सांस्कृतिक संघर्ष व समन्वय - व्यासपीठाची गरज


दिलीप करंबेळकरआज आपण भारतीय अनेक पदरी सांस्कृतिक संघर्षातून जात आहोत. गेल्या शेकडो वर्षांच्या संस्कृतीने आपले भावजीवन घडवले आहे. त्या संस्कृतीने आपल्या जीवनाची काही परिमाणे निश्चित केली आहेत; जीवनविषयक मूल्यांच्या धारणा निश्चित केल्या आहेत. हा सांस्कृतिक प्रवाह एकपदरी, एकजिनसी नाही. तो अनेक पदरी आहे. वैदिक, अवैदिक व भक्ती चळवळ अशा तीन प्रमुख गटांत त्यांचे वर्गीकरण करता येईल. या प्रत्येक प्रवाहाचे स्वतःचे वैशिष्ट्य असले तरी त्या तिन्हीत समान सूत्रेही सापडतात. त्याच ऐतिहासिक प्रवासात पारशी, मुस्लिम, ख्रिश्चन असे अन्य काही सांस्कृतिक व धार्मिक प्रवाह भारतात संमिलीत झाले आहेत.

त्याचबरोबर भारताचे लोक सध्या ज्या राजकीय व घटनात्मक व्यवस्थेत काम करतो तिचेही स्वतःचे असे स्वतंत्र भावजीवन आहे, जीवनविषयक धारणा आहेत. या धारणा प्रामुख्याने युरोपमधील प्रबोधन चळवळीतून आलेल्या आहेत. त्या धारणा आपल्या पारंपरिक धारणांपेक्षा वेगळ्या आहेत. या सरमिसळ सांस्कृतिक जीवनात जागतिकीकरण, संपर्क तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव - त्यामुळे प्रसारमाध्यमांची खासगी जीवनात झालेली घुसखोरी, सर्व क्षेत्रांत शास्त्रीय प्रगतीमुळे प्रचंड वेगाने होणारे बदल यामुळे आपल्या पारंपरिक सांस्कृतिक, सामाजिक व मूल्यात्मक जीवनाचा पायाच उखडला जातो आहे की काय अशी भिती उत्पन्न झाली आहे. ज्या व्यक्तीला तिच्या दैनंदिन जीवनात अशा अनेक सामाजिक पदरांतून प्रवास करावा लागतो तिची स्थिती तर मयसभेत गोंधळल्यासारखी होते. ज्यांना स्वतःचे असे नकारात्मक पद्धतीने या सांस्कृतिक प्रवाहात काही स्थान निर्माण करायचे असते ते त्यातील काही पदर हाताशी धरून त्यांच्या असुरक्षिततेच्या मुद्याचा झेंडा हाताशी धरतात. असे अनेक झेंडेकरी  समाजात स्वतःच्या टोळ्या बनवत आहेत.

या पार्श्वभूमीवर, या सर्व मूल्यप्रवाहांपासून बोध घेऊन एका नव्या सांस्कृतिक प्रवाहाच्या नकाशाचे स्वरूप स्पष्ट करता येईल का याचा विचार करावा लागेल.

या सर्व सांस्कृतिक प्रवाहांचा व मूल्यात्मक धारणांचा अभ्यास केला तर लक्षात असे येते, की या प्रत्येक प्रवाहाने मानवी जीवनाचे त्याच्या त्याच्या परीने मूल्यमापन केले आहे, त्यातील मानवी प्रवृत्तींची इष्टानिष्टता ठरवली आहे,  ती करताना ऐहिक किंवा पारमार्थिक जीवनाला अधिक महत्त्व दिले आहे. ज्या प्रमाणे सर्वसामान्य विद्यार्थी मूळ पुस्तके वाचण्याऐवजी गाईड वाचून उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न करतो त्याप्रमाणे सर्वसामान्य नागरिक अशा आधीच निश्चित केल्या गेलेल्या सुरक्षित सांस्कृतिक व मूल्यात्मक चौकटीत त्यांची सुरक्षितता शोधण्याचा प्रयत्न करतो, अगदीच अपरिहार्य झाल्याशिवाय त्या चौकट तोडण्याचे धाडस त्याला होत नाही. यांपैकी बहुतांश सांस्कृतिक चौकटीत सत्याचा काही अंश असतोच, पण त्या अंशाचे वैश्विकीकरण करण्याच्या भरात अनेक भ्रामक बाबी त्यात घुसडल्या जातात व त्यातून एक आभासात्मक विश्व तयार होते.

