हरियाली - निसर्ग फुलवण्यासाठी

प्रतिनिधी 16/09/2011

झाडे ही ऋषितुल्य साधना करणारे समाजमित्र आहेत. हिरवीगार वनश्री हवा शुद्ध करते; एवढेच नव्हे, तर डोळ्यांना सुखद थंडावा अनुभवायचा असेल तर दिवसच्या दिवस जंगलातून पदभ्रमण करायला हवे! वाढत्या शहरी जीवनात आपण निसर्गापासून दूर जाताना झाडांना पारखे होत आहोत. शतकानुशतके तग धरून असलेले शेकडो जातींचे वृक्ष आपणांस अपरिचित आहेत.

‘कदंब तरुना बांधून झोके...... उंचखालती झोके........’ अशी गाणी ऐकताना ‘कदंब’ आपल्या डोळ्यांपुढे येत नाही, कारण तो आपणास अपरिचित असतो आणि गाणे ऐकून आपण सुखावतो ते कल्पनेनं; पण गोल काटेरी सुबक फळे, अंगावर मिरवणारा कदंब आपण पाहिलेला असेल तर त्या गाण्याचा प्रत्यय अधिक खोलवर येऊ शकतो आणि हिरवाईचा सुखानंद प्रदीर्घ काळ टिकू शकतो. मुचकुंदाचे सोनेरी तांबडे फूल व त्याचा थोडासा उग्र तरी सुखद हवाहवासा गंध ही झाडे शहरांतून नाहीशी झाल्याने स्मृतीतच उरला आहे!

मानवाने वृक्षांचा भरपूर उपयोग करून घेतला, जंगले तोडून लाकडी सामानाने घरे सजवली, परंतु तो पुढील पिढ्यांसाठी आणखी खूप झाडे लावण्याचे विसरला!

या संदर्भात मुंबईजवळच्या ठाणे येथील ‘हरियाली’ या संस्थेचे कार्य डोळ्यांसमोर येते. ही संस्था वृक्षसंवर्धन व पर्यावरणजतन या क्षेत्रांत अनेकविध उपक्रम हाती घेऊन गेली एकोणीस वर्षे कार्यरत आहे.

‘हरियाली’ ही संस्था अनेक दृष्टींनी अनोखी आहे. विचार करा विश्वाचा, नियोजन करा राष्ट्राचे आणि कार्य करा स्थानिक परिसरामध्ये! (‘Think Globally, Plan Nationally And Act Locally’) हे संस्थेचे ध्येयच बोलके आहे. मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड आणि त्यांचे संगोपन, पर्जन्यजलसंवर्धन आणि पर्यावरणविषयक जनजागृती करत राहणे यावर संस्थेचा भर आहे. संस्था व्यापक प्रमाणावरील जनसहभाग आणि श्रमदान हे आपले ब्रीद मानते.

संस्थेची माहिती घेण्यासाठी सतीश आठल्ये या कार्यकर्त्याची मदत झाली. तो मुंबई महानगरपालिकेत पाणी खात्यात उच्च अभियंता असून, संस्थेचे काम गेली काही वर्षे नोकरीधंदा सांभाळून मुलुंड परिसरात काम करत आहे. पूनम संघवी हे ठाण्यातील ज्येष्ठ व्यावसायिक, ‘हरियाली’ संस्थेचे संस्थापक असून त्यांचे मार्गदर्शन कार्यंकर्त्यांना उपलब्ध असते.

आपण झाडे लावावीत असे सा-यांनाच वाटते. मात्र, झाडे कुठे, केव्हा, कोणती आणि कशी लावावीत असे प्रश्नचिन्ह सगळ्यांसमोर उभे राहते. मग त्याच्यात येणा-या अडचणी बघता लोकांचे संकल्प हे प्रत्यक्षात उतरण्याआधीच विरतात. ‘हरियाली’ याच ठिकाणी लोकांना कार्यप्रवृत्त करते.

