पं. भाई गायतोंडे - तबल्यावरील अक्षरे


पं. भाई गायतोंडेराम राम मंडळी,

पं. भाई गायतोंडे! राहणारे आमच्या ठाण्या तलेच. संगीत क्षेत्रातलं मोठं नाव. त्यांचं खरं नाव सुरेश. 'भाई' हे त्यांचं टोपणनाव. सर्वजण त्यांना त्याच नावानं ओळखतात. त्यांचा-माझा चांगला परिचय, हे माझं भाग्य! मी त्यांना माझ्या गुरूस्थानी मानतो.

भाईंची तबला क्षेत्रातली कारकीर्द पाहिली की मन थक्क होतं. भाई मूळचे कोकणातले. कणकवली/कुडाळ भागातले. त्‍यांचा जन्‍म 1932 चा. भाईंचे वडील व्यवसायानं डॉक्टर. त्यांची डॉक्टरकी त्या लहानशा गावातच चालायची. डॉक्टर स्वतः पेटी उत्तम वाजवायचे, गाण्याला साथसंगतही करायचे. त्यामुळे संगीताची आवड भाईंच्या घरात होती. लहानग्या सुरेशनं तबला शिकण्यास हौस म्हणून सुरुवात केली. वयाच्‍या सहाव्‍या वर्षांपासून भाईंनी शास्‍त्रीय गायकांना सहजतेनं आणि तेवढ्याच आत्‍मविश्‍वासानं साथ केली.

भाई शिक्षणाकरता आणि नोकरीधंद्याकरता कोल्हापुरात दाखल झाले. त्यांनी इंजिनीयरिंगच्या परीक्षेचा अभ्यास कोल्हापुरात केला. पण मन संगीतात, तबल्यात गुंतलं होतं. त्यासाठी भरपूर खाद्य मिळालं ते कोल्हापुरातल्या देवल क्लबमध्ये. देवल क्लबात दिग्गजांची गाणी-वाजवणी व्हायची. भाईंमधला गुणी विद्यार्थी ते सगळं टिपू लागला. भाईंची आणि भीमण्णांची प्रथम भेट कोल्हापुरातच झाली. तबल्याचा रियाज सुरू होता. ऐकणं-वाजवणंही सुरू होतं. तरीदेखील भाईंना कशाची तरी कमतरता होती. काहीतरी अजून हवं होतं! मंडळी, ती कमी होती चांगल्या गुरूची. कारण अजून खूप काही शिकायचं होतं/शिकायला हवं होतं. पण कोणाकडे?

आणि अशातच, एक दिवस जगन्नाथबुवा पुरोहित हे भाईंना गुरू म्हणून लाभले. हिर्‍यालादेखील पैलू पाडणारा कोणीतरी लागतो! तो भाईंना जगन्नाथबुवांच्या रूपानं मिळाला. जगन्नाथबुवा तेव्हा कोल्हापुरातच होते. संगीतक्षेत्रात बुवांचा दबदबा होता. आग्र्याची घराणेदार गायकी आणि तबला, या दोन्ही क्षेत्रांत बुवांचा अधिकार. लोक बुवांना अंमळ वचकूनच असत.

रियाज सुरू झाला. तबल्यातील मुळाक्षरांचा रियाज! रियाज चार चार, सहा सहा तास चाले. जगन्नाथबुवा समोर बसून शिकवत आणि खडा रियाज करून घेत. बुवांचा तबल्यातील अक्षरांच्या निकासावर भर असे. कायदे, गती नंतर! आधी अक्षरं! अक्षरं नीट वाजली पाहिजेत, दुगल असो की चौगल असो की आठपट... कुठल्याही लयीत तेवढ्याच सफाईनं अक्षरांचा निकास झाला पाहिजे. बुवा सांगतील तेवढा वेळ रियाज करावा लागे. कुठलंही क्रमिक पुस्तक भाईंच्या हाताशी नव्हतं. बुवांचा करडा चेहरा हेच क्रमिक पुस्तक!

तबलावादन करताना प्रफुल्लित झालेले भाई गायतोंडे भाईंना उस्ताद अहमदजान थिरखवाखॉंसाहेब यांचीही तालीम मिळाली. भाईंनी खॉंसाहेबांकडून काय नि किती घेतलं त्याची गणतीच नाही. पण थिरखवासाहेबांचं आणि जगन्नाथबुवांचं नेमकं उलटं होतं. बुवा स्वतः लक्ष घालून तासन्‍तास शिकवत; शिकवीरखवा तेवढ्याच सफाईनेनेखॉंसाहेब तसं शिकवत नसत. 'मी वाजवतोय. त्यातून तुम्हाला काय घ्यायचंय ते घ्या! जमलं तर ठीक, नाहीतर सोडून द्या!' अशी खॉसाहेबांची भूमिका असे! पण भाईंनी टीपकागदानं टिपाव्यात तशा तबल्यातील बंदिशी, त्यांतील सौंदर्यस्थळं टिपली. खासाहेबांचीही भाईंवर मर्जी बसू लागली. भाई पेण चे विनायकबुवा घांग्रेकर यांच्याकडे केवळ झपतालातल्या खासीयती शिकण्याकरता गेले आणि तिथं त्यांनी तालीम घेतली. नवी बंदिश ऐकली की ती तशीच्या तशी त्यांच्या हातातून अगदी सहजपणे आणि तेवढ्याच सुंदरतेने वाजू लागली.

“आज आमच्या भाईंनी इतकं सुरेख वाजवलंय की 'घरी गेल्यावर भाईची नको, पण त्याच्या हातांची एकदा दृष्ट काढून टाका!' असं मी वहिनींना सांगणार आहे.” हे उद्गार कवि विंदा करंदीकर यांचे. प्रसंग होता वांद्रे येथील कलामंदिरात झालेला भाईंच्या एकल-तबलावादनाच्या (तबला-सोलो) कार्यक्रमाचा. विंदानीही विनायकबुवा घांग्रेकरांकडून काही काळ तबल्याचं शिक्षण घेतलं होतं. त्यामुळे त्यांना तबल्यातली जाण. त्या कार्यक्रमाला मीही हजर होतो आणि भाईंच्या मागे तानपुर्‍याला बसलो होतो. त्या दिवशी भाईंनी झपताल इतका अप्रतिम वाजवला की कार्यक्रम संपल्यावर श्रोत्यांत बसलेले विंदा न राहवून उठले आणि रंगमंचावर येऊन बोलू लागले. त्या दिवशी विंदा भाईंबद्दल भरभरून बोलले. अगदी कोल्हापुरापासूनच्या आठवणी निघाल्या. विंदाही काही काळ कोल्हापुरात होते. बरं का मंडळी, करवीर ही केवळ चित्रनगरी नव्हती, तर देवल क्लबमुळे ती काही काळ संगीतनगरीही झाली होती! (मिसळनगरी तर ती आहेच!)

तबलावादकाला गायकाला साथसंगत करताना नुसता तबला येऊन चालत नाही, तर त्याला गाण्याची उत्तम जाण असावी लागते. शिवाय, तबलजीला ज्या गवयाच्या गाण्याला साथ करायची आहे त्यांच्या गायकीची, त्याच्या घराण्याची माहिती असावी लागते. भाईंनी हा सगळा विचार बारकाईने केला आहे. आपण कोणाला साथ करत आहोत? त्याचं गाणं कसं आहे? किराण्याच्या संथ आलापीचं आहे, की ग्वाल्हेर अंगाचं तालाशी खेळणारं आहे, की जयपूरची लयप्रधान गायकी आहे, की बोलबनाव करत बंदिशीच्या अंगानं जाणारी आग्रा घराण्याची गायकी आहे? या सगळ्यांचा विचार तबलजीच्या साथीत दिसला पाहिजे आणि त्याची साथ त्या अंगानं झाली पाहिजे. तर ते गाणं अधिक रंगतं. भाईंनी अनेक मोठमोठ्या गवयांना साथ केली आहे. त्यात रामभाऊ मराठे, कुमार गंधर्व , यशवंतबुवा जोशी यांची नावं आवर्जून घ्यावी लागतील.

