मुक्तता!

0
47

     प्रॅक्टिस सुरू करून बरीच वर्षं झाली. आमच्या नेत्रतपासणीच्या क्षेत्रात नवनवीन टेक्निक येत होती. बिनटाक्यांची मोतिबिंदू शस्त्रक्रिया (Phacoemulsification) नवीनच सुरू झाली होती. ऑपरेशनच्या त्या आधीच्या पध्दतीचे संस्कार मनावर व हातावर झालेले होते. ते पुसून तिथे नवे संस्कार करावे लागत होते. तेही करून झाले. त्यात स्वत:ला तरबेज केलं. त्यालाही काही वर्षं झाली.

     पुढे काय? काहीतरी थांबलंय, पुढे सरकत नाही अशी भावना निर्माण होऊ लागली. म्हणजे पेशंट येत होते, मी प्रॅक्टिस करत होते, ऑपरेशन करत होते, तरीही…

     आपल्याला नक्की काय पाहिजे ते समजेना.

     मग लक्षात आलं, की आपल्याला पुढे काहीतरी ध्येय असावं लागतं. 'ते मिळवायचं आहे' अशी मनाची अवस्था लागते. म्हणजे फार काही मोठं ध्येय- आयुष्याचं… असलं काही नाही, पण छोटंसं काहीतरी! असं काहीतरी पुढे असेल तर उत्साह असतो. रोजच्या जीवनाची ती प्रेरणा असते. नाहीतर बेचैन वाटतं.

     आमच्या क्षेत्रातलं नवीन काही शिकायचं तर त्यासाठी नवीन मशीन घ्यायचं, कर्ज काढायचं, ते शिकण्यासाठी अजून कुठेतरी जायचं आणि मग शिकलेलं ज्ञान व मशीन वापरण्यासाठी पेशंट मिळवायचे, शोधायचे. आपण मशीन बनवणार्‍या कंपन्यांच्या हातातलं बाहुलं आहोत का?

     माझा शोध सुरू होता.

     विज्ञान आहे, त्याची मदत मानवी जीवनाला आहे, पण ते अपूर्ण आहे. अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्यांची उत्तरं विज्ञानाकडे नाहीत. कदाचित आणखी काही वर्षांनी विज्ञान अधिक प्रगत होईल, पण ते पूर्णत्वाला जाईल असं वाटत नाही. माणसाला चष्म्याचा साधा नंबर का लागतो याचं उत्तर विज्ञानाकडे नाही. त्यामुळे आत्यंतिक काळजीनं त्रस्त अनेक पालक जेव्हा 'आमच्या मुलाला चष्मा का लागला? त्याचा नंबर का वाढतो?' असं विचारतात तेव्हा माझ्याकडे त्याचं वैज्ञानिक उत्तर नसतं! पेशंटचं शरीर व त्याचं मन यांतलं अगम्य नातं कोडं घालायला लागलं. अशाच विचारात शरीराचे कितीतरी रोग मनातून उगम पावतात असं दिसलं.

     कन्सल्टिंग रूममध्ये संध्याकाळी चार वाजता आत शिरलं की त्या बंद खोलीत पेशंटमागे पेशंट बघत संध्याकाळ कधी निघून जाते हे कळेनासं व्हायला लागलं. कन्सल्टिंग संपलं की एकदम काळीमिट्ट रात्र झालेली असायची. दिवेलागणीची, कातर हुरहुरीची वेळ, मुलं संध्याकाळी बाहेर खेळून घरी यायची वेळ- हे सगळं त्या कन्सल्टिंग रूममध्ये हरवून गेलं होतं!

     संध्याकाळच्या आकाशातले बदलणारे रंग, गच्च उजेडानंतर निवळणार्‍या केशरी, गुलाबी छटा, सोनेरी किरणांचा रंग, त्यांची ढगांना मिळालेली सोनेरी किनार, नंतर हळुहळू गडद निळ्या-जांभळ्या-काळ्याकडे झुकत, त्याचं पूर्ण काळया रात्रीच्या रंगात परिवर्तन… हे सगळं मी एवढी वीस वर्षं बघितलंच नाही! कन्सल्टिंग रूमच्या चार भिंतींपलीकडचं जग अनुभवायची ओढ भासू लागली.