पावसाळ्यात सुरुवातीला विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि इतर निसर्गप्रेमी लोकांना बरोबर घेऊन ठाण्याच्या जवळपासच्या डोंगरावर बियांची नुसती पखरण करत पेरल्या जातात. शनिवार-रविवार आणि इतर सुट्यांच्या दिवशी हे काम केले जाते. संस्था इतर अनेक उपक्रम राबवते. पण पूनम सिंघवी दरवर्षी पावसाळा सुरू होताना ‘एक तरी रुजवावी बी’ असे आवाहन लोकांना करतात. त्या आवाहनाला लोकांच्या सहभागाने चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

‘हरियाली’चे कार्यकर्ते वर्षभर विविध झाडांखाली पडलेल्या बिया गोळा करत असतात. संस्थेतर्फे ‘बिया-वाटपा’चा कार्यक्रम पावसाळ्याच्या बेताला करण्यात येतो. भारतात उगवणा-या विविध झाडांच्या बिया, प्रत्येकी सुमारे पन्नास ते साठ छोट्या पिशवीत भरून वाटल्या जातात. पिशवीवर ‘हरियाली’चा संदेश असतो. या बिया घरात छोट्या कुंड्यांतून वाढवून त्यांची थोडी रोपे झालेली झाडे भोवतालच्या परिसरात लावली जातात. सध्या विविध क्षेत्रांतील वनवासी विद्यार्थ्यांकडून बिया गोळा केल्या जातात. त्यांचा मोबदला विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी उपयोगी पडतो. संस्था बांबू, करंज, बेहेडा, जांभूळ अशी अनेकविध झाडे लावण्याचा प्रयत्न अनेक वर्षे करत आहे.

संस्थेला ठाणे महानगरपालिकेने आपल्या बागांमधील एका ठिकाणी रोपवाटिकेसाठी जागा दिलेली आहे. संस्था तिथे तयार केलेली रोपे आपल्या परिसरातील उघडेबोडके डोंगर, उजाड रस्ते आदि ठिकाणी श्रमदानानेच लावत असते.

बीजसंकलन आणि त्याचे वाटप आणि रुजवण व्यापक प्रमाणावर करण्यासाठी संस्था वारकरी, शिर्डीला पायी चालत जाणारे साईभक्त अशा वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग करून घेते. संस्थेची ही संकल्पना महाराष्ट्राबरोबरच गुजरात, केरळ, कर्नाटक, इत्यादी राज्यांतदेखील मूळ धरू लागली आहे.

पर्यावरणाविषयी जागृती करण्यासाठी संख्या जंगलवाचन सहली, पक्षी-निरीक्षण, नदी-परिक्रमा, पावसाळी सहली, वृक्ष- वनस्पती परिचय, असे काही उपक्रम राबवत असते. ‘गणेशोत्सव व हरियाली जन जागरण कलश उपक्रम’ उत्सव हा अभिनव आहे. संस्था देवापुढे खोके ठेवते, त्यात लोक पैसे टाकतात. खोक्यांवर हरियालीचा वृक्षसंवर्धनाचा संदेश असतो. खोक्यांत जमा झालेली रक्कम विविध उपक्रमांसाठी वापरली जाते.

मुलुंडमध्ये सतीश आठल्ये यांनी संस्थेची ‘नर्सरी’ दाखवली. एक व दोन वर्षे पाणी व खत घालून वाढवलेली झाडे मोफत वाटपासाठी रांगेने लावून ठेवली आहेत. सावर, गुलमोहोर, आंबा, आवळा, चिंच, बहेडा, अशोक... असे तीस ते चाळीस प्रकारचे वृक्ष बिया लावून, खत-पाणी घालून वाढवलेले आहेत. हे वृक्ष वृक्षप्रेमींना ‘विनामूल्य’ दिले जातात. वृक्षलागवडीच्या वेळी ‘हरियाली’ चे प्रतिनिधी हजर राहतात. खड्डे केवढे खोल हवेत, पाणी कधी व किती घालावे याबाबत मार्गदर्शन दिले जाते. खरे तर, पावसाळा संपताना म्हणजे सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात वृक्षलागवड करायला हवी, पण ही सामाजिक जाण आहे का? असा प्रश्न आठल्ये करतात.