स्वतःला कोणत्याही रूढ सांस्कृतिक व मूल्यात्मक चौकटीत अडकावून न घेता, परंतु त्यांच्या दृष्टिकोनातील सत्यशोधनाच्या सकारात्मक प्रयत्नांची दखल घेणारे विचारांचे एक व्यापक व्यासपीठ तयार करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने काही मुद्दे विचारार्थ ठेवत आहे.
ऐहिक स्वास्थ्य व आंतरिक स्वतंत्रता हे सांस्कृतिक व मूल्यात्मक विचारांचे दोन प्रमुख केंद्रबिंदू आहेत. इतर प्राण्यांच्या तुलनेत माणसात विकसित झालेली आत्मजाणीव ही त्याची विशेषता आहे. या आत्मजाणिवेच्या विकासाबाबतच्या दोन मीमांसा आहेत. माणूस हा उत्क्रांत झालेला प्राणी आहे. उत्क्रांतीच्या प्रक्रियेत आत्मरक्षणासाठी सारासार विवेकबुद्धीतून त्याच्याकडे ही जाणीव विकसित झाली असे इहवाद्यांचे मत आहे. तर माणूस हा मूलतः चैतन्याचा, परब्रम्हाचा, ईश्वराचा - अंश आहे व तो या जड जगात काही काळासाठी राहणार आहे असे मत असणारा दुसरा मतप्रवाह आहे. या दोन विभिन्न मतप्रवाहांमुळे जीवनाकडे पाहण्याचे दोन आमूलाग्र वेगळे दृष्टिकोन मिळतात.

इहवाद्यांच्या मते संस्कृती किंवा मूल्यभावना ही ऐहिक जीवन स्वस्थपणे जगण्यासाठी आवश्यक असते. त्याला एका विशिष्ट स्तराचे जीवनमान मिळाले पाहिजे, त्याच्या इंद्रिय सौख्याच्या व ऐहिक विकासाच्या सर्व वाटा खुल्या असल्या पाहिजेत. माणसाचे दुःख, शोषण यांमुळे मानसिक व भावनिक दुःख निर्माण होते, ते न होण्यासाठी नैतिक संकल्पना जोपासल्या गेल्या पाहिजेत. त्यातूनच समानतेसारख्या मानवी मूल्यकल्पनांचा उदय झाला व सामाजिक हक्कांची जाणीव घडत गेली. प्रत्येकाला सारासार विचार करण्याचे, विवेकबुद्धीचे स्वातंत्र्य असले पाहिजे, या विवेकबुद्धीचा आधार स्वहित व या स्वहिताचे दीर्घकाळ रक्षण व्हावे म्हणून स्वहिताची समाजहिताशी घातलेली सांगड म्हणजे सामाजिक दृष्टिकोन.

माणसाच्या बौद्धिक जाणिवेतून माणसाच्या ऐहिक आकांक्षेची पूर्ती करण्याकरता नवनवे शोध लागतात. त्या शोधांचा लाभ त्या व्यक्तीलाही झाला पाहिजे, तरच शोध लावण्याची त्याची प्रेरणा टिकेल. त्यासाठी बौद्धिक स्वामित्व हक्काचे रक्षण केले गेले पाहिजे. त्या सर्व संकल्पनांसहित समाजाचा गाडा चालायचा असेल तर व्यक्तींना परस्परांशी व व्यक्तीला समाजाशी कराराने बांधणे आवश्यक आहे व त्या करारानुसार, म्हणजे घटनेनुसार समाज चालवण्याची जबाबदारी शासनाची आहे. त्यामुळे इहवादी संकल्पनेत शासनाला केंद्रीभूत महत्त्व असते व समाजाच्या सामूहिक शहाणपणाद्वारे, म्हणजे लोकशाहीत निवडणूक प्रक्रियेद्वारे निवडलेले सरकार व कायद्यापुढे सर्व समान ही इहवादातील सर्वाधिक सुसंस्कृत समाजाची संकल्पना आहे.

