एका जिद्दीचा जलप्रवास - उमेश गोडसे


अंध विश्वासापोटी लहानपणीच हात गमावला जाऊनदेखील उमेद न हारता अकलूजच्या उमेश गोडसे यांनी जलतरण स्पर्धेत काही विक्रम केले व अनेक पुरस्कार मिळवले. उमेश गोडसे यांचा जन्म अकलूजच्या यशवंतनगरमधील. वडील श्रीमंत गोडसे यांचा व्यवसाय शेती. आई अंजना. त्या घर सांभाळून वडिलांना शेत कामात मदत करत. उमेश यांना एक भाऊ व एक बहीण असे पाच जणांचे कुटुंब. केवळ शेतीच्या उत्पन्नावर अवलंबून.

उमेश पहिलीत असतानाची गोष्ट. घरात ज्वारीबाजरीची पोती रचून ठेवलेली होती. ते पोत्यांवर खेळताना पोत्यावरून खाली पडले. त्यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली. हात हलवता येईना. वडील-आजोबा त्यांना घेऊन अकलूजला डॉक्टरांकडे निघाले. स्टँडवर एसटीची वाट पाहत थांबले होते. तेव्हा ओळखीची एक व्यक्ती तेथे आली. एवढ्यासाठी डॉक्टरकडे जायची गरज काय, म्हणत त्यांनीच गावठी उपचार करायची तयारी दर्शवली. हात बांबूच्या काटक्या नि कसलासा लेप लावून कापडाने बांधला. आठ दिवसांनी हाताला बांधलेले कापड काढले. हात पूर्ण खराब झाला होता. घरच्यांना काही सुचेना. उमेशना डॉक्टरांकडे नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यावर काहीच उपचार शक्य नसल्याचे सांगितले.

घरातील मंडळी हताश झाली. उमेश म्हणतात, मला तेव्हा कधी मी अधू असल्याचे जाणवले नाही आणि आताही कधी जाणवत नाही. मी स्वतःला अपंग मानतच नाही. कारण एक हात नसल्याने माझे कोणतेच काम कधी अडलेले नाही. अगदी स्वतःला आरशात पाहतो, तेव्हाही त्याची जाणीव होत नाही.

त्यांचे शालेय जीवन मित्रांबरोबर खेळणे, अभ्यास करणे, खोड्या काढणे, चिडवणे असेच गेले. सुरूवातीला त्यांना पोहण्याची विशेष अशी आवड नव्हती. ते आजोबांकडून पोहायला शिकले. मात्र त्यावेळी स्पर्धा वगैरे काही त्यांच्या मनात नव्हते.

त्यांनी दहावीनंतर पदवी पूर्ण करण्यासाठी कला शाखेतून कॉलेजला प्रवेश घेतला. कॉलेजमधलाच एक मित्र उमेशना म्हणाला, चल, स्पर्धेत भाग घेऊ. उमेश यांना स्विमर म्हणून करिअर करण्यासाठी ती स्पर्धा निमित्त ठरली. उमेश यांचा त्या स्पर्धेत तिसरा क्रमांक आला. तेथेच उमेश यांनी निर्धार केला. पोहायचे, पोहायचे आणि पोहायचे!

शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांच्या प्रताप क्रीडा मंडळातर्फे मुलांना विविध स्पर्धांसाठी बाहेर पाठवले जाई. उमेश देखील तेथील स्वीमिंग पूलवर सरावासाठी जाऊ लागले. उमेश यांचे शिक्षक वाघमारेसर यांना उमेश यांचे पोहण्यातले कसब ठाऊक होते. त्यांनी पोहण्याचा सराव करण्यासाठी पुण्याला जा, असे उमेश यांना सुचवले. उमेश यांनीही मंडळात त्यांना पुण्याला सरावासाठी जायचे असल्याचे सांगितले. उमेश यांनी पुण्यात होणाऱ्या मे मधील उन्हाळी शिबिरात भाग घेतला. मोहिते पाटील यांच्या संदर्भाने गेल्यामुळे तेथे त्यांना चांगले मार्गदर्शक मिळाले. उमेश म्हणतात, “त्या शिबिरात मला कळले, की पट्टीचा पोहणारा होण्यासाठी व्यायामाची आवश्यकता असते, विशिष्ट आहार घ्यायचा असतो.”

आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांत उमेश यांनी बारा पदके कमावली. लोकांकडून शाबासकी मिळायची. कौतुक व्हायचे. त्यामुळे उमेश यांना अधिकाधिक प्रोत्साहन मिळत गेले. त्याच्या घरचे पण खूश व्हायचे. पण हे स्पर्धा, शिबिरे करताना अभ्यासात पण लक्ष दे, असे आवर्जून उमेश यांना सांगायचे. त्यांनाही ते पटायचे. मागेपुढे करत त्यांनी भूगोल विषयात बी. ए. पास केले.

दरम्यानच्या काळात स्वीमिंग संदर्भातील बातम्या, पुस्तके, लेख, जे मिळेल ते उमेश वाचत होते. जलतरणपटूंना भेटत होते. असेच ते जलतरणपटू रूपाली रेपाळेला तिच्या घरी जाऊन भेटलेही. तिच्या भेटीने त्यांच्या मनात नवा उत्साह निर्माण झाला. आपणही खाडी पार करायची. त्यांनी ठरवले. आता त्यांनी एमए पूर्ण केले होते. ते पुन्हा गावी परतले होते. गावात आल्यानंतर सकाळी नदीवर व संध्याकाळी मंडळाच्या पूलवर त्यांचा सराव सुरू झाला. नदीत एकट्याने पोहताना त्यांना भीती वाटायची. एकदा पोहता पोहता त्यांचा हात माशावर पडला. ते घाबरून गेले. त्यांना क्षणभर वाटले, की माशाने त्यांना खाल्लं की काय? त्यावर उपाय म्हणून त्यांनी सोबतीला नावाड्याला घ्यायचे ठरवले. त्यांनी त्याला पन्नास रुपये देऊ केले. उमेश पोहत असताना, नावाडी त्यांची होडी घेऊन सोबत करायचा.

त्यांचा आत्मविश्वास वाढला त्याच हिंमतीत, सर्व जुळवाजुळव करून त्यांनी धरमतर ते गेट वे ऑफ इंडिया हे अंतर साडेसहा तासात पार केले. धरमतर ते गेट वे समुद्र पोहून पार करणारे ते पहिले अपंग जलतरणपटू आहेत.

विजयसिंह मोहिते पाटील यांच्या सहकार्यामुळे उमेश यांचा राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत शिरकाव झाला. उमेश म्हणतात. “ त्यांच्यामुळेच माझा हा छंद, माझं ध्येय जोपासलं गेलं. त्यांच्यामुळेच मला हवे ते करणे शक्य झाले.”

उमेश यांनी, सध्या पर्यटन व्यवसायावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांची पत्नी वैशाली त्यांना मदत करते. त्यांची मुलगी संस्कृती दोन वर्षांची आहे. उमेश छत्रपती शिवाजी स्वीमिंग टँक येथे मुलांना पोहण्याचे धडे देतात. त्यांनी अपंगांसाठी असलेल्या सवलती कधी मिळवल्या नाहीत.

उमेश गोडसे यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांत दोनदा चौथा क्रमांक पटकावला आहे. तर राष्ट्रीय स्तरावर त्यांनी सतरा सुवर्ण, पाच रजत, आठ कांस्य पदके मिळवली आहेत. राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये त्यांनी सव्वीस सुवर्ण, पाच रजत, तीन कांस्य पदक कमावली आहेत. झोनल स्पर्धांमध्ये त्यांनी तीन सुवर्ण, दहा रजत व नऊ कांस्य पदकांची कमाई केली आहे. त्यांना एकूण अठ्ठयाऐंशी पदके मिळाली आहेत. त्याशिवाय त्यांना राज्य सरकारच्या जिल्हा क्रीडा पुरस्काराने (सोलापूर), अकलूज शिक्षण प्रसारक मंडळाच्या क्रीडा पुरस्काराने, अण्णाभाऊ साठे पुरस्काराने, मराठा सेवा संघ पुरस्काराने; तसेच, शिवर्ती सेवा संस्थेच्या (आनंदनगर) पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

उमेश गोडसे
9657782525
kesari.y29@gmail.com, umesh_godase@rediffmail.com
मु. पो. यशवंतनगर,
अकलूज, ता. माळशिरस,
जिल्हा सोलापूर - 413118

- अर्चना राणे

लेखी अभिप्राय

कौतुकास्पद कामगिरी. शुभेच्छा.

Sachin Thorat 19/02/2017

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.