दीपावली - सण प्रकाशाचा!


दीपावली हा भारतात सर्वत्र साजरा होणारा बहुधा एकमेव सण आहे. पावसाळा संपून नवी पिके हाती आल्यानंतर शरदऋतूच्या ऐन मध्यात, आश्विन व कार्तिक या महिन्यांच्या संधिकालात, तो येतो. आश्विन वद्य त्रयोदशी ते कार्तिक शुद्ध प्रतिपदा हे चार दिवस या सणाचे असतात.

सर्वपरिचित लोकश्रद्धा अशी, की चौदा वर्षांचा वनवास संपवून रामचंद्र सीतेसह अयोध्येला परत आले, ते याच दिवसांत. त्या वेळी अयोध्येतील प्रजेने दीपोत्सव साजरा केला आणि तेव्हापासून तो उत्सव दर वर्षी साजरा करण्यात येतो.

दीपावली या सणाचा उगम फार प्राचीन काळी, आर्यांचे वास्तव्य उत्तर ध्रुव प्रदेशात होते त्या काळात झाला असेही म्हणतात. सहा महिन्यांची दीर्घ रात्र संपून सहा महिन्यांचा दिवस सुरू होताच त्या प्रदेशातील लोकांना नवजीवन प्राप्त झाल्यासारखे वाटत असावे आणि त्यासाठीच ते हा आनंदोत्सव साजरा करत असावेत. आर्यांच्या सात पाकयज्ञांपैकी पार्वण, आश्वयुजी व आग्रहायणी व तीन यज्ञांचे एकीककरण व रूपांतर होऊन दीपावलीचा उत्सव सुरू झाला असावा असेही मानले जाते. पार्वण पाकयज्ञ हा पितरांसाठी असे; आश्वयुजी हा इंद्र व कृषिदेवता सीता यांच्यासाठी असे आणि आग्रहायणी हा संवत्सरसमाप्तीचा योग असे.

सत्यनारायणाची पूजा बंद!


श्रावण महिन्यात दर सोमवारी सगळीकडे सत्यानारायणाच्या पूजा आयोजल्या जातात. कुणी घरगुती पूजा करत असतील तर माझा त्याला विरोध नाही. मी प्रसाद घ्यायलासुद्धा सभ्यता म्हणून जातो. पण सरकारी कार्यालयात पूजा सर्रास होत असतात, त्यांना माझा विरोध आहे. आणि मी तो व्यक्त करतो. मी महाराष्ट्र राज्य वीज मंडळात काम करतो. मी माझ्या तीन कार्यालयांतील पूजा बंद केल्या, त्या वेगळ्या प्रकारे. थोड्या युक्तीने.

सरकारी कार्यालयांत, विशेषत: गावाकडे देवदेवतांच्या तसबिरी लावल्या जातात. तेथे त्यांची पूजा वगैरे होते. मी देवदेवतांच्या सरकारी कचेर्‍यांत लावलेल्या फोटोंबाबत माहितीच्या अधिकाराखाली माहिती विचारली. मी सरकारी कोणतेही सर्क्युलर नसताना इतके फोटो ऑफिसांत कसे लावले जातात अशी विचारणा केली. मला उत्तर मिळाले, की तसे सर्क्युलर नाही. त्यामुळे तसबिरींचे तर कार्यालयांमधून उच्चाटन झालेच, पण पूजाही बंद झाल्या. अजून त्या इतर कार्यालयांत होत आहेतच. शिवाय कार्यालयीन वेळेतच. हा भ्रष्टाचार नव्हे का?

माझी डोंबिवली, अंबरनाथ व कसारा ह्या तीन कार्यालयांत बदली झाली. तिन्ही ठिकाणी ऑफिसांत देवदेवतांच्या तसबिरी नाहीत आणि सत्यनारायणाची पूजा होत नाही. तेथील माझे सहकारी प्रथम माझ्याशी वाद घालत. परंतु मी त्यांना सांगितले, की देव-धर्म ही खाजगी बाब आहे. ती तुम्ही घरी करा. सरकारी कार्यालयांत नको. ते त्यांना पटले, सहकार्‍यांबद्दलच्या आस्थेने मी त्यांच्या घरी पूजापाठ प्रसंगी जातो. देवाला नमस्कार करतो. परंतु मी स्वत: अशा भानगडीत पडत नाही. मात्र सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी व विशेषत: सरकारी कर्मचार्‍यांनी या बाबतीत वर्तन काळजीपूर्वक केले पाहिजे असे माझे मत आहे. मी ते आग्रहाने मांडतो.