जे पारमार्थिक आहेत त्यांच्या मते, जीव हा विश्वचैतन्याकडून, परब्रम्हाकडून, ईश्वरी जगातून -काही काळापुरता या जगात आला आहे. त्यामुळे त्याच्या जीवनाचे प्रथम उद्दिष्ट त्या वास्तवाचे भान ठेवून या जगात जगणे हेच असले पाहिजे. माणसाचे ऐहिक जीवन ही  तात्पुरती अवस्था आहे. पण अज्ञानामुळे तो तीच कायमची समजतो! माणसाची इंद्रिये ही त्याला या जगाकडे ओढून मूळ मार्गापासून विचलित करत असतात. त्यामुळे जी मूल्ये त्याला परब्रम्हाच्या किंवा ईश्वरी सत्तेच्या मार्गावर ठेवतात तीच नैतिक मूल्ये असतात. त्याच परब्रम्हाच्या किंवा ईश्वरी सत्तेच्या प्रवासात इतर लोकांबद्दल अनुकंपा तयार होते. मानवी मूल्यांचा किंवा सामाजिक जाणिवांचा तो आधार असतो. त्या जाणिवा विकसित करण्यासाठी व्यक्तीची स्वार्थभावना कमी करावी लागते. ज्या व्यक्तींना या ब्रम्हस्वरूपाची प्रचीती आलेली असते तेच मानवजातीचे खरे मार्गदर्शक असतात. त्यांचे वागणे समजणे हे सामान्य बुद्धीच्या माणसांना शक्य नसल्याने सामान्य जनांचे नियम, कायदे त्यांना लागू पडत नाहीत. अशा व्यक्तीच समाजाच्या ख-या मार्गदर्शक व नियंत्रक असू शकतात. अशा अवतारी लोकांच्या तोंडून बाहेर पडलेली वचने हीच माणसासाठी ईश्वरप्रणित घटना असते. या घटनेची बरोबरी कोणत्याही एका व्यक्तीची बुद्धी किंवा लोकांचे निवडणुकीद्वारा प्रकट झालेले सामुहिक शहाणपण करू शकत नाही. त्यामुळे लोकशाही हा ईश्वरी सत्तेला पर्याय होऊ शकत नाही.

यांपैकी कोणता दृष्टिकोन बरोबर हे ठरवणे अवघड आहे, कारण ते सिद्ध करण्याकरता दोन्ही बाजूंकडून पुराव्याची उतरंड रचली जाईल. म्हणून ते दोन्ही दृष्टिकोन समाजात राहणार हे गृहित धरून त्या दोन्ही दृष्टिकोनातील समाजपोषक घटक कोणते व त्या घटकांना अनुकूल वातावरण कसे करता येईल याचा विचार करावा लागेल.

ऐहिक प्रेरणेतील उपभोगवाद हा समाजाच्या ऐहिक प्रगतीला कारणीभूत ठरत असतो. परंतु तो अनियंत्रित झाला तर समाजविघातक ठरत असतो. त्यामुळे विवेकबुद्धीची जाणीव व कायद्याची भीती त्या उपभोगवादाला नियंत्रित करू शकते. स्वार्थाची सहजप्रेरणा व समाजभावनेतून आलेले सामाजिक भान यांमधे समन्वय साधण्याचा प्रयत्न हा ऐहिक मूल्यभावनेचा प्रमुख घटक होय. त्यामधे मानवी प्रेरणेचे मूलभूत उगमस्थान हे त्याच्या, त्याचे जीवनमान अर्थोत्पादनाद्वारे अधिकाधिक उन्नत करण्याच्या स्वार्थप्रेरणेत आहे असे गृहित धरून निर्माण केलेल्या अर्थव्यवस्थेपासून, माणसाची मूळ प्रेरणा शोषणाची असल्याने त्याच्या हाती संपत्ती निर्मितीची साधने ठेवली तर त्यातून शोषक वर्गाचीच निर्मिती होणार म्हणून सर्व साधनसंपत्ती समाजाच्या म्हणजेच सरकारच्या हाती असली पाहिजेत असे सांगणा-या साम्यवादी विचारसरणीपर्यंत अनेक पदर त्या विचारसरणीत येतात.

आजवरच्या सर्व अनुभवांती, समाजात सांस्कृतिक भान आणण्याकरता कठोर कायद्यांपेक्षा मनुष्याची मूलभूत स्वार्थ प्रेरणा न नाकारता तिला विवेकबुद्धीच्या साहाय्याने समाजहिताचे भान देत राहणे हाच सर्वोत्तम मार्ग होय. त्यासाठी व्यक्तीच्या व्यक्तिगत अनुभवांचे पारदर्शी प्रकटीकरण करणारी बौद्धिक चर्चा, साहित्यनिर्मिती, अन्य कलात्मक आविष्कार याला प्रोत्साहक वातावरण समाजात असणे गरजेचे असते. शेले हा कवितेला त्याच अर्थाने इहवादी अध्यात्माचा दर्जा देतो. युरोपीयन रेनेसान्स मधे यावर खूप मूलगामी विचारमंथन झाले आहे.

