कास ध्येयासक्त, प्रेरक शिक्षकवर्गाची

प्रतिनिधी 01/11/2011

- स्वामीनाथन एस.ए.अय्यर

सरकारी शाळांमध्ये लोकांना आपला स्वत:चा पैसा खर्च होतो असे वाटत नाही. सरकार प्रत्येक विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर जेवढा खर्च करते तेवढ्या रकमेची त्याऐवजी प्रत्येक पालकाला व्हाऊचर दिली आणि त्यांनी आपल्या पाल्याला मान्यताप्राप्त कोणत्याही शाळेत प्रवेश घ्यावा अशी मुभा दिली तर त्यामुळे अनेक गोष्टी घडू लागतील, असा उपाय तंत्रविज्ञान संशोधक स्टीव्ह जॉब्स यांनी सुचवला होता. आपल्याकडील शैक्षणिक परिस्थिती जॉब्सने अमेरिकेतील जी परिस्थिती वर्णन केली, त्यापेक्षा भयंकर आहे. त्यामुळे शैक्षणिक व्हाऊचर्सची कल्पना आपल्याकडे अधिक प्रभावी ठरू शकेल.
 

- स्वामीनाथन एस.ए.अय्यर

(स्वामीनाथन एस.ए.अय्यर हे मोठे अर्थतज्ञ. ते गेली अनेक वर्षे रविवारच्या ‘टाइम्स ऑफीस इंडिया’ त स्तंभ लिहितात आणि तो सर्वत्र ओढीने वाचला जातो. त्यांनी ‘टाइम्स’मध्ये लिहिलेल्या (12 ऑक्टो.2011) स्फुटा आधारे पुढील मजकूर संकलित केला आहे.)
 

माझा समान संधी उपलब्ध असण्यावर फार विश्वास आहे. फलनिष्पत्ती समान आहे की नाही हे बिनमहत्त्वाचे असते. परंतु समान संधीमधून शिक्षणाचा प्रसार मोठा होऊ शकतो. मी तर म्हणेन की, मुलाला कुटुंबजीवन नसले तरी चालेल परंतु शिक्षणाची संधी उपलब्ध हवी. याबाबतीत आपला देश खूप कमी पडतो. मला आठवतं, की मी शिकत असताना मला जर दोन-तीन चांगल्या व्यक्ती भेटल्या नसत्या आणि त्यांनी त्यावेळी माझ्या बरोबर वेळ घालवला नसता तर मी तुरुंगातच दिसलो असतो!
 

आपल्या काळातला मोठा तंत्रविज्ञान संशोधक स्टीव्ह जॉब्स याने माहितीतंत्रज्ञान सर्वसामान्यांपर्यंत नेले. त्यालाही वाटे, की समान संधी उपलब्ध व्हायच्या तर उच्च दर्जाचे शिक्षण प्रथम मिळाले पाहिजे. यासाठी त्याने ‘एज्युकेशनल व्हाऊचर्स’ पालकांना देण्याची कल्पना मांडली. पालकांनी ती त्यांना हवी त्या शाळांमध्ये वापरावी. (Jobs' viewsat http://americanhistory.si.edu/collections/comphist/sj1.html )

शिक्षणव्यवस्थेत शिक्षक ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. पण मग चांगले शिक्षक इतके कमी का? तर त्याचे उत्तर आहे ‘शिक्षक संघटना!’ शिक्षणात कामगार संघटनेचे बीज आले ती सगळ्यात वाईट गोष्ट होय. कारण तेथे गुणवत्तेचा अंत होतो आणि नोकरशाहीचा आरंभ होतो. तेच घडून आले. कोणाला शिक्षाच होऊ शकत नाही. काम करणे ही भयंकर गोष्ट ठरते!
 

संगणक आणि इलेक्ट्रॉनिक शिक्षणसाधने वापरून या प्रश्नावर मात करता येईल का? तर जॉब्स म्हणतात, “जगात कोणीही दिले नसतील एवढे संगणक मी शाळाशाळांतून दिलेले आहेत आणि माझी खात्री होऊन गेली आहे, की संगणक ही काही शिक्षणातील महत्त्वाची गोष्ट नव्हे. तेथे हवी व्यक्ती. संगणक प्रतिसाद देऊ शकतात; प्रेरक ठरू शकत नाहीत.”
 