     माझं वैद्यकीय क्षेत्र मला आवडत होतं. पण पेशंट तपासता तपासता, मी त्यांच्या शरीराबरोबर मनाचाही आढावा घेऊ लागले. त्यात गडचिरोलीच्या डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांचं काम बघायचा योग आला. एक डॉक्टर त्याच्या तपासणीच्या खोलीच्या चार भिंतींपलीकडे काय काय करू शकतो याची चुणूक दिसली! माझी लावलेली झापडं काही प्रमाणात गळून पडली. आदिवासी व गैरआदिवासी ग्रामीण भाग यांत जवळजवळ साडेतीनशे खेड्यांमध्ये बंग दांपत्याचं काम आहे. तिथल्या लोकांच्या जीवनाचं असं एकही अंग नाही, ज्याला त्यांनी स्पर्श केलेला नाही. त्यांचं आरोग्य तर सुधारलंच; पण शेती, व्यसनमुक्ती, युवाजीवन, स्त्रियांचे प्रश्न हे सगळंच त्यांनी हाताळलं. त्यांच्याबरोबर मी पण आदिवासी खेड्यांत थोडंसं काम केलं. त्यामुळे माझ्या भोवतीच्या मीच उभारलेल्या भिंतींमध्ये झरोके निर्माण झाल्यासारखे वाटू लागलं. मी समाजाशी जोडली जाऊ लागले.

     अशी, माझ्या भिंतींच्या झरोक्यांतून मी बाहेर डोकावत असताना माझ्यापुढे नवीन वाट उभी राहिली. एक तरुण मुलगी पेशंट म्हणून आली. ती पेंटिंगमध्ये मास्टर ऑफ फाइन आर्टस् करत होती हे कळलं. तिथं थिअरी कमी होती; चित्रंच जास्त काढायची होती. मनात उत्साहाचं वारं शिरलं. बघुया का, नवीन काहीतरी?

     लहानपणी, चित्रं काढायला आवडायचं. सारखी, मी हातानं काहीतरी रेखाटत असायचे, पण तेव्हा, त्यात पुढे काहीतरी करता येईल हे माहीत नव्हतं. माझ्या दृष्टीनं, चित्रकला ही फावल्या वेळात छंद म्हणून, विरंगुळा म्हणून करायची गोष्ट होती. त्यात करियर करता येतं अशी कल्पना नव्हती.

     तेव्हा छान मार्क मिळाले की डॉक्टर नाहीतर इंजिनीयर व्हायचं असतं असं माहीत होतं.

     माझ्या बाबतीत तसंच घडलं. मार्क छान मिळाल्यानं अॅडमिशनचा प्रश्न नव्हता. 'मेडिकल' खूप आवडलं. आम्हाला Ophthalmology (नेत्ररोग) हा विषय शिकवणारे सर छान शिकवायचे. त्यामुळे मीही पुढे तो विषय घेतला. पण मेडिकल- Ophthalmology – मुलं, संसार, करियर हे सगळं एवढ्या जलद गतीनं सुरू होतं, की त्यात 'फावला वेळ' असं काही शक्यच नव्हतं. त्यामुळे 'फावल्या वेळा'तील चित्रकला कुठेतरी हरवून गेली होती!

     आणि आता, या तरुण मुलीच्या रूपानं ती अचानक आयुष्याच्या एका वळणावर पुढे येऊन ठाकली होती! पण हिचं आताचं स्वरूप 'फावल्या वेळा'तलं नव्हतं. शनिवार-रविवारी दोन तास किंवा आठवड्याला कुठला तरी दिवस एखादा तास असा हा प्रकार नव्हता, तर हा एक पूर्णवेळ दोन वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम होता. ऑपरेशन करताना बोटांच्या नाजूक हालचालींवर पेशंटची दृष्टी

     अवलंबून असते, पण तरी त्याला 'शस्त्रक्रिया' म्हणतात. 'शस्त्रकला' म्हणत नाहीत. त्यात या, नको त्या वयात पुन्हा परीक्षा, अभ्यास असलं डोक्याच्या मागे लावून घ्यायचंय का?

     To solve a problem, first you need to create a problem असं माझं तत्त्वज्ञान. म्हणजे काय तर 'करके देखो!' मी चित्रकलेच्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतला. सकाळ-संध्याकाळ दवाखाना आणि दुपारी कॉलेज अशी कसरत सुरू झाली. प्रॅक्टिस करणारी डॉक्टर चित्रकला शिकायला येते म्हटल्यावर सगळ्यांच्या चेहर्‍यावर प्रश्नचिन्हं होती, पण माझ्याकडे त्यांची काही उत्तरं नव्हती. करावंसं वाटलं म्हणून करत आहे, एवढंच!