राष्ट्रापती ए.पी.जे. अब्दुल कलाम आझाद यांच्याहस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार स्वीकारतानाचे क्षणचित्र  भाईंना मैफलीत ग्वाल्हेर घराण्याचे शरदचंद्र आरोलकर यांच्याबरोबर साथ करायची होती. भाईंना गाण्यातलं ग्वाल्हेर अंग परिचयाचं होतं. पण मंडळी, ग्वाल्हेरातदेखील दोन पाती आहेत. एक विष्णू दिगंबरांचं आणि दुसरं कृष्णराव शंकर पंडितांचं. आरोलकरबुवा दुसर्‍या पातीचे!

बरं का मंडळी, ग्वाल्हेरवाला गवई हमीर गातो असं पटकन म्हणणार नाही. तो म्हणणार, ‘चला, जरा झुमरा गाऊया’ आणि झुमर्‍यातलं 'चमेली फुली चंपा' सुरू करणार. तेच आग्रावाला म्हणणार, 'चलो, जरा 'चमेली फुली चंपा' गायेंगे!' तोही 'हमीर' गातो असं म्हणणार नाही! वर 'हम राग नही गाते, हम बंदिश गाते है!' असंही म्हणणार. त्याउलट, आमचे किराण्याचे अण्णा 'ग म (नी)ध नी‌.ऽ प’ अशी सुरेल आलापी करून एका क्षणात हमिराचं फार मोहक दर्शन घडवणार! प्रत्येक घराण्याची वेगळी खासीयत!

भाई कलेशी इतके प्रामाणिक, की ते मैफिलीच्या आदल्या दिवशी आरोलकरांच्या घरी गेले आणि म्हणाले, "बुवा, उद्या आपल्याबरोबर वाजवायचंय. आत्ता बसुया का जरा वेळ? आपल्याला काय हवं-नको ते सांगा!" इथंच भाईंची संगीतकलेविषयीची तळमळ दिसते!

भाईंचं नाव एकल तबलावादनात विशेषत्वानं घेतलं जातं. भीमण्णा जसे यमन गाताना त्याच्या ख्यालातून तो राग सुंदरपणे दाखवतात, त्यांचे विचार मांडतात, तसंच आहे एकल तबलावादनाचं. एकल तबलावादनात एखाद्या कलाकाराचा तबल्यातील विचार दिसतो. त्याची दृष्टी कशी आहे तेही कळतं. हाताची तयारी दिसते. लयीवरचं प्रभुत्व जाणवतं.

आयुष्यभर तबल्यावर केलेला विचार, चिंतन आणि रियाज ह्या सगळ्या गोष्टी भाईंच्या एकल तबलावादनातून पुरेपूर दिसतात. मंडळी, भाईंचं एकल तबलावादन म्हणजे अक्षरशः एखादा यज्ञ सुरू आहे असं वाटतं. नादब्रह्मच ते! अहो, धीऽ क्ड्धींता तीत् धागे धीं.... त्यासारखा पेशकार नुसता सुरू झाला तरी सभागृह भारून जातं. भाईंचा पेशकार सुरू झाला की एखादा सार्वभौम राजा सोन्याची अंबारी असलेल्या हत्तीवर बसून जात आहे आणि दुतर्फा माणिकमोती उधळत आहे असं वाटतं!

धींऽ धाऽग्ड् धा तत् धाऽग्ड्धातीं ताक्ड् ता तत् धाग्ड्धाहाही पेशकाराचाच एक प्रकार. थिरखवाखॉंसाहेबांनी तो बांधला आहे. खेमट्या अंगाचा तो पेशकार. खेमटा हा लोकसंगीतातील तालप्रकार. रागसंगीताचं, शास्त्रीय संगीता चं मूळ हेच कुठेतरी आपलं लोकसंगीत आहे! तो पेशकार जेव्हा भाईंच्या हातातून वाजू लागतो तेव्हा सभागृह अक्षरशः डोलू लागतं. काय हाताचं वजन, किती दाह्याबाह्याचं सुरेख बॅलन्सिंग़! दादर्‍या  अंगाचा रेला हा तर केवळ भाईंनी वाजवावा! त्यांचं रेला वाजवताना लयीवरचं आणि अक्षराच्या निकासावरचं प्रभुत्व पाहिलं की थक्क व्हायला होतं. भाईंची पढतही रंजक आणि नाट्यपूर्ण असते, ऐकत राहावीशी वाटते. अहो, तबल्यावरचे हातदेखील देखणे दिसले पाहिजेत असं भाई म्हणतात.

