तुळजापुरची तुळजाभवानी (Tuljabhawani)
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेली, छत्रपती शिवाजी राजांना ‘भवानी’ तलवार प्रदान करणारी, त्यांची प्रेