सहेली : वेश्यांसाठी ‘मै हूं ना!’


सहेलीवेश्या व्यवसायात ओढल्या गेलेल्या, मात्र त्यातून बाहेर पडू इच्छिणाऱ्या आणि त्यांतील वय झालेल्या स्त्रियांना स्वत:च्या पायावर उभ्या राहण्यासाठी मदत करणारी संस्था ! सहेली! ...

‘सहेली’ १९९८ पासून कार्यरत आहे. संघटनेचे वैशिष्‍ट्य म्हणजे ‘त्याच’ व्यवसायातील दहा-बारा महिलांनी एकत्र येऊन संघटना स्थापन केली आहे. कोणीही वेश्या व्यवसायात खुशीने येत नाही. स्त्रिया फसवणूक, गरिबी, निरक्षरता या कारणांनी आमिषाला बळी पडून वेश्या व्यवसायात आलेल्या दिसतात. तिथे आल्यावर त्यांना ‘आपले कोणीच नाही - यातून सुटकेचा मार्ग नाही’ ही भावना ग्रासते. ‘सहेली’ने त्यांच्यातील त्या भावनेला खो देऊन ‘मै हूँ ना!’ हा आधार दिला आहे.

‘सहेली’ने ते काम नेटाने चालू ठेवले आहे. त्यांचे बोर्ड नऊ जणींचे आहे. ‘झिगझणी शिवम्’ या अध्यक्ष आहेत. बोर्ड ‘सहेली’चे धोरणात्मक निर्णय घेते. आठशे महिला ‘सहेली’च्या सभासद आहेत. ज्या महिला केवळ फसवणुकीतून इकडे आल्या आहेत, ज्यांना हा व्यवसाय करायचा नाही आणि ज्यांची शारीरिक क्षमता राहिलेली नाही, अशा महिला ‘सहेली’मध्ये येतात. त्यांच्या हाताला काम दिले जाते. कामाचा मोबदलाही दिला जातो. पोलिस, सामाजिक संस्था या व्यवसायातून स्त्रियांची सुटका करतात, पण त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न योग्य रीतीने सोडवला जात नाही. त्यांचे घर, पालक, समाज त्यांना त्यांच्यात पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनामुळे सामावून घेत नाहीत. ‘सहेली’द्वारा कम्युनिटी किचन चालवले जाते. संस्थेच्या किचनमध्ये ‘त्या’ महिला स्वयंपाक करतात. तेथे जेवण कमी दरात मिळते. परिसरातील दुकानदार, फिरते विक्रेते, रेडलाइट एरियातील महिला ते अन्न घेऊन जातात. त्यासाठी लागणारा कच्चा माल, भाजीपाला हे सर्व त्याच खरेदी करतात. उपक्रमाला प्रतिसाद चांगला आहे, मोबदलाही चांगला मिळतो. त्या खेरीज संस्था महिलांना मंगल कार्यालये, हॉटेले, वसतिगृह, दवाखाने अशा ठिकाणी काम मिळवून देते. त्यातून त्यांना चांगला पैसा मिळतो. मग साताठ जणी मिळून खोली घेऊन राहतात, स्वत:चा खर्च स्वत: करतात, आर्थिकदृष्‍ट्या स्वावलंबी होतात.

संघटनेकडून चालवले जाणारे पाळणाघरसंघटनेमार्फत चोवीस तासांचे पाळणाघर चालवले जाते. त्यात काम करणाऱ्या महिलांची मुले व ‘रेडलाइट एरियाती’ल महिलांची मुले तेथे राहतात. त्यातील काही महिला मुलांची देखभाल करतात. त्यांना तेथे दूध, औषधे, जेवण अशा सुविधा पुरवल्या जातात. तेथे बालवाडीही आहे. गाणी, गोष्टी, खेळ, अक्षरओळख शिकवले जाते. मुख्य म्हणजे त्यांना आईपासून दूर राहण्याची सवय होते. कारण मुले पहिलीपासून पुढे शैक्षणिक संस्थांमध्ये पाठवली जातात. त्यांना होस्टेलवर ठेवले जाते. काही मुले पदवीधारक आहेत. ती संस्थेला मदत करतात. त्या सर्वांचा खर्च संस्थेला मिळालेल्या देणगीतून होतो.

कुटुंबनियोजनाच्या प्रसारामुळे व साधनांच्या उपलब्धतेमुळे महिलांत ‘बर्थरेट’चे प्रमाण कमी झाले आहे. सध्या पाळणाघरात फक्त वीस मुले आहेत, पण त्यांतील बरीच मुले लैंगिक छळाला बळी पडलेली आहेत. संघटनेने एक मोठे पाऊल २००७ साली उचलले; ते म्हणजे ‘सहेली परिवार बँक’ सुरू केली. महिलांना बचतीची सवय लागावी हा हेतू. संस्थेच्या सभासद महिला बचत करतातच, पण ‘रेडलाइट एरिया’त घरोघरी जाऊन पैसे गोळा केले जातात. त्यांच्यासमोर पासबुकावर रकमांची नोंद केली जाते व नंतर पैसे त्यांच्या खात्यात जमा होतात. यामुळे ‘त्यांना’ कर्ज घेता येते. भाजीची गाडी, चहाची गाडी अशा स्वरूपात काही व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यांना बँक मदत करते. त्याखेरीज शिवणकाम, सुंदर पिशव्या बनवणे, स्टेज सजावट, दागिने बनवणे, फुलांच्या माळा बनवणे, स्वेटर तयार करणे असे प्रशिक्षणही दिले जाते. त्यांच्यातील कौशल्य ओळखून त्यांना प्रशिक्षण दिले जाते व स्वत:च्या पायावर उभे करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला जातो. इतकेच काय, पण लोकांशी कसे बोलावे, डॉक्टरांना माहिती कशी द्यावी हेही शिकवले जाते.