‘संगीताचार्य’ पुरस्कार स्वीकारताना भाई गायतोंडे“भाईंनी वेगवेगळ्या गतींना, बंदिशींना काव्य मानलं आहे. ही बंदिश बघ, ही गत बघ. अरे यार, सुरेख कविता आहे रे ही” असं भाई म्हणतात. आणि खरंच मंडळी, अशा अनेक कविता भाईंच्या हातात सुरक्षित आहेत.

भाईंचा आपल्या गुरूंव्यतिरिक्त, घराण्याव्यतिरिक्त इतरही अनेक दिग्गजांचा आणि घराण्यांचा अभ्यास आहे. भाई आमिर हुसेनखॉंसाहेबांकडे कधी शिकले नाहीत, पण खॉंसाहेबांचा भाईंवर फार जीव! अल्लारखॉंसाहेबांचं भाईंवर प्रेम होतं. कुमारांनी भाईंच्या तबल्यावर मनापासून प्रेम केलं. उस्ताद झाकीर हुसेन, सुरेश तळवलकर, विभव नागेशकर यांच्यासारखी दिग्गज मंडळी भाईंना मानतात.

अर्जुन शेजवळांसारखे थोर पखवाजिया भाईंचा आदर करत. अलिकडच्या पिढीतले ओंकार गुलवडी, योगेश समसी यांच्यासारखे गुणी तबलजी भाईंकडे आदर्श म्हणून पाहतात. याचं कारण एकच. ते म्हणजे भाईंचा रियाज आणि तबल्यावरचा विचार.

मंडळी, आमचे भाई स्वभावानंही साधे, निगर्वी आणि प्रसिध्दीप्रमुख आहेत. उषाकाकूही अगदी साध्या आहेत. भाईंचे चिरंजीव डॉ. दिलिप गायतोंडे हे ठाण्यातले यशस्वी नेत्रशल्यविशारद आहेत. तेही छान पेटी वाजवतात. त्यांनी पं. बाबुराव पेंढारकरांकडे पेटीची रीतसर तालीम घेतली आहे.

भाई तबल्याची विद्या सर्व शिष्यांना गेली अनेक वर्षे मुक्तहस्ते वाटत आहेत. ते नेहमी सर्वांना सांगतात, "बाबांनो, माझ्याकडे जे काय आहे ते मी द्यायला, वाटायला तयार आहे. तुम्ही या आणि घ्या!" भाई स्वतःदेखील आत्ता आत्तापर्यंत पुण्याच्या लालजी गोखल्यांकडे मार्गदर्शनाकरता जायचे. लालजी आता नाहीत.

भाईंचा स्टॅमिना आणि उत्साह वयाच्या पंचाहत्तरीतदेखील वाखाणण्याजोगा आहे. भाईंनी भारतभर तबल्याच्या अनेक शिबिरांत, प्रात्यक्षिक-व्याख्यानासारख्या कार्यक्रमांत उपस्थिती लावली आहे. त्यांनी त्यांचे विचार लोकांना ऐकवले आहेत. भाई काही काही वेळेला जोडून सुट्टी वगैरे आली की सर्व शिष्यांना घेऊन बाहेरगावी जातात. तिथं त्यांच्याकडून तीन-तीन दिवस रियाज करून घेतात. जगन्नाथबुवांनी भाईंकडून असाच रियाज करून घेतला होता. भाई तेच करत आहेत. गुरू-शिष्य परंपरा!!

मला भाईंचं खूप प्रेम मिळालं. भाई गाण्यातल्या, तबल्यातल्या अनेक गोष्टींवर माझ्याशी भरभरून बोलले आहेत. ते मी कधीही भेटलो की कौतुकाने "काय तात्या, काय म्हणतोस" असं विचारणार. मग मी हळूच त्यांचं पान त्यांना देणार. मग मला म्हणणार, “क्या बात है! आणलंस का पान! अरे, पण तंबाखू फार नाही ना घातलास?”