जेव्हा समाजावर पारमार्थिक विचारांचा प्रभाव वाढतो तेव्हा ऐहिक आकांक्षेपेक्षा विरक्तीचा प्रभाव वाढतो. तिला प्रतिष्ठा मिळते. परंतु सर्वसामान्य व्यक्तीच्या मनातून मूलभूत प्राणिज प्रेरणा जात नाहीत, तरीही प्रतिष्ठा मिळवण्याकरता माणसे न पेलणारी विरक्तीची भाषा बोलू लागतात. त्यातून समाजात दांभिकता तयार होते व समाजाचे स्खलन सुरू होते. त्यामुळे समाजातील दुसरे टोक टाळायचे असेल तर ज्यांना आत्मिक सामर्थ्याचे भान आहे, ज्यांना आत्मस्वातंत्र्य (स्वराज्य) ही मूलभूत मूल्यभावना वाटते व जे माणसाच्या प्राणिज व ऐहिक भावनांना अपूर्ण समजतील, पण नाकारणार नाहीत असा वर्ग प्रभावी असणे गरजेचे आहे.

कोणत्याही समाजात ऐहिक प्रेरणांना केंद्रस्थानी मानणारा व निखळ पारमार्थिक विचारांवर श्रद्धा  असणारा असे वर्ग असणारच. त्यांच्या प्रेरणा, त्यातून निर्माण झालेले त्यांचे विचारविश्व व भावविश्व भिन्न असणार. परंतु त्या दोन्ही विश्वांचे भान असणारा विवेकनिष्ठ इहवादी आणि स्वत:च्या व इहवाद्यांच्याही विचार व आविष्कार स्वातंत्र्याचे भान ठेवणारा व ती मूल्यनिष्ठा मांडणारा पारमार्थिक यांना कवेत घेणारे सांस्कृतिक व्यासपीठ तयार होणे गरजेचे आहे.

१८५७ सालच्या स्वातंत्र्ययुद्धात भारतीय संस्थानिकांचा पराभव झाला व भारतीय राजकारणाची सूत्रे इंग्रजी शिक्षण घेतलेल्या तरुणांच्या हाती आली. युरोपमधील रेनेसान्समधून जी राजकीय, सामाजिक, औद्योगिक, वैचारिक, साहित्यिक, सांस्कृतिक मूल्ये आली होती त्या मूल्यांचा परिचय भारतीय तरुणांना इंग्रजी शिक्षणाच्या माध्यमातून होऊ लागला. भारताच्या शेकडो वर्षांच्या जीवनमूल्यांशी या नव्या जीवनमूल्यांचा मेळ कसा घालायचा यावर स्वातंत्र्यपूर्व काळात जे विचारमंथन झाले ते धार्मिक, पारमार्थिक विचारांचा इहवादी विचारांशी मेळ कसा घालायचा या भूमिकेतून. यातूनच स्वामी विवेकानंद यांनी अध्यात्म व विज्ञान यांची सांगड घालण्याची व आध्यात्मिक विचारांना सामाजिक अधिष्ठान देण्याची भूमिका मांडली. दयानंद सरस्वती यांना वेदांच्या मूळ शिकवणुकीच्या आधारे समाजाची पुनर्बांधणी करणे गरजेचे वाटले. युरोपीयन सामाजिक मूल्ये अंगी बाणवण्यासाठी न्या. रानडे यांना भक्तिमार्गी चळवळीचे महत्त्व वाटले. योगी अरविंदांना व्यक्तिगत मुक्तिचा विचार न करता सर्व समाजच अतिमानसाच्या पातळीवर नेण्यासाठी साधना करणे हा युगधर्म आहे असे वाटले. लो. टिळकांनी निष्काम कर्मयोगाचा मार्ग सांगितला. म. गांधीनी निर्मोही राहून कर्मयोगाचे आचरण करण्याच्या मार्गाचा पुरस्कार केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना घटनात्मक मूल्यांबरोबरच बौद्ध धर्मातील शिकवणीचे कालानुरूप पुनरूज्जीवन करणे आवश्यक वाटले. डॉ. हेडगेवारांनी राष्ट्रसमर्पित कर्मयोगाची प्रेरणा देणारी कार्यपद्धती रा.स्व. संघाच्या रूपाने रूढ केली. या प्रत्येक विचारांमागे प्रत्येकाचे मूलगामी चिंतन होते. परंतु स्वातंत्र्यानंतर असे विचारमंथन थांबले. जर भारताच्या भविष्यकाळाचा विचार करायचा असेल तर या विचारांचा केवळ प्रचारी नव्हे तर तुलनात्मक मागोवा घेतला पाहिजे असे मला वाटते.

दिलीप करंबेळकर
kdilip54@gmail.com

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.