हेमा हिरवे - माणसं घडवण्‍यासाठी कार्यरत


विद्यार्थ्यांना शिकवताना हेमा हिरवेहेमा हिरवे गेली दहा वर्षे गोसावी वस्तीतल्या मुलांसाठी विनामूल्य खेळघर चालवतात. ते केवळ विरंगुळ्याचे ठिकाण राहिलेले नाही तर मुलांवर संस्कार करणारे केंद्र झाले आहे. हेमा हिरवे, त्यांचे कुटुंब; एवढेच नव्हे तर त्यांच्या परिसरातील पंधरा-वीस कार्यकर्ते त्यांच्या या उपक्रमात सहभागी होऊन गेले आहेत. हेमा यांना वारसाहक्काने समाजसेवेचे व्रत मिळाले आहे. त्यांचे वडील श्रीनिवास धोंगडे हे औरंगाबादला शिक्षणाधिकारी होते. ते त्यांच्या नोकरीच्या दिनक्रमातून सुद्धा प्रौढ साक्षरता वर्ग चालवत. ते गरजू विद्यार्थ्यांना शिकवायचे. ते परगावी कामानिमित्त कधी गेले तर हेमा आणि तिची भावंडे मुलांना आणि प्रौढांनाही शिकवण्याचे काम करत. त्यांनी मुलांना जवळजवळ दहा वर्षे श्लोक, गाणी, खेळ इत्यादी गोष्टीदेखील शिकवल्या. त्यांमधूनच त्‍यांच्‍या खेळघर या उपक्रमाचा उदय झाला.

त्या १९८३ साली हेमा हिरवे झाल्या. त्यांचे लग्न अच्युत हिरवे यांच्याशी होऊन त्या हैदराबादला पोचल्या. वेगळा भाग, निराळी भाषा, नवीन सहजीवन... सगळे निराळे व परके होते; हेमा मोकळेपणाने सांगतात, की त्यांच्या कुटुंबीयांनादेखील घरीच संस्कारशाळा चालवून घेण्याचा हा विचार पटवून द्यावा लागला. त्यांच्या यजमानांचे, अच्युत यांचे पूर्ण सहकार्य मिळाले. विवाहाच्या आधीपासून सुरू असलेले त्यांचे काम सर्वव्यापी गरजेचे असल्यामुळे, त्यांनी थोड्या दिवसांत तेच काम हैदराबादलाही सुरू केले. त्यांनी हिंदीचा आधार घेत मुलांना शिकवणे सुरू ठेवले. हेमा तेलगू भाषा शिकल्या. मुलांची संध्याकाळ गाणी, गोष्टी, खेळ, श्लोक यांमध्ये मजेत जाई. पालकांना ते बरे वाटे. पुढे, मिस्टरांची बदली मुंबईला झाली. (सध्या ते मुंबईला रिझर्व्ह बॅंकेत चीफ मॅनेजर आहेत.) हैदराबाद सोडताना, हेमा यांना आणि मुलांनाही भरून आले.

हेमा हिरवे पती अच्युत हिरवेंसोबत हेमा यांनी त्‍यांचा प्रपंच सुरू ठेवून मुंबईलाही तेच काम सुरू ठेवले. सोसायटीतल्या मुलांसाठी खेळघर उभे राहिले. अच्युत हिरवे रिझर्व्ह बॅंकेत उच्चाधिकारी असल्याने त्यांच्या बदल्‍या भारतीय पातळीवर होत, पण हेमा पुण्यात कायम मुक्कामासाठी आल्या. डहाणूकर कॉलनीतील त्यांच्या घराच्या आसपास गोसावी वस्ती आहे. हेमा त्‍या वस्तीवर गेल्या आणि वस्तीतील बायकांना म्हणाल्या, ‘तुमच्या मुलांची शाळा सुटली, की त्यांना माझ्या घरी पाठवा. मी त्यांना गोष्टी सांगेन, खेळ शिकवेन’. पण लोकांचा त्यावर विश्वास बसला नाही. त्यावर उपाय म्हणून हेमा यांनी पालकांनाच त्यांच्या घरी बोलावले. त्यांच्यापैकी कुणी संकोचाने आत येईना. हेमा यांनी त्यांची खेळघराची कल्पना बाहेर येऊन पालकांना बोलून दाखवली. पालकांनीही असंख्य प्रश्न विचारले. ‘आमच्या मुलांना घरकाम करायला लावायचे नाही, आम्ही शिकवण्याचे पैसे देणार नाही. पोरी सातच्या आत घरात आल्या पाहिजेत’ वगैरे त्यांनी बजावले. एवढ्या अटी घालूनही केवळ चार-पाच पालक त्यांच्या मुलांना पाठवण्यास कसेबसे तयार झाले.

 

हेमा त्यांना गाणी-गोष्टी, श्लोक शिकवू लागल्या, त्यांचा अभ्यासही घेऊ लागल्या. मुलांची संख्या वाढू लागली. जवळजवळ शंभर मुले हेमा यांच्याकडे खेळघरात येतात. त्यांनी मुलांचे गट तयार केले आहेत. त्यात कॉलेजपर्यंतच्या मुलांचा समावेश आहे. त्यांतील पंधरा मुले कॉलेज शिक्षण घेत आहेत. चौदा मुले बारावीच्या परीक्षेला व वीस मुले दहावीच्या परीक्षेला बसली आहेत. कॉलेजची मुले दहावी-बारावीच्या मुलांचा अभ्यास व खेळ घेतात, तर दहावी-बारावीची मुले लहान मुलांच्या अडचणी सोडवतात. हेमा स्वत: प्रत्येकाचा अभ्यास झाला आहे का नाही ते पाहतात.