     कलेच्या क्षेत्रात बिचकत पाऊल ठेवलं आणि जीवनाला वेगळाच रंग चढला. तरुण मैत्रिणी, त्यांचं ते रसरशीत आयुष्य- मी त्यांच्यात मस्तपैकी सामावले! आतापर्यंत, मी कायमच वर्गात पुढे असायची. इथं अगदी उलट, त्यामुळे वर्गात मागे असणं हा अनुभवही मला नवीन होता.

     नवनवीन विषय उलगडत गेले. क्रिएटिव्ह लँडस्केप असा एक विषय होता. त्यात निसर्गात असलेले घटक वापरायचे होते. म्हणजे झाड, दगड, नदी, पाणी, गवत वगैरे. पण त्या सगळ्या घटकांना निसर्गाच्या सगळ्या नियमांतून मुक्त करायचं आणि आपल्याला हव्या तशा नव्या पध्दतीनं चित्रांत मांडायचं. उदाहरणार्थ, झाड उभंच असलं पाहिजे असं नाही. आडवी वाढलेली झाडं काढली तरी चालतात! एका चित्रात एकच सूर्य असं काही बंधन नाही. एका चित्रात दोन-तीन सूर्य असले तरी चालतात! झाडांना पाय फुटलेले. इमारतींना टेकून बसलेली झाडं. सर्व बंधनांतून सर्व आकार मुक्त.

     इतकं छान वाटलं हे स्वातंत्र्य! मेंदूचा हा भाग इतके दिवस वापरातच नव्हता. चित्राचा एक विषय प्रश्न म्हणून दिला की त्याला उत्तर म्हणून प्रत्येक मुलीचं उत्तर – म्हणजे चित्र वेगळं असायचं. विज्ञानाच्या वातावरणात घडलेल्या माझ्या मनाला हे गंमतीशीर वाटलं की, एका प्रश्नाला अनेक उत्तरं असू शकतात!

     पोट्रेट – व्यक्तिचित्र – काढायला लागले. वर्गात समोर एक मॉडेल बसवायचं आणि त्याच्याभोवती सर्व मुलींनी अर्धवर्तुळात घोडे मांडायचे. एकीकडे कुणाचा तरी ट्रान्झिस्टर लागलेला असायचा. कुणाचा तरी डबा सगळीकडे फिरत असायचा. कॅण्टिनचा पोर्‍या सगळ्यांना तिथं चहा आणून द्यायचा.

     कुठे गेली माझी ती मरगळ? उत्साहाचे झरे वाहू लागले होते. स्वत:ला व्यक्त करायला नवीन माध्यम मिळालं. अभिव्यक्तीचा नवा आविष्कार. मूर्त-अमूर्त सर्व काही! आपल्या भावना अमूर्त चित्रात व्यक्त करण्यात गंमत वाटू लागली.

     डोळ्यांची डॉक्टर असल्यानं माझं रंगांशी नातं होतंच, पण आता चित्रकलेची विद्यार्थिनी म्हणून रंगांशी नवीन नातं निर्माण झालं. 'iris' हा डोळ्यांतला स्नायूचा एक भाग. त्यात प्रत्येकाच्या डोळ्यांत वेगवेगळया प्रकारचं डिझाइन दिसतं. गोलाकार बाहुलीच्या भोवती ब्राऊन रंगाच्या छटा आणि त्यात अनेक आकार. काही खड्डे, काही उंचवटे. घार्‍या डोळयांमध्ये अजून वेगळया रंगांतलं डिझाईन. निळ्या, ग्रे, हिरव्या रंगांतलं. आतापर्यंत, डोळे तपासताना डोळ्यांतले फक्त रोग शोधायची सवय होती. आता निरोगी डोळ्यांतली चित्रं शोधू लागले.

     ऑपरेशन करताना रक्ताचा एखादा थेंब डोळ्यांच्या पृष्ठभागावरच्या पाण्यात पसरायचा. पसरताना त्याचे तरंग लालचुटूक रंगातलं छान अमूर्त चित्र तयार करायचे! डोळ्यांतल्या रक्तवाहिन्यांमुळेपण लाल रंगातली मस्त जाळीदार डिझाइन्स डोळ्यांत तयार व्हायला लागली.

     ज्यांना रंग ओळखता येत नाहीत- colourblind – असे काही पेशंट येतात. त्यांच्या डोळ्यांत त्या रंगपेशीच नसतात किंवा कमी असतात. त्यामुळे त्यांचा रंग ओळखताना गोंधळ होतो. मी त्यांच्याकडे सहानुभूतीनं बघू लागले. आम्ही चित्रकला शिकताना 'मोनोकलर' पध्दतीनं काही चित्रं रंगवायचो. म्हणजे चित्र एकाच रंगामध्ये रंगवायचं. फक्त कमीअधिक डार्क किंवा फिक्या छटा वापरून. अनेक रंगांत रंगवलेली चित्रं बघताना वाटायचं, colourblind लोकांना ही सगळी बघताना mono colour paintingsच दिसतात. त्यांच्या दृष्टीविषयी मला अधिक कुतूहल वाटू लागलं.

