दिवाळी अंक मराठी संस्कृतीचे लेणे

प्रतिनिधी 27/11/2013

दिवाळी अंक हे मराठी संस्कृतीचे गेल्या शतकातील लेणे आहे. ते जपले गेले पाहिजे हे खरे; मात्र सध्या अस्थिर सामाजिक–सांस्कृतिक परिस्थितीत ते कसे घडणार हा खरा प्रश्न आहे असे निरीक्षण दिनकर गांगल यांनी मांडले.

गेल्या वीस-पंचवीस वर्षांत काळ फार झपाट्याने बदलत आहे, नवनवीन माध्यमे लोकांसमोर येत आहेत, त्यामधील एक, पण आधीपासून रुढ असलेले माध्यम म्हणून वाचनाकडे पाहिले पाहिजे. मात्र गेल्या शतकात, १९५० ते १९८० च्या दरम्यान, मुद्रित साहित्याचे माध्यम सर्वात जास्त प्रभावशाली असताना दिवाळी अंक हे मराठी साहित्यामधील सर्वात मोठे आकर्षण असे. ठराविक दिवाळी अंक अगदी थोडक्या संख्येने का होईना सर्वदूर महाराष्ट्राभर पोचत. पारोळ्यासारख्या खेड्यातदेखील ‘सत्यकथे’चा एकादा वाचक असे. तो भेटला, की अपार आनंद होई. ते नेटवर्किंगच होते. पण ती एकात्म मंडळी होती.

साहित्याचा खप वाढला, परंतु वाचन मात्र कमी झाले अशी विसंगती सध्या अनुभवास येते असे सांगून त्यांनी दिवाळी अंकांच्या बहराचे दिवस आळवले. कित्येक लेखक दिवाळीसाठी म्हणून लेखनाच्या भट्ट्या लावत आणि तो कारखाना गणपतीच्या महिन्यापासून सुरू होई. ‘निवडक अबकडई’ पुस्तकात चंद्रकांत खोतने या ‘खाज असलेल्या’ संपादकांचे वर्णन केले आहे. पण त्यामधून माधव मोहोळकरांसारखे ‘संकोची’ लेखक लिहिते झाले - पुढे आले.

पहिला दिवाळी अंक ‘मनोरंजन’चा १९०९ साली प्रसिध्द झाला. त्याचे संपादक का.र. मित्र. त्यांनी ख्रिसमसच्या निमित्ताने पाश्चात्य देशांत जसे विशेषांक प्रसिध्द होतात त्या धर्तीवर स्वत:च्या मासिकाचा अंक प्रसिध्द केला. मग ती पध्दतच पडून गेली. ‘मासिक मनोरंजन’मध्ये श्रीपाद कृष्ण, रा.ग. गडकरी यांच्यापासून वि.सी. गुर्जरांसारख्या कथाकारांपर्यंत अनेक साहित्यकार लिहित. ती मोठी प्रभावळ होती.

तसा दुसरा टप्पा सत्यकथा-मौज-दीपावली अशा अंकांभोवती जमलेल्या लेखकवर्गाचा सांगता येतो. त्याच बेताला शिक्षणाचा प्रसार वाढू लागला व त्यामधून वाङ्मयदेखील विस्तारू लागले. माहेर-मालिनी यांसारखी मासिके त्यामधून प्रकटली.

दिवाळी अंकांचा तिसरा टप्पा ‘माणूस’ ते ‘अक्षर’ ते ‘अनुभव' अशा समाजस्पर्शी परंतु वेधक वाङ्मय देणार्यात नियतकालिकांची होती. मात्र १९८५ नंतर महाराष्ट्रात वाचनलेखनाचा स्फोट झाला. समाजसंस्कृतीचे अनेकविध पदर प्रकटू लागले व जुना एकात्म भाव राहिला नाही. हाच - माध्यम बदलाचा, स्थित्यंतराचा काळ आहे. त्यामधून लेखक-कलावंतांची निर्मितिक्षमतादेखील कसोटीला लागणार आहे.

आज वाचक व रसिक समुदाय महाराष्ट्रभर व जागामध्येही विखुरला गेला आहे. त्याला पकडण्यासाठी वेगवेगळ्या त-हेची नेटवर्क लागतील; तशीच माध्यमे वापरावी लागतील.

त्यांनी त्या संदर्भात इ दिवाळी अंकांचा उल्लेख केला. त्यांची संख्या वाढत जाणार. यंदाच सहा-सात इ दिवाळी अंकांच्या जाहिरीती सध्या च प्रकटत असतात.

‘मिडियम इज द मेसेज’ हे एकेकाळी सूत्र होते, आज ‘स्क्रीन इज द वर्ल्ड’ हे प्रभावी सूत्र आहे. त्यामुळे अक्षरेदेखील त्यावर प्रकटलेली दिसतात. त्यांचा वाचकांवर होणारा परिणाम हा समाजशास्त्रीय व सांस्कृतिक अभ्यासाचा विषय आहे.

नव्या शतकात नव्या स्वरूपातील दिवाळी अंक यावे लागतील. त्यांचे स्वरूप काय असेल ते ना मी सांगू शकत, ना कोणी भविष्यवेत्ता, ना कोणी समाज वा साहित्यशास्त्रज्ञ. परंतु प्रयोग करत राहणे महत्त्वाचे. दिवाळी अंकांच्या निर्मितीत ते सतत होत आहेत, म्हणून संस्कृतीचे हे लेणे महत्त्वाचे.

(दिनकर गांगल यांच्या ‘लोकमत’मधील मुलाखतीच्या, आधारे)

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.