभोवताली बाके मांडलेली - जेणेकरून टेबलावर दाखवलेला प्रयोग सर्वांना दिसावा. प्रयोग मुले करतात. मुलांचे गट असतात. एकेक गट धड्याचा एकेक भाग वाचून, त्यांना झालेले आकलन, उरलेल्या गटांना सांगतात. त्यांच्या आकलनात असलेल्या त्रुटी, शंका, कमतरता  देशमुखसर भरून काढतात. असा प्रत्येक धडा प्रयोग करत संपन्न होतो. इतर विषयांचे वर्गही त्या त्या विषयांच्या मागण्या पूर्ण करणाऱ्या गोष्टींनी परिपूर्ण करण्याकडे कटाक्ष आहे. भूगोलाच्या वर्गात नकाशे, गणिताच्या वर्गात तक्ते असतात. बहुतेक गोष्टी शिक्षकच तयार करतात. बाजारात उपलब्ध असलेले तयार साहित्यही खरेदी केले जाते. बसण्याची व्यवस्था प्रत्येक वर्गात अभिनव म्हणजे चर्चा करण्यासाठी समोरासमोर बाक ठेवली जातात.

ह्या सगळ्याचा फायदा असा, की मुले शाळेत कंटाळत नाहीत. आपोआप त्या त्या विषयाची वातावरणनिर्मिती होते. स्वअध्ययन, गटचर्चा ह्यांमुळे जास्त आकलन होते, ज्ञानार्जन होते. मुलांनी त्यांना काय हवे, काय शिकायचे आहे, काय शंका आहेत हे जाणून त्या त्या विषयाच्या शिक्षकांची तयारी होत असते. शाळेत चित्रकला आणि कार्यानुभव यांच्यासाठी दोन स्वतंत्र दालने आहेत. नेमून दिलेला अभ्यासक्रम पूर्ण होतोच आणि परीक्षाही नेहमीप्रमाणे पार पडतात.

तर अशा या अभ्यासाच्या फुलपाखरी पॅटर्नबरोबर विद्यार्थ्यांचा सर्वंकश विकास व्हावा म्हणून इतरही प्रकल्प आहेत. मोबाईल प्रोजेक्टरचा वापर, विज्ञान प्रदर्शन, संगीतमय प्रार्थना, समूहगीते, शालेय गणेशोत्सव, व्याख्यानमालेचे आयोजन इत्यादी उपक्रम चालू असतात. शाळेचे स्वतंत्र सभागृह आहे, मैदान आहे. शाळेचे विद्यार्थी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा आणि विज्ञान प्रदर्शनांत अव्वल स्थानावर असतात.

ह्या विशेष शाळेचे मुख्याध्यापक प्रणित देशमुखही ‘विशेष’आहेत. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी त्यांची धडपड चालू असते. ते स्वत: नवनवीन संकल्पना, प्रयोग प्रत्यक्षात आणण्यासाठी कष्ट करतात. शालेय प्रार्थना पेटीच्या (हार्मोनियम) साथीने होण्यासाठी ते स्वत: पेटी वाजवायला शिकले. रक्तदान ही कृतिशिलता तर श्रमसंस्कार, जलसंधारण मोहीम, गावातील तंटामुक्ती समिती ह्या सर्व गोष्टींत सक्रिय सहभाग हे त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे आणखी काही आयाम आहेत. ते ‘यशदा’ संस्थेने मला घडवले आहे असे नमूद करतात.

“मी माणसांना सकारात्मक विचार करायला लावतो. निराशा आशेमध्ये बदलवतो” असे ते आत्मविश्वासाने सांगतात. त्यांची ही सकारात्मक ऊर्जा त्यांच्या यशाचे रहस्य आहे. त्यांच्या सहचारिणीही शिक्षिका आहेत. त्यांनी ‘सर’ ही शॉर्ट फिल्म तयार केली आहे आणि ते शाळेसंदर्भातच अजून एक पूर्ण लांबीची फिल्म बनवत आहेत.

त्यांच्या शाळेला अनेक उत्साही मंडळींनी भेट दिली आहे, पण अजूनही कोणाचा उत्साह कृतीत परिवर्तित झालेला नाही.

- ज्योती शेट्ये

Updated On - 3 Mar 2016
 

लेखी अभिप्राय

Good very nice. ...

Shivajirao paw…15/04/2015

Khup sundar aasa ha upakram aahe.

vijay kakade15/04/2015

Khupach chhan very good. your welcome.

Karya adhaksa …16/04/2015

Abhinandan Deshamukh Sir !!!
Pudhil karyasathi khup khup shubhechya!

B.G.Kulkarni( H.M)16/04/2015

छान खुपच छान, देशमुखसर आपले मनापासून अभिनंदन आणि तुमच्या पुढील कार्यास खुप सा-या शुभेच्छा

श्री. सोनवणे स…18/04/2015

pawar sir kakade sir kulkurni sir sonavane sir thanks

अज्ञात28/04/2015

Very nice deshmukh sir...
Tumcha ha butterfly pattern pratyek school madhye rabvala java yasathi tumche kay praytn ahet he pn sanga.

patil shital 27/09/2015

देशमुख सर , खूपच छान उपक्रम !! आपले अभिनंदन!!

विजयकुमार दगडू पाटील09/09/2016

Deshmukh sar , congrats

vijaykumar patil09/09/2016

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.