दीपमाळ - महाराष्ट्रीय शिल्पप्रकारदीपमाळ हा महाराष्ट्रीय शिल्पप्रकार आहे. महाराष्ट्रातील मंदिरांसमोर तसेच देवांच्या मूर्तीसमोर दिवे लावण्यासाठी जे दगडी स्तंभ उभारलेले असतात, त्यांना दीपमाळा असे म्हणतात. दीपमाळ दहा फुटांपेक्षा अधिक उंच असते. त्यांचा आकार गोल, षटकोनी किंवा अष्टकोनी असतो. तो वर निमुळता होत गेलेला असतो. दिवे लावण्यांसाठी त्यांना खालपासून वरपर्यंत क्रमाने लहान कोनाडे अथवा पायऱ्या केलेल्या असतात.

उत्सवप्रसंगी शहरात दीपवृक्ष पाजळत असल्याचे उल्लेख रामायणासारख्या ग्रंथात आलेले आहेत. दक्षिण भारतातील मंदिरांत दगडाच्या व पंचधातूच्या दीपलक्ष्मी व दिव्यांची झाडे असतात, तसेच देवालयांसमोर दीपदंड किंवा दीपस्तंभ असतात. पण दीपमाळ हे महाराष्ट्रीय मंदिरशिल्पाचे वैशिष्ट्य म्हणता येईल. विटांचा वा दगडांचा वर निमुळता होत जाणारा स्तंभ उभारून त्याच्यात ओळीने हात (लहान कोनाडे अथवा पाय-या) बसवलेले असतात. त्या हातांवर व स्तंभाच्या माथ्यावर पणत्या ठेवण्यात येतात. उत्सवप्रसंगी, दिवाळीच्या वेळी, त्रिपुरी पौर्णिमेला दीपमाळा दिव्यांनी उजळण्यात येतात. नवस फेडण्यासाठी देवळासमोर दीपमाळ उभारण्याची प्रथा मराठेशाहीत रूढ होती. विशेषतः जेजुरीला खंडोबाच्या मंदिराच्या टेकडीवर साडेतीनशे दीपमाळा त्यासाठी उभारलेल्या आहेत.

देवळासमोर सव्‍वीस हात उंचीचा दगडी स्तंभ उभारून त्यावर कापूर व ज्वालाग्राही पदार्थ जाळून आरास करावी असे पुराणात म्हटले आहे. असे स्तंभ प्राधान्याने शिवालयासमोर असत आणि ते शिवरूप समजले जात.

यादवकाळापर्यंतच्या मंदिरशिल्पात दीपमाळा आढळत नाहीत. इसवी सनाच्या तेराव्या  शतकानंतर मुसलमानांच्या मिनार – शिल्पाच्या अनुकरणातून प्राचीन दीपस्तंभांना व दीपवृक्षांना दीपमाळेचे स्वरूप लाभले असावे असा शिल्पकलेतील तज्ज्ञांचा कयास आहे.

पेशवेपूर्वकाळातील बहुतेक दीपमाळा दगडी आहेत. पेशवाईत दगडी दीपमाळांबरोबरच विटांच्या दीपमाळाही बांधल्या गेल्या. त्यांची रचना मिनारांसारखी आहे. म्हणजे त्या आतून पोकळ असून, त्या पोकळीत वर जाण्या‍साठी नागमोडी जिना असतो. अशा दोन दीपमाळा बीड येथे खंडोबाच्या मंदिरासमोर चांगल्या स्थितीत उभ्या आहेत.

मंदिरासमोर दीपमाळा बांधणे हे पुण्यकृत समजले जाई.

- आशुतोष गोडबोले

(आधार - भारतीय संस्कृतिकोश, खंड चौथा)

लेखी अभिप्राय

फारच उपयुक्त माहिती आहे ही.

मधुसूदन थत्ते29/09/2015

Mast

Bhushan29/08/2016

भारतीय संस्कृती जाेपासणारी माहिती.

अजय टाले 29/08/2016

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.