     माझ्या नजरेला सगळीकडे चित्रंच चित्रं, रंगच रंग दिसू लागले. वाटेतली झाडं, आकाशातले ढग, ओल्या मातीवर पसरलेल्या वाळक्या-हिरव्या पानांचा सडा, दारांच्या फटींतून आत शिरणारी प्रकाशाची तिरकी तिरीप- इथपासून तर पेशंटच्या डोळ्यांमधल्या रक्तवाहिन्या, रक्ताचे थेंब- सारेच तर चित्रांचे विषय! कुंचल्यानं काढले नाहीत तरी डोळ्यांना तर दिसताहेत.

     चित्रकलेच्या प्रांतात दालनामागे दालनं उघडत चालली होती. मजा म्हणजे मी माझे हे अनुभव माझ्या पेशंटनाही सांगत होते. त्यांच्याशी या सर्व गोष्टींची चर्चा करत होते. माझं माझ्या पेशंटशी नवीन नातं निर्माण झालं होतं. नवीन चित्र केलं की ते दवाखान्याच्या भिंतींवर लावलं जाऊ लागलं. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हदेखील त्यांच्या कंपनीच्या औषधांबद्दल कमी पण चित्रांबद्दल जास्त बोलू लागले.

     अभ्यासक्रम मजेत पूर्ण झाला. पुढे ध्येय होतंच. त्याच्या पूर्तीसाठी माझी वाटचाल सुरू झाली. अगदी निराळ्याच आनंदात न्हाऊन!

     माझ्या वैद्यकीय शिक्षणानं व वैद्यकीय व्यवसायानं माझ्याभोवती ज्या भिंती उभारल्या होत्या, त्या मी ओलांडल्या होत्या. माझ्या कन्सल्टिंग रूममध्ये मी रंगांचं आभाळ निर्माण केलं होतं. मी नवी मुक्तता अनुभवत होते!

     अभ्यासक्रमात बर्‍याचशा चित्रकारांची ओळख झाली होती. त्यांच्यावरची माहिती वाचनात आली. पुस्तकात छापलेली त्यांची चित्रं पाहून झाली. भारतीय व पाश्चिमात्य चित्रकारांबद्दलही माहिती मिळाली.

     चित्रकलेच्या क्षेत्रात नवनवीन ओळखी होत होत्या. त्यातच मिता नावाच्या उत्साही मुलीशी मैत्री झाली. तिलाही चित्रकलेची आवड. ती माझ्यासारखी जमेल त्या वेळात व जमेल तेवढी चित्रकार! दोन-चार भेटींमध्ये मस्त सूर जुळले. एक दिवस माझ्या कपाटात गुंडाळून ठेवलेल्या स्वप्नांकडे तिची नजर गेली आणि ती म्हणाली, 'चल, जाऊ या!' कुठे, ते दोघींना कळलं! पुढचे बेत ठरले.

     मी मुंबईहून विमानानं ब्रसेल्सला (बेल्जियम) पोचायचं व मितानं अमेरिकेहून ब्रसेल्सला पोचायचं. दोघींनी तिथंच एकमेकींना भेटायचं असं ठरलं. दोघींनीच सतत एकमेकींच्या बरोबर राहायचं असल्यानं एकमेकींची स्पेस जपणं आवश्यक होतं. ब्रसेल्स, ब्रुह्, पॅरिस, रोम, फ्लॉरेन्स, अॅमरस्टरडॅम करायचं ठरलं. तिथली चित्रांची सारी म्युझियम पालथी घालायचा बेत आखला.

     मिताच्या धाडसी स्वभावामुळे आम्ही कुठलंच बुकिंग केलं नव्हतं. आमच्या फ्लाईट्स दोन तासांच्या फरकानं ब्रसेल्सला पोचत होत्या. मी दोन तास आधी पोचून, सगळा जीव गोळा करून तिची वाट बघत बसले. सारं बुकिंग इंटरनेटवर करत गेलो. पॅरिसला राहायच्या जागेची जरा अडचण झाली. बाकी कुठेही अडचण आली नाही.