मग उत्तम, ध्येयासक्त शिक्षक कसे निर्माण करायचे? जॉब्सकडे त्याबद्दलही उत्तर आहे. तो म्हणतो, की शाळाशाळांतून स्पर्धा लागली पाहिजे, विद्यार्थ्यांना खेचण्याची आणि शिक्षकांनाही! तेथे सरकारी पैशांवर चालणार्‍या शाळा कामाच्या नाहीत. जॉब्स म्हणतो, की “शिक्षणामध्ये व्हाऊचर्स पद्धत आणली पाहिजे. तेथे ग्राहक आहेत ते पालक. पण त्या पालकांनाच वार्‍यावर सोडले जाते. आता माताही मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देऊ शकत नाहीत किंवा पालक-शिक्षकांच्या बैठकीस जाऊ शकत नाहीत. शाळांची संस्थाने झालेली आहेत आणि पालक आपल्या स्वत:च्या नोकरीधंद्यात व्यग्र आहेत.”
 

ग्राहक निष्प्रभ झाला आणि संस्थाधिपतींचा वरचष्मा वाढला तर जे घडायचे तेच आपल्या शिक्षणपद्धतीत घडले आहे, शिक्षणाचा दर्जा पूर्ण घसरला आहे. सध्याच्या सरकारनियंत्रित शिक्षणपद्धतीमुळे सरकारी अधिकार्‍यांना अथवा संस्थाचालकांना शिक्षणाच्या दर्जाची फिकिर नसते. त्यांना तशी गरजदेखील वाटत नाही.
 

सरकारी शिक्षणात उधळपट्टी कशी होऊ शकते याबद्दल जॉब्सने दिलेला दाखला बोलका आहे. अमेरिकेत सरकार शिक्षणावर अफाट खर्च करते. प्रत्येक मुलावर दरवर्षी चार हजार चारशे डॉलर्स. ही रक्कम छोटी गाडी विकत घ्यायची तर तिच्या वार्षिक हप्त्याच्या दुप्प्ट आहे. पण सरकार शिक्षणावरील जेवढा खर्च करते तेवढा तो कुटुंबाच्या आवाक्यातला नसतो. तुम्ही बाजारात गाडी विकत घ्यायला जाता तेव्हा तुमच्यासमोर वेगवेगळ्या मॉडेल्सचे पर्याय असतात. त्यासंबंधी भरपूर माहिती उपलब्ध करून दिली जाते. त्यांच्यात स्पर्धा असल्यामुळे मॉडेल्समध्येही दरवर्षी सुधारणा होत जातात आणि गाडी विकत घेताना तिच्या दर्जाबद्दल हमी (वॉरंटी) दिली जाते. सरकारी शाळांमध्ये लोकांना आपला स्वत:चा पैसा खर्च होतो असे वाटत नाही. सरकार प्रत्येक विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर जेवढा खर्च करते तेवढ्या रकमेची त्याऐवजी प्रत्येक पालकाला व्हाऊचर दिली आणि त्यांनी आपल्या पाल्याला मान्यताप्राप्त कोणत्याही शाळेत प्रवेश घ्यावा अशी मुभा दिली तर त्यामुळे अनेक गोष्टी घडू लागतील.

1.शाळा मुलांना आकर्षित करण्यासाठी मार्केटिंग करू लागतील.
 

2.अनेक नवीन शाळा सुरू होतील. नव्याने पदवीधर झालेले. ध्येयप्रेरित विद्यार्थी नवीन उद्योग करण्यापेक्षा नवीन शाळा सुरू करतील.

3.सरकारी शाळांचा दर्जासुद्धा स्पर्धेमुळे सुधारेल.

जॉब्स यांची ही योजना भारतातही उत्तम रीत्या लागू पडू शकेल. आपले शैक्षणिक धोरण डाव्या तत्त्वविचाराने भारलेले असते. राजकारण्यांनादेखील सर्व शिक्षणसेवा सरकारच्या ताब्यात हवी असे वाटते. मात्र त्यांच्यापैकी कोणीही शिक्षक संघटनेला सामोरे जाऊ शकत नाही.
 

आपल्याकडील शैक्षणिक परिस्थिती जॉब्सने अमेरिकेतील जी परिस्थिती वर्णन केली आहे त्यापेक्षा भयंकर आहे. त्यामुळे शैक्षणिक व्हाऊचर्सची कल्पना आपल्याकडे अधिक प्रभावी ठरू शकेल.

दिनांक - 01 नोव्हेंबर 2011

संबंधित लेख -

‘व्यासपीठ’:
मुलांच्या भाषेचा आदर करुया!
सरकारी शाळा, इंग्रजी शाळा आणि आपण ...
 
शाळाबाह्य मुले- यशोगाथा आणि आव्हाने
मुख्याध्यापकांची थेट भरती केली तर?

{jcomments on}

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.