‘हरियाली’कडे सुमारे तीन हजार झाडे लागवडीसाठी तयार आहेत. आठल्ये म्हणाले, की ही झाडे म्हणजे समाजाच्या त्यासाठी असलेल्या प्रेमाची, निसर्गजाणिवेची प्रतीक आहेत. कारण अनेकांनी त्यासाठी दुधाच्या रिकाम्या पिशव्या संस्थेला दिल्या. शाळेतील बाळ-हातांनी त्यात खतमाती घेतली, बिया/फांद्या खोवल्या. महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी श्रमदान करून त्या फुलवल्या. निवृत्त वृद्ध व्यक्तींनी उन्हाळ्यात झाडांस पाणी घातले. कार्यकर्त्यांनी सावली केली, काळजी घेतली, हे कार्य जागवण्याचा व फुलवण्याचा प्रयत्न केला. ही रोपे सदैव वृक्षप्रेमींची, वृक्षारोपणउत्सुक व्यक्तींची वाट पाहत आहेत. त्यांना त्यांच्या घराजवळ/कार्यालयाजवळ हक्काची व प्रेमाची जमीन हवी आहे. त्यांचा आधार हवा आहे. तुम्ही आहात का वृक्षप्रेमी? वाट न बघता, तुमच्या घरच्यांशी अथवा कार्यालयातील मित्रांशी सल्ला-मसलत करून फक्त फोन उचला व बोला...... ‘झाडे हवी आहेत, निसर्ग फुलवायला, जपायला, जगवायला!'

सर्व थरांतील व्यापक जनसहभाग, श्रमदान, टाकाऊतून टिकाऊ निर्मिती इत्यादी तंत्रांचा वापर करत असल्यामुळे संस्थेचे सारे कार्य पैशांचा कमीत कमी वापर करून होत असते.

भातसा परिक्रमा, कथा एका बुधाची-पाण्याच्या व्यथेची, ठाणे शहरातील पावसाळी पूरसदृश परिस्थितीचे नियंत्रण, एक वसा हरियालीचा अशा वेगवेगळ्या ध्वनी-चित्रफिती (डॉक्युमेंटरीज) व अहवाल ‘हरियाली’ने प्रसिद्ध केले आहेत.

संस्थेला पुरस्कार प्राप्त झाले. त्यांतील काही उल्लेखनीय:

* जे अॅण्ड जे इंटरनॅशनल लि. तर्फे पर्यावरणरक्षणातील पुढाकारासाठी (2002)

* अखिल भारतीय विज्ञान परिषदेतर्फे पर्यावरणरक्षणातील शास्त्रीय दृष्टिकोनासाठी (2003)

* वेगवेगळ्या रोटरी आणि लायन्स क्लबतर्फे पर्यावरणरक्षणातील पुढाकारासाठी (2004 ते 2010)

* ठाणे महानगरपालिकेतर्फे ‘ठाणे गौरव’ व ‘गो ग्रीन’ पुरस्कार (2006. 2010)

* नगरविकास मंचतर्फे ‘ठाणे नगररत्न पुरस्कार’ (2007)

* महाराष्ट्र सरकारतर्फे ‘मानद वन्यजीव रक्षक’ म्हणून नेमणूक (2006)

* स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती पुरस्कार (2008)

सतीश हर्डीकर- भ्रमणध्वनी:9869222958,

संस्‍थेचा पत्‍ता - 5फ्लॉवरव्हॅली, इर्स्टर्नएक्सप्रेसहायवे, ऑफिस: 25474119/25408661,

इमेल: hariyali@mtnl.net.in , hariyalithane@yahoo.com , info@hariyalithane.com ,

प्रा. पूनम संघवी (संस्‍थापक) - ठाणे- भ्रमणध्वनी : 9323291890, इमेल : punamsingavi@mtnl.nct.in 

सतीश आठल्ये - मुलुंड -भ्रमणध्वनी : 9820832240

वाय.बी.भिडे (अध्‍यक्ष) - भ्रमणध्वनी : 9819522706, इमेल :  ybbhide@yahoo.co.in

Last Updated On - 1 July 2016

लेखी अभिप्राय

हरियाली तर्फे राबवले जाणारे उपक्रम खरोखरच स्तुत्य आहे. प्रत्येकाने यात सहभागी झाल्यास दिसणारे चित्र काहीसे वेगळे असेल. मला आपल्या उपक्रमांत सहभागी होण्याची संधी मिळाल्यास मी पूर्ण योगदान देण्याचा प्रयत्न करेन.

संदेश शिवराम कुडतरकर16/06/2015

अतिशय सुंदर हरियाली. तुम्हाला तुकोबाराय समजले.

रवींद्र ढमाले01/07/2016

Kup sundar kam aahe aaple. abhinandan. pudhil vatchalis subechha.

Prana samajik …01/07/2016

Apla upkarm far chan ahe .Me pan aaplya. Upkarma made sahabagi hou echite. Thanx.

Dr Nadaf Samin…02/07/2016

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.