अशी असावी शाळा!

अभय बंग 05/01/2015

अमृत बंगसोबत अभय बंग आणि राणी बंगशिक्षण व शाळा कशा असाव्यात याबाबत निर्णय करण्याचा अधिकार कोणाचा? सध्या, तो अधिकार विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना नाही. तो शिक्षक-शाळांचे चालक-शिक्षणतज्ज्ञ व शिक्षण खात्यातील नोकरशाही यांच्या हातात पूर्णपणे एकवटला आहे. त्यांची शिक्षणावर एकाधिकारशाही आहे. ते पुरवतील तो माल, तेच शिक्षण मुकाट्याने घेतल्याशिवाय विद्यार्थी व त्यांचे पालक यांना गत्यंतर नाही. शाळा व शिक्षण हे पुरवठा करणाऱ्यांच्या मर्जीने व हितासाठी चालत आहेत, मग ते कसे बदलणार?

आमच्या घरी एक छोटासा प्रयोग घडला. घडला यासाठी म्हणतो, की तो जाणून-बुजून, योजनाबद्ध रीत्या नाही केला. तो घडला. आमचा छोटा मुलगा अमृत सध्या आठवीत आहे. त्याने पहिलीपासून शाळेत जाण्याप्रती नावड दाखवली; विद्रोहच पुकारला. सुदैवाने, त्याच्या शाळेचे शिक्षक व शिक्षणाधिकारी यांनी त्याच्या बाबतीत अपवाद करून, त्याने वाटल्यास घरीच अभ्यास करावा, पण परीक्षा मात्र शाळेत द्याव्या अशी व्यवस्था मान्य केली. त्यामुळे अमृतचे आठवीपर्यंतचे बहुतेक शिक्षण घरी झाले. तो फार कमी दिवस शाळेत जातो. त्याला कोणतीच शिकवणी लावली नाही. तो स्वत:च शाळेच्या पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रम घरी पूर्ण करतो. पण परीक्षांमध्ये सहसा जिल्ह्यातून पहिला येतो. त्यामुळे त्याचे शिक्षक व शाळा त्याला दिलेली मोकळीक सार्थ मानत. मित्रांची आठवण आली, क्रिकेट खेळावेसे वाटले, शाळेत स्नेहसंमेलन असले, की त्या दिवशी तो शाळेत जातो. अन्य दिवशी त्याची स्वत:ची शाळा तो स्वत: घरी भरवतो. त्याचे कारण तो असे द्यायचा, की “शाळेत सहा-आठ तासांत जे शिकवतात ते मी घरी दोन तासांत शिकतो. मग सहा तास मला इतर सर्व गोष्टी करायला वेळ मिळतो. मग मी शाळेत का जाऊ?”  शाळेचे ओझे नसल्याने अवांतर वाचन, छंद, जिज्ञासा, खेळ, कला या सर्व गोष्टींसाठी त्याला भरपूर वेळ मिळतोदेखील. त्याचे बालपण हेवा वाटण्यासारखे आहे.

अमृतने शाळा आनंददायी नसते या अनुभवामुळे त्याची स्वत:ची शाळा स्वत: घडवली. मी त्याला मदत करत गेलो. त्याच्या शिक्षकांनी त्याला स्वातंत्र्य व कौतुक दिले, पण तरीही त्याचा शालेय अभ्यासक्रम मी आनंददायी करू शकलो नाही. अमृत न टाळता येण्यासारखी एक ब्याद असे मानून अभ्यासक्रम पूर्ण करतो व परीक्षा देतो. लीलाताईंचे ‘अर्थपूर्ण, आनंद शिक्षणासाठी...’ हे पुस्तक वाचताना मला वारंवार वाटत गेले, अरे, हे पुस्तक पूर्वी आपल्या हाती लागले असते तर अमृतचा अभ्यासही आपल्याला आनंददायी करता आला असता!

लीलाताईंचे सृजन-आनंद विद्यालय, पुण्यात विद्याताई पटवर्धन यांनी चालवलेले विद्यालय, अरुण देशपांडे यांचे जिज्ञासा व प्रयोगशीलता वाढवण्यास प्रोत्साहन देणारे शिक्षणाचे प्रयत्न, अशा अनेक विचारांना व प्रयोगांना व्यासपीठ पुरवणारे ‘पालकनीती’ सारखे नियतकालिक, हे सर्व समांतर शिक्षणाचे प्रयोग महाराष्ट्रात सुरू आहेत; आणखीही अनेक असतील. आपल्या मुलांची जडणघडण व त्यांचे शिक्षण ही बाब निव्वळ शिक्षणतज्ज्ञ व शिक्षक यांच्या हाती देण्याइतकी क्षुल्लक नाही हे पालकांना उमजून, त्यांनी सध्याच्या शिक्षणप्रणालीला पूर्णपणे न नाकारताही तिला समांतर शिक्षणाच्या प्रयोगात रस घेतला तर ते प्रयोग एक प्रवाह बनतील आणि मग शिक्षण खात्याची व शाळांची शिक्षणावरील अजगरी पकड सुटून मुलांना आनंदाचा थोडा श्वास घेता येईल.

