स्‍नेहदीप


कर्णबधीर कळ्या-फुलांचे ‘आनंदी झाड’!
 
‘शिकविता भाषा बोले कैसा पाही,
कानाने बहिरा मुका परी नाही’

स्नेहदिप संचालित कर्णबधिरांची शाळाही काव्यपंक्ती शब्दश: खरी करत कर्णबधीर चिमुरड्या कळ्या-फुलांसाठी आनंदाचे झाड बनण्याचे काम दापोलीतील ‘स्नेहदीप’ या संस्थेने साधले आहे. संस्थेकडून चालवण्‍यात येणा-या 'इंदिराबाई वामनराव बडे कर्णबधीर विद्यालया'चा साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांनी ‘माणुसकीतील सौंदर्याचा विलक्षण हृदयस्पर्शी आविष्कार’ असा उत्फूर्त गौरव केला आहे!

संस्थेची स्थापना १९८४ साली झाली. डॉ. गंगाधर काणे यांना दापोली परिसरात असलेल्या कर्णबधीर मुलांचे लक्षणीय प्रमाण लक्षात आले. त्यामुळे अशा मुलांसाठी शाळा आवश्यक असल्याचे जाणून त्यांनी हा विषय डॉ. श्रीधर कोपरकर व शांता सहस्रबुद्धे यांच्याशी बोलताना मांडला. काणे व कोपरकर यांनी संस्था स्थापन करण्यासाठी माणसांची गोळाबेरीज सुरू केली. बापू घारपुरे, दांडेकर गुरुजी, पांडुरंग भावे, डॉ. वासुदेव पापरीकर, अरुण साबळे, संतोष मेहता, बाबुभाई जैन, मधुसूदन करमरकर, डॉ. अपर्णा मंडलिक अशी मंडळी एकत्र आली. काणे, शांता सहस्रबुद्धे, कोपरकर यांनी घटना तयार केली, तर पापरीकर यांनी कर्णबधिरांच्या सर्वेक्षणाचा उपक्रम हाती घेतला.

स्नेहदिपचे प्रणेते डॉ. गंगाधर काणेसंतोष मेहता व अरुण साबळे यांनी लायन्स क्लबच्या माध्यमातून कर्णबधिरांच्या नाव-पत्‍त्‍यांसाठी तालुका पिंजून काढला. डॉ. गंगाधर काणे यांच्या अश्विनी हॉस्पिटलमध्ये कर्णबधिरांची नोंदणी झाली. मुलांच्या पालकांशी हितगुज साधल्यानंतर १२ जुलै १९८४ रोजी ‘स्नेहदीप’ संचालित इंदिराबाई वामनराव बडे कर्णबधिर विद्यालयाचा पहिला दिवस उजाडला. शरयू तेरेदेसाई स्वत:च्या शब्दांत स्वत:चा अनुभव जेव्हा सांगतात, तेव्हा अठ्ठावीस वर्षापूर्वींचे चित्र डोळ्यांसमोर उभे राहते... ‘सकाळचे दहा वाजलेले. शाळेचा पहिला दिवस. त्यामुळे संस्थेची मोजकी पाच माणसे आणि पाच मुले व त्यांचे पालक अशी परिस्थिती... काय करायचे, काय करावे हे न कळल्याने मुले व पालक गोंधळलेले... संपूर्ण वातावरणात संभ्रमावस्था ...त्यात शाळेसाठी भाड्याची खोली आणि रडणारी, लाथा झाडणारी मुले अशी दिवसाची सुरुवात झाली.’

शाळेचे वसतीगृह‘स्नेहदीप’च्या या प्रयत्नांअगोदर रत्नागिरी जिल्ह्यात ‘अविष्कार’ ही अशा प्रकारची एकमेव शाळा अस्तित्वात होती. त्यामुळे कर्णबधिरांसाठी शाळा हा उपक्रम नवा होता. पण आधाराला माणसे उभी राहिली आणि वर्ष सरते न सरते तोपर्यंत शाळेचे वसतिगृहदेखील सुरू झाले. रौप्यमहोत्सव साजरा केलेल्या या संस्थेचा पसारा आता खूपच वाढला आहे.

संस्‍थेस शासनाच्या विविध अनुमती मिळाल्‍या आहेत. संस्थेचे स्वप्न पाहणा-या काणे यांच्या नेतृत्वाचा वारसा डॉ. प्रशांत मेहता आणि शुभांगी गांधी तितक्याच समर्थपणे चालवत आहेत. संस्थेची स्वतःची जागा, त्यावरच्या इमारती, सुसज्ज कार्यशाळा, कर्णबधिरांसाठी शैक्षणिक साहित्य अशी अत्याधुनिक यंत्रसामग्री आदींनी हे विद्यालय सुसज्ज झाले आहे. ते सर्व उभे करण्यासाठी डॉ. इंदुभूषण बडे, .सुधाकर साबळे, पुष्पा मेहेंदळे, संतोष मेहता, कमल वराडकर आदी संवेदनशील व्यक्तींचा आर्थिक हातभार लागला आहे.

शुभांगी गांधीडॉ. प्रशांत मेहताते शाळारुपी 'झाड' अठ्ठावीस वर्षांत आनंदाने डवरले आहे. सर्वसामान्य मुलांप्रमाणे कर्णबधिर मुले तेथे शिकत आहेत. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचा-यांसाठी ती शाळा म्हणजे कुटुंब झाले आहे. तेथील कर्मचारी मुलांच्या सुखदु:खांत समरस होतात. त्यामुळेच तेथून शालेय आणि व्यावसायिक शिक्षण घेतलेली मुले स्वबळावर नोकरी आणि व्यवसाय करत आत्मविश्वासाने प्रगती करत आहेत. तेच या संस्थेच्या कामाचे फलित! विद्यालयात अक्षरओळख करताना मुलामुलींना शिवणकाम, भरतकाम, कापडावर पेंटिंग करणे, मेणबत्त्या, खडू व ऑफिस फाईल बनवणे, साबण, फिनेल, अत्तरे, आकाशकंदील, राख्या तयार करणे असे व्यवसायशिक्षण दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चित्रकला, तसेच मैदानी क्रीडाप्रकारांत देखील राष्ट्रीय स्तरावर पारितोषिके पटकावली आहेत.

कैलास गांधी
९४२२४३२०४२
kgbusy@gmail.com

Last Updated On 23rd FEB 2017

लेखी अभिप्राय

Samajseweche SAMRUDDHA udaharan!

uttamkumar jain12/12/2013

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.