जोडीदार निवडीतील विवेकी विचार
'जोडीदाराची विवेकी निवड'(जोविनि) हा उपक्रम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अनेक वर्षे चालवते. या विषयावरील चर्चेसाठी तरुणांना व्यासपीठ मिळावे म्हणून तीन वर्षांपूर्वी Whats up ग्रुप तयार करण्यात आला. त्याची प्रमुख सूत्रधार आरती नाईक सांगते, की ‘समस्येवर उपाय शोधण्याच्या गरजेतून हा उपक्रम विकसित झाला आहे!’
त्यांना गरज जाणवली ती अशी - शनीशिंगणापूरच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी मुंबईहून ‘अंनिस’चे कार्यकर्ते प्रवास करत होते. रिझर्व्ह बँकेतील सचिन थिटे, पोलिस दलातील तुषार शिंदे, आरती व महेंद्र नाईक असे प्रवासात एकत्र होते. प्रवासातील गप्पांत असा विषय निघाला, की सचिन आणि तुषार यांचे लग्न राहिले आहे! सुस्थिर नोकरी असलेल्या त्या मुलांचे लग्न खोळंबले होते, कारण त्यांना त्यांच्या विचारांना अनुरूप असा जोडीदार हवा होता. त्यांची इच्छा कांदेपोहे पद्धतीने, जातीतील, सुंदर मुलगी बघून लग्ने करण्याची नव्हती. त्या मुलांना त्यांच्या त्या अपेक्षांविषयी घरातल्यांशी बोलतादेखील येत नव्हते. त्यांना समविचारी जोडीदार हवा म्हणजे नक्की कसा जोडीदार हवा याविषयी त्यांची स्वतःची काही मते सुस्पष्ट करून घेण्याची गरज जाणवत होती; त्यांची गरज त्यासाठी सातत्याने चर्चा करता येईल असा एखादा गट ही होती!