शिक्षणातील आनंद हा केवळ त्याचे अंतिम फलित (माहिती वाढणे किंवा परीक्षेत गुण मिळवणे) यामध्ये नसून तो आनंद शिक्षण मिळत असताना त्या प्रक्रियेत क्षणोक्षणी मिळणाऱ्या सृजनात्मक अनुभवात आहे. म्हणून शिक्षणातील आनंदांक मोजणे, वाढवणे हा शिक्षणाचा अविभाज्य भाग असायला हवा. एरिक फ्रॉम या प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञाचे लीलाताईंच्या पुस्तकात उद्धृत केलेले वाक्य, “To live is to be born every minute.” हे शिक्षणाच्या क्षणाक्षणाला लागू होते.

पण लीलाताई केवळ आनंददायी शिक्षणाचे मोहक स्वप्न रंगवून थांबत नाहीत. तसे शिक्षण प्रत्यक्ष कसे देता येईल त्याच्या पद्धती व कोल्हापूरच्या त्यांच्या ‘सृजन-आनंद विद्यालया’च्या रोजनिशीतील वाटावे असे अनेक अनुभव यांतून त्या समजावून सांगतात.

विनोबाच्या शिक्षणाविषयीच्या विचारांमध्ये अनेक क्रांतिकारी कल्पना आढळतात. प्रसिद्ध तत्त्वज्ञ इव्हान इलीचने De-schooling society हे प्रक्षोभक पुस्तक लिहिले आहे. ते भारतात आले त्यावेळी विनोबांना भेटायला जाताना ते अतिशय गंभीर होते. मी त्यांच्यासोबत बसलो होतो. म्हणाले, “विनोबांचे शिक्षणावरील विचार मी अगोदर वाचले असते तर मी माझे पुस्तक लिहिलेच नसते! त्यांनी ते माझ्या तीस वर्षे आधी अतिशय प्रभावीपणे मांडले आहेत.”

दादा धर्माधिकारी यांनी एक आठवण लिहिली आहे. त्यांनी ते प्राचार्य असलेल्या राष्ट्रीय शाळेच्या एका कार्यक्रमाला विनोबांना बोलावले. दादा म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या ज्ञानात काही कमतरता आढळली तर ती आम्हा शिक्षकांची कमी आहे असे समजा. आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार?”

“तुम्ही फार गर्विष्ठ शिक्षक दिसता. स्वत:ला ज्ञानाची विहीर व विद्यार्थ्यांना रिकामी बादली समजता काय? शिक्षकाला जास्तीत जास्त बादलीचा दोर म्हणता येईल!” विनोबांनी मार्मिक टीका केली. ‘ईशावास्य वृत्ती’मध्ये एके जागी ते म्हणतात. “उदच्यते, (उत्-अच्यते), आत असलेले बाहेर काढण्याला मदत करणे हे विकासाचे सूत्र. तेच शिक्षणशास्त्र.”

शिक्षण हा जीवनापासून तोडलेला वेगळा अनुभव नसतो, तर जीवन जगताना येणाऱ्या अनुभवालाच शैक्षणिक अनुभवात परिवर्तित करायचे असते हे विनोबांनी पन्नास वर्षांपूर्वी मांडलेले तत्त्व कॅनडामधील मॅकमास्टर विद्यापीठातील नवीन मेडिकल कॉलेजेसनी अंमलात आणले आहे.

कळसापासून सुरुवात तर झाली! प्राथमिक शाळेच्या पायापर्यंत ते केव्हा पोचणार?

जीवन जगताना, कर्म करताना शिकणे हा विनोबांचा शिक्षणविचार; तर कला, काव्य, निसर्ग यांच्यामार्फत आनंदमय शिक्षण देणे हा रवींद्रनाथ टागोरांचा प्रयोग. मी लहानपणी त्या दोन शिक्षणविचारांवर आधारित ‘नई तालीम विद्यालया’त शिकलो. ‘सेवाग्राम’ला असलेल्या त्या शाळेत एकदा विलक्षणच प्रयोग केला गेला. पाचवी ते अकरावीपर्यंतचे सर्व वर्ग एकत्र करून प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या कुवतीनुसार एकाच वेळी वेगवेगळ्या विषयांसाठी वेगवेगळ्या वर्गात टाकले. मी एकाच वर्षी इंग्रजीत सातवीत, गणितात नववीत व मराठीत अकरावीत होतो!