पत्नी उषासह भाई गायतोंडे. डावीकडून नात पल्लवी, जावई सुनील, मुलगी उर्मिला, सून डॉ. अरूणा गायतोंडे, मुलगा डॉ. दिलीप गायतोंडे आणि नात डॉ. मिथिला आणि केतकी.मी त्यांच्या एकल तबलावादनात त्यांच्या मागे अनेकदा तंबोर्‍याला बसलो आहे. ते तंबोरा छान लागला की लगेच "क्या बात है" असं म्हणून कौतुक करणार! इतक्या मोठ्या मनाचे आहेत आमचे भाई. माझा बंदिशींचा कार्यक्रम ठाण्यात झाला होता. ते त्याला आवर्जून आले होते. त्यांनी "चांगल्या बांधल्या आहेस बंदिशी" असं कौतुक केलं आणि पाठीवरून हात फिरवला. "नेहमी असंच काम करत राहा" असं प्रोत्साहनही दिलं!

मंडळी, मी भाईंशी अनेकदा बोललो आहे. पण बोलता बोलता भाई मनानं कोल्हापुरात जातात आणि पुन्हा एकदा हा शिष्य जगन्नाथबुवांच्या आठवणीनं हळवा होतो. स्वतःच्या वडिलांचादेखील मृत्यू अगदी धीरानं घेणारा हा माणूस, पण जगन्नाथबुवा गेले तेव्हा मात्र हमसाहमशी रडला होता. त्यांचे डोळे पाणावतात. मला म्हणतात, "कोणाच्याही मृत्यूचं विशेष काही नाही रे, तात्या. तो तर प्रत्येकाला येणारच आहे, एके दिवशी. पण जगन्नाथबुवा गेले तेव्हा असं वाटलं, की आपल्याला काही अडलं तर विचारणार कोणाला? हे चूक-हे बरोबर, असं कर-असं करू नको हे सांगणारं कोणी राहिलं नाही रे, तात्या. असं वाटतं, की पुन्हा एकदा जगन्नाथबुवांसमोर बसावं आणि अक्षरांचा रियाज करावा, अगदी त्यांचं समाधान होईपर्यंत!"

- तात्या अभ्यंकर, ९००४२२२६४०

भाई गायतोंडे- ०२२ – २५४७५२९५,

drdilipgaitonde@gmail.com

पुरस्‍कार आणि सन्‍मान –

ताल विलास– संगीत पिठ सूर-सिंगर संसद (1992)
स्‍वर साधना रत्‍न– स्‍वर साधना समिती, मुंबई (1993)
कोकण कला भूषण– कोकण कला अकादमी, मुंबई (1993)
नादश्री – हिंदुस्‍तान संगीत कलाकार मंडळी, बंगळूर (1998)
संगीत नाटक अकादमी पुरस्‍कार 2002– संगीत नाटक अकादमी, नवी दिल्‍ली (2003)
मनाद संगीताचार्य – अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई (2004)
वोकेशनल एक्‍सीलन्‍स अॅवॉर्ड–रोटरी क्‍लब ऑपु ठाणे (2004)
कलाश्री पुरस्कार 2005– कलाश्री संगीत मंडळ, सांगवी, पुणे (2005)
संगीत भूषण पंडित राम मराठे स्‍मृती पुरस्‍कार 2005 – भारत गायन समाज, पुणे (2005)
संगीत कलारत्‍न 2006 – संगीत कलाकेंद्र, आग्रा (2006)
मानपत्र 2010– लायन्‍स क्‍लब इंटरनॅशनल डिस्‍ट. 332 ए2 भारत
गुरू सन्‍मान अर्पण 2010– भातखंडे संगीत संस्‍था, दिमेड विद्यापिठ, लखनऊ
सवाई गंधर्व संगीत महोत्सवात सत्‍कार (2010)– आर्य संगीत प्रसारक मंडळ, पुणे यांच्‍याकडून
संगीत भूषण पंडित राम मराठे स्‍मृती पुरस्‍कार 2011– ठाणे महानगरपालिकेकडून

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.