अठरा विश्वे

प्रतिनिधी 23/11/2011

‘अमुक एका गृहस्थाच्या घरी अठरा विश्वे दारिद्र्य आहे’ असा वाक्प्रचार आहे. त्यावर चर्चा होऊन अठरा गुणिले वीस (विश्वे) म्हणजे तीनशेसाठ असा अर्थ करून वर्षातले तीनशेसाठ दिवस त्याच्या घरी दारिद्र्यच आहे असा केला गेला. त्यात वीसचे विश्वे कसे झाले हे समजत नाही. वीसचे अनेकवचन लोकभाषेत विसा असे होते. ते ‘तीन विसा आणि साठ सारखेच’ या वाक्प्रचारात दिसते. पूर्वी वयही विसात सांगत : ‘चार विसा आन पाच वरसा झाली.’ तेव्हा ‘अठरा विश्वे’तील विश्वे म्हणजे अठरा गुणिले वीस असा अर्थ करता येणार नाही.

यादव सिंघणदेव (द्वितीय) याच्या पाटण (आजचे पाटणादेवी, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव ) येथील शिलालेखात प्रख्यात गणिती भास्‍कराचार्य (द्वितीय) यांचा नातू चंगदेव याच्या मठासाठी जी दाने सोईदेव निकुंभ या सामंत राजाने दिली त्यात ‘ग्राहकापासी दामाचा विसोवा आसूपाठी नगरें दीव्हला’ असा उल्लेख आला आहे.’ यात ‘नगर’ म्हणजे व्यापार्‍यांची पंच समिती (गिल्ड). त्यांनी प्रत्येक ग्राहकामागे (त्याने दिलेल्या मूल्यामागे) प्रत्येक आसू (एक सुवर्ण नाणे) एका दामाचा विसोवा मठाला दिला. तेव्हा-

20 विसोवे = 1 दाम

24 दाम = 1 आसू

हे कोष्टक दिसते. दाम आणि विसोवा यांचा उल्लेख सियडोण शिलालेखात स्पष्टपणे आला आहे. त्या लेखात विष्णुदेवतेच्या गंध, दीप, धूप, लेप आदींसाठी विविध व्यापार्‍यांनी जी दाने दिली त्यात –

अ. पंचीय द्रम्म सत्क पादमेकं (ओळ 6)

ब. आटिक्राहद्रम्मस्य पादमेकं प्रदत्तं l

एतदर्थे मासान्मासं प्रति दीयमानं

पंचिय द्रम्मैमेकं सासनं लिखितं प.द्र. 1. ओळ 37-38

यावरून पाव दामाचे पंचीय द्रम्म नामक नाणे होते. अर्थात दामाचे वीस भाग होते. त्यालाच विशोपक म्हणत. त्याच लेखाच्या दहाव्या ओळीत देवाच्या धूप, दीप आदींसाठी ‘प्रतिवराहकथ विंसोपकैकं प्रतिदिनं वि’ दान दिल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. विंसोवक > विसोवा > विसवा हा अपभ्रंशक्रम दिसतो.

तेव्हा अठरा विसोवे (विसवे) दारिद्र्य म्हणजे नव्वद टक्के दारिद्र्य असा अर्थ सहजच ध्यानी येतो. पूर्वी लोक रुपया-आण्यांच्या मापात बोलत. आमचा एक मित्र अभिमानाने सांगत होता, ‘औरंगाबादचे चौदा आणे वकील मला ओळखतात.’ ‘प्रकृतीत दोन आणे उतार आहे’, ‘सोळा आणे काम झालं’ हे तर सर्वश्रुत आहे. तसेच हे अठरा विश्वे दारिद्र्य.

संदर्भ -

  1. 1. शं.गो.तुळपुळे, प्राचीन मराठी कोरीव लेख, पृ. 105-113
  2. 2. EI., I pp.162-170

ब्रह्मानंद देशपांडे – ‘ऐतिहासिक’, 14, अनुपम वसाहत, औरंगाबाद - 431 005

दूरध्वनी : (0240) 233 6606, भ्रमणध्वनी : 09923390614

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

‘अठरा विश्वे’ या शब्दप्रयोगाविषयी डॉ. ब्रह्मानंद देशपांडे ह्यांनी विसोवा ह्या नाण्याचा (‘भाषा आणि जीवन’, पावसाळा 2009) उल्लेख केला आहे, त्याला पुष्टी मिळेल असा दाखला मला ज्ञानेश्वरी च्या सहाव्या अध्यायात मिळाला. मन कसे चंचल आहे ते अर्जुनाने भगवंताला सांगितले आहे:

ह्मणौनि मन येक निश्चल राहीलlमग आह्मांसि साम्य येईल l

हें विस ही विश्वे न घडैलlतें एआ लागि ll 6.416 ll

(म्हणून मन थोडेसे निश्चल राहील, (आणि) मग आम्हांला समत्वबुद्धी येईल हे विसांतल्या वीसही विश्वांनी (म्हणजे – शंभर टक्के) घडावयाचे नाही, ते यामुळे(च) – (‘ज्ञानदेवी’, संपादक अरविंद मंगरूळकर, विनायक मोरेश्वर केळकर, खंड 1, पान 353)

विश्वा, विस्वा किंवा विसोआ हे नाणे होते आणि त्याचे मूल्य मोठ्या नाण्याच्या एक विसांश होते. ‘विस ही विश्वे’ म्हणजे वीसपैकी वीस, म्हणजेच शंभर टक्के.

ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायात ही तसाच उल्लेख आला आहे. ‘जय कोणाचा होईल?’ असे धृतराष्ट्राने संजयाला विचारले, पण त्याआधी आपला अंदाज सांगताना तो म्हणाला,

यर्‍हविं विश्वे बहुत एक lआमचें ऐंसें मानसिक l

जे दुर्योधनाचे अधिक lप्रताप सदा ll18.1609ll

विश्वे बहुत एक म्हणजे बव्हंशी, पुष्कळ टक्क्यांनी; ह्यावरून अठरा विश्वे दारिद्र्य म्हणजे नव्वद टक्के दारिद्र्य असा अर्थ प्रा. श्री.मा.कुलकर्णी ह्यांनीही दिला आहे. (‘संशोधन सुमने’, गुच्छ दुसरा, पान 152) आणि तो डॉ.ब्रह्मानंद देशपांडे ह्यांच्या स्पष्टीकरणाशी जुळतो.

विजय पाध्ये – 4 चित्रा ‘बी’, विद्यासागर सोसायटी, बिबवेवाडी, पुणे - 411 037

दूरध्वनी : (020) 2421 1951, भ्रमणध्वनी : 098220 31963, इमेल : v.padhye@gmail.com

Last Updated On - 16th Nov 2016

लेखी अभिप्राय

khup chan.abahar .cell.9987471650

k.ravi patrkar06/07/2013

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.