तज्ज्ञांना जे दिसत नाही, समजत नाही ते कधी कधी कवींना कळते असे म्हणतात. म्हणून ईशावास्योपनिषदामध्ये कवीला ‘क्रांतदर्शी’ म्हटले आहे. मी तर एका अशा वैज्ञानिकाविषयी वाचले आहे, की जो संशोधनाची नवी कल्पना सुचली की प्रथम त्याविषयी कवी व साहित्यिक यांनी काय लिहून ठेवले आहे ते वाचतो. त्यांना फार अगोदर दिसते, कळते असा त्याचा अनुभव.

वर्ध्याचे तरुण कवी भिमनवार यांची बऱ्याच वर्षांपूर्वी लिहिलेली एक कविता अशीच क्रांतदर्शी आहे.

छप्पर, भिंती, खडू, फळ्याविण अशी असावी शाळा
पुस्तक, पाटी नको ; नसाव्या अभ्यासाच्या वेळा ||धृ||
किलबिलणाऱ्या पक्षासंगे मुक्त प्रार्थना गावी
चिंचा, पेरू, कैऱ्यांची पण रोज हजेरी घ्यावी
हातामधले पेरू बघुनी पोपट व्हावे गोळा ||१||
वेगवेगळी फुले खुडूनी बेरीज करून घ्यावी
झाडावरले पक्षी उडवित वजाबाकी मांडावी
फळ्याऐवजी आकाशातील मेघच घ्यावा काळा ||२||
पाटी, पुस्तक नको, वह्यांचे पाठीवरती ओझे
विषय आमुचे आम्हीच निवडू, आम्हास रुचती जे जे
मनासारखा बदलून घेऊ शिक्षणक्रमही सगळा ||३||

आजच्या समाजात अशा सृजनदायी आनंदमय शिक्षणाला भवितव्य आहे का? या प्रश्नाचे उत्तर शिक्षणक्षेत्राच्या पलीकडे लपलेले आहे. अर्थव्यवस्था व समाज स्पर्धामय केल्यानेच माणसे जीव तोडून काम करतात आणि स्वत:चे व समाजाचे भले साधतात अशा विचारसरणीवर आधारित समाजात सृजन-आनंद देणारे शिक्षण अनफिट ठरेल. माणूस स्पर्धेच्या यशानेच प्रेरित होतो म्हटल्यावर सृजन व आनंद, दोन्ही दुय्यम ठरतात. केवळ स्पर्धेची तयारी करणारा ‘लातूर पॅटर्न’ मुख्य बनतो.

अतिस्पर्धेने थकून माणसे मोडकळीला आली, की मग या समाजव्यवस्थेविषयी व सोबतच स्पर्धात्मक परीक्षाकेंद्री शिक्षणाविषयी पुनर्विचार करायला बाध्य होतील. सृजन-आनंदमय शिक्षण हा निव्वळ शिक्षणविचार नाही. पूर्ण जीवनाचे साफल्य कशात आहे यासंबंधी काही वेगळ्या मान्यतांवर तो आधारित आहे. स्पर्धानिरपेक्ष, निखळ मानवीय संबंध व सृजन यांत आनंद शोधणारा माणूस घडवण्याचे ते शिक्षण आहे.

डॉ. अभय बंग

(लीला पाटील यांच्या ‘अर्थपूर्ण, आनंद शिक्षणासाठी...’ या पुस्तकाच्या प्रस्तानवेमधील उद्धृत)

लेखी अभिप्राय

thanks .

shailesh joshi20/01/2015

kahis satya kahise avajavi, kahis ashykya . shikshan hi sarvanch sarasar vichar karun banavaleli prakriya ahe. vyavshet dosh ahe. pan...................

suchita shendage02/05/2015

very nice

santoshwaykos23/05/2015

गुड

सुरेश खांडेक र06/02/2016

thinkmaharashtra.com Business offer the administrator of this forum your forum seemed very attractive and promising. I want to buy advertising space for banner in the header, for $ 1,500 a month. Pay will be through WebMoney, 50% immediately and 50% after 2 weeks. And yet, the address of my site http://turmericbenefits.daniele-guido.info - it will not protivorecht topics?

Thank you! Write about your decision to me a PM or not

Nohemiab11/02/2017

cialis our newest member
http://luck.xlviagragtr.com - best ed solution
n0n prescription cialis
<a href=http://prav.rxviagracan.com>viagra pills for men</a>
- avodart cialis clomid diflucan dostinex glucophage
cialis 10 mg 4 tablet users browsing this forum

WarzenWearm07/06/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.