हेमा यांनी प्रत्येकासमोर उत्तम ध्येय ठेवले आहे. त्यामुळे मुले कसून अभ्यास करतात. हेमा दिवाळी-मे महिना अशा सुट्टयांमध्ये ‘मामाचा गाव’ नसलेल्या मुलांना सहलीलाही घेऊन जातात. त्या मुलांना सुट्ट्यांमध्ये कागदी पिशव्या करणे, चित्रकला, रांगोळी, संगीत , वाद्यवादन असे बरेच काही शिकवतात. अलिकडे, कॉलेजमधील काही प्रोफेसर सर्व साहित्य घेऊन येऊन तिथेच मुलांना वैज्ञानिक प्रयोग करून दाखवतात. त्यामुळे मुले खूष असतात. विद्यार्थीवयातच त्यांच्यावर संस्कार होण्याच्या दृष्टीने शिवजयंती, रामनवमी, बालदिन असेही उपक्रम हेमा यांच्या घरगुती शाळेत केले जातात. मुलांमध्ये त्या त्या दिवसाचे औचित्य साधून आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम केले जाते.

हेमा हिरवे खेळघरातील विद्यार्थ्यांना गाणी शिकवताना
मुले झोपडपट्टीतील असल्यामुळे व्यसनाधीनता, भांडणे, कौटुंबिक समस्या, दारिद्र्य आरोग्याचे प्रश्न यांसाठी हेमा यांना आरंभी काम करावे लागले. त्या मुलांना आंघोळ कशी करावी येथपासून धडे देत. त्यांनी मुलांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी नामी युक्ती अंमलात आणली. एके दिवशी, त्या स्वत:च फाटकी साडी, पिंजारलेले केस, अस्वच्छ हात अशा स्वरूपात मुलांना शिकवण्यासाठी उभ्या राहिल्या. ते मुलांना बरे वाटेना. तेव्हा मुले म्हणाली, ‘बाई, तुम्ही अशा नका राहू. आम्हाला आवडत नाही.’ तेव्हा हेमा त्यांना म्हणाल्या, “मलासुद्धा तुम्ही घाणेरडे राहिलेले आवडत नाही; शिव्या दिलेल्या आवडत नाही. तेव्हा आपण दोघांनीही स्वच्छ राहायचे-चांगले बोलायचे.’’ तेव्हापासून मुले फाटलेले कपडे शिवू लागली, तोंड-हात धुऊ लागली, तोंड-नखे यांची स्वच्छता राखू लागली.

हेमा मुलांची वैद्यकीय तपासणी दरवर्षी करून घेतात. उषा बापट, विद्याधर पटवर्धन हे आणि इतर डॉक्टर मुलांची तपासणी करून त्यांना कॅल्शियम व लोह यांच्या गोळ्या वाटतात. हेमा असे विविध उपक्रम राबवित असताना यांना मुलांच्या वाईट सवयींचाही हिसका बसला. त्यांच्या घरातील वस्तू चोरीला गेल्या. त्यामुळे त्यांच्या स्वत:च्या घरच्यांचा रोष ओढवला. पण हेमा यांनी त्‍यांच्‍या साध्या राहणीमानाने, संवादकौशल्याने मुलांच्यात बदल घडवून आणला.

खेळघरात विविध कलाकृती तयार करताना विद्यार्थ्‍यांचे चेहरे आनंदाने फुलून आले आहेतहेमा मोकळेपणाने सांगतात, की मुलीचे लग्न होऊन नवीन घराशी संबंध जोडले गेले तेव्हा त्यांना हिरवे यांच्या घरात वेगवेगळ्या स्तरांतील मुले मोकळेपणी वावरताना, अभ्यासाला बसलेली पाहून धक्का बसे. पण सर्व कुटुंबीयांनी या नवीन विचारांशी जुळवून घेतले. हिरवे यांचे आता पुण्याला महात्मा सोसायटीत घर आहे. मुलगी सिडनीला असते. मुलगा कॉम्प्युटर सायन्स शिकत आहे.

हेमा यांनी खेळघरासाठी मोठी जागा घेतली. ट्रस्टही बनवला. त्या लोकांनी दिलेल्या देणग्यांचा उपयोग मुलांच्या कल्याणासाठी करतात. माणूस घडवण्याचे प्रत्यक्ष शिक्षण देणारे त्यांचे वडील श्रीनिवास धोंगडे यांच्या नावाने दरवर्षी पुरस्कारही देतात. त्या प्रसिद्धी आणि पैसा यांपासून दूर राहू इच्छितात. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित केले गेले आहे, पण, हेमा यांचा मात्र एकच ध्यास आहे - प्रत्येक झोपडपट्टीत असे काम उभारले गेले पाहिजे. तेथील मुलांचा तिरस्कार करून त्यांच्या समस्या वाढतात. म्हणून त्यांना आपल्यात सामील करून घेतले गेले पाहिजे. म्हणजे सुधारणा होतील. मुलांच्या चेह-यांवरचा आत्मविश्वासाचा आनंद पाहिला की कामाचा हुरूप आणखी वाढेल. पुढच्या अनेक पिढ्यांसाठी काही करायचे असेल तर ‘माणसे घडवा’ हे हेमा यांचे वाक्य मनात ठसून जाते.

हेमा अच्‍युत हिरवे
९५२७२४४६७७
akhirve@rbi.org.in, hirveak@gmail.com

 

- अनुपमा मुजुमदार

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.