पथनाट्यासारख्या प्रयत्नांतून स्त्री यांचे प्रबोधन करण्याचा प्रयत्नसभासद स्त्रियांपैकी काहीजणींवर जबरदस्ती झालेली आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्यविषयक समस्या आहेत. काही ‘एचआयव्ही’ग्रस्त आहेत तर काहीजणी अ‍ॅनिमिया, गुप्तरोग, क्षयरोग याने त्रस्त आहेत. शिवाय व्यसनाधीनता आहे. संस्थेमध्ये त्यांना वरील रोगांची लक्षणे, त्यासाठी घ्यायची काळजी हे फिल्मद्वारे, चित्रांद्वारे समजावून दिले जाते. त्यामुळे महिला नियमित दवाखान्यात जातात. तपासणी करून घेतात. मोबाइल क्लिनिक व्हॅनमुळे काम आणखी सोपे झाले आहे. टी.व्ही.वरील जाहिरातींमुळे त्यांच्यात जागृती होते. त्यामुळे रोग होऊच नये यासाठी स्त्रिया काळजी घेतात. ससून हॉस्पिटल, नारी संस्था यांचीही मदत असते. महिलांनी ‘रेडलाइट एरिया’तील स्त्रियांसाठी शैक्षणिक साधने तयार केली आहेत. त्या साधनांद्वारे जागृतीचे काम होते.

सभासद स्त्रियांना कायदेविषयक सल्ला, सरकारच्या महिलाविषयक योजनांची माहितीही दिली जाते.

तेजस्विनी सेवेकरी व त्यांच्या सहकारी संस्थेचे कार्यालयीन कामकाज पाहतात. त्या म्हणाल्या, “‘सहेली’ या संस्थेची प्रेरणा या ‘त्या’ स्वत:च आहेत. ज्या महिलांना ‘व्यवसाय’ करायचा नाही, त्यातून सुटका हवी आहे त्यावर महिलांनी एकत्र येऊन संस्थेचा उपाय शोधला आहे. म्हणून संस्थेचे नाव आहे ‘सहेली’ - मैत्रीण तुमची! बऱ्याच जणी निरक्षर आहेत, म्हणून आम्ही त्यांना संस्थेच्या कामात मदत करतो. त्यांना साक्षर करण्याचे काम आम्ही जोमाने करतो.’’

संस्थेच्या सभासदांची बैठकसंस्थेच्या पुढील योजनांची माहिती देताना त्या म्हणाल्या, ‘‘संस्थेला रेशन दुकानाचा परवाना मिळाला आहे. जागा निश्चित झाली आहे, पण महानगरपालिकेकडून त्यात दिरंगाई होत आहे. त्याशिवाय मार्केट रेस्टॉरंट, को-ऑपरेटिव्ह स्टोअर काढणे यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. मेडिटेशन, प्राणायाम, विपश्यना हेही स्त्रियांना त्यांच्या भूतकाळातून बाहेर पडण्यास मदत करून, स्वावलंबी बनवू शकते. त्यासाठी प्रयत्न चालू असतात. हळुहळू हे सगळे आकार घेत आहे.’’

बऱ्याच महिलांशी बोलल्यावर लक्षात असे येते, की त्यांनाही सर्वसामान्य स्त्रीसारखे जीवन जगायचे आहे. भूतकाळ विसरून नव्या उमेदीने काम करायचे आहे, पण समाजात त्यांच्या वाट्याला अपमान व उपेक्षा येते. शासनाकडून, समाजाकडून कोणतीही  मदत नसते. उलट त्यांच्याकडून त्रास होतो, अवहेलना होते. आमची काहीही चूक नसताना. म्हणून त्याच एकमेकींला आधार देत जगतात.

‘उद्धरेत् आत्मना आत्मानम्।’ हे गीतेचे वचन.  त्यांनी ते वचन प्रत्यक्ष कृतीत उतरवले आहे. त्यांच्या जगण्याचे ते सूत्र बनले आहे.

सहेली,
एचआयव्‍ही/एडस् कार्यकर्ता संघ,
१०८९, शिवाजी रोड,
श्रीनिवास टॉकिजसमोर, बुधवार पेठे,
पुणे - ४११००२
दूरध्‍वनी - ०२०-६५२८७२९७/ मोबाइल – ९८८१४०४८११
इमेल - sahelisangha@gmail.com/ tejaswisevekari@gmail.com

अनुपमा मुजुमदार
१८७, कसबा पेठ, पुणे – ११
दूरध्‍वनी – ०२० – २४५७९३६४
इमेल - ggmujum@gmail.com

लेखी अभिप्राय

आपल्या या संस्थेच्या माध्यमातून समाजाकडून दुर्लक्षिलेल्या हजारो स्ञियांना रोजगार व त्यांच्या हजारो मुलांना नवीन ओळख निर्माण करून अभिमानाने जगण्याची संधी मिळणार आहे. आपले हे कार्य असेच चालू ठेवावे. आपली गरज या देशातील या दुर्लक्षित वर्गासाठी आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या कार्यास माझ्याकडून मानाचा जय भिम आणि लक्ष लक्ष शुभेच्छा.

अजित कांबळे01/03/2016

मि जाभोरा गाव चा आसज

मोहन 23/07/2016

uttam kary

अज्ञात27/02/2017

तुमचा आम्हाला अभिमान आहे नवनाथ 12. 9. 18

Navnath 14/10/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.