     सगळी म्युझियम साधारण पाच वाजता बंद व्हायची. दिवस मोठा होता. पाचनंतरचा वेळ आम्हाला कला सोडून इतर गोष्टी बघायला मिळत होता. एकदा म्युझियममध्ये शिरलो, की आम्ही वेगवेगळ्या व्हायचो. म्युझियम भलीमोठी असायची. त्यामुळे कोणाला त्यातलं काय व किती बघायचं, तेही वेगळं असणार होतं. आपापल्या वेगानं, आपापल्या रुचीप्रमाणे म्युझियम बघायचं. मधलं जेवण बरोबर. संध्याकाळी पुन्हा एकत्र. संध्याकाळी शहर भटकायचं- जेवढी ऊर्जा व उत्साह टिकला असेल त्याप्रमाणे!

     स्वप्न प्रत्यक्षात जगणं सुरू होतं. रोज कुणीतरी चित्रकार भेटत होता. साल्वादोर दाली बेल्जियममध्ये भेटला. पॅरिस तर काय- चित्रांची व चित्रकारांची खाणच होती. लूव्ह् महाकाय होतं. म्युझि द ओरसे Impressionist चित्रकारांनी भरलेलं. किती बघू आणि किती नाही, असं होत होतं! मनातल्या सर्व चित्रांची उजळणी होत होती. नवीन पण बरंच बघायला मिळत होतं. पिकासो– त्याच्या अनंत रूपांनी भेटला. रोम-फ्लॉरेन्स तर काय- त्यांचा वेगळाच नूर.

     प्रबोधन काळातले इतिहासजमा झालेले कलावंत पुढे आले. मायकेल एंजेलो, राफाएद, लिओनार्दो… संगमरवरी शिल्पांच्या दुनियेची दारं तिथं आमच्यापुढे उघडली गेली.

     अॅमस्टरडॅमला मॉण्ड्रियन भेटला. व्हॅन गॉचं म्युझियम म्हणजे चित्रकारांसाठी पंढरी! चित्रकलेचं वेड लागलेला तो वेडा- कलंदर माणूस! पंधरा दिवसांत भरपूर 'जगून' घेतलं. चित्रांत-शिल्पांत स्वत:ला बुडवून घेतलं.

     आम्हाला मोठा आधार होता, तो म्हणजे तंत्रज्ञानाचा! बरोबर लॅपटॉप, ब्लॅक बेरी व त्यावर GPS (Global Positioning System) होतं. त्यामुळे जी कोणती माहिती हवीशी वाटली ती आम्हाला त्या यंत्राद्वारे मिळत होती. म्युझियमचा पत्ता काय, ते कोणत्या वारी-किती वाजता उघडतं, कधी बंद होतं— एवढंच नाही, तर त्यात कोणती चित्रं आहेत, त्या कलाकारांची माहिती… सगळं चुटकीसरशी मिळत होतं. रेल्वे बुकिंग, हॉटेल बुकिंग त्यावरच. हिंडताना GPS मुळे रस्ते, अगदी आतल्या बारक्या गल्लीबोळांसह समजत होते. त्यामुळे बहुतेक ठिकाणी कुणाला फारसं काही विचारायची वेळ आली नाही. त्यामुळे कुठे फसवले जाण्याचाही प्रश्न नव्हता. आमच्या मनातल्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर मिळत होतं. अर्थात रोज आठवणीनं बॅटरी चार्जिंग वगैरे देखभाल करावी लागायची!

     चित्रं बघून डोळे थकायचे, त्यामुळे मेंदू काहीही घ्यायला नकार द्यायचा, तेव्हा नुसतंच बाहेर भटकायचं किंवा गप्पांमध्ये रमायचं. दिवस संपत आले. आमची झोळी भरत आली. हळुहळू आपापल्या दिशेनं, संसाराकडे, व्यवसायाकडे वळण्याचे दिवस आले. पुन्हा असाच अव्यवहारीपणा जमेल तेव्हा, जमेल तेवढ्यांदा करायचा असा वादा करून आम्ही एकमेकींचा निरोप घेतला.

पण आता चांगलंच लक्षात आलं आहे. स्वप्नं पुरी करायची असतील; तर ती आधी बघावी लागतात!

– डॉ.माधवी मेहेंदळे,
‘प्रकाश’ डोळयांचे हॉस्पिटल,
‘गुडलक’ रेस्टॉरंटच्या मागे,
डेक्कन जिमखाना, पुणे – 411 004
भ्रमणध्वनी – 9890904123,
इमेल : madhavimehendale@gmail.com

महजालावरील इतर दुवे –

माधवी मेहेंदळे लिखित ‘दैवी प्रतिभेचा कलावंत : मायकेल अँजेलो’ पुस्तकातील संपादित अंश!

{jcomments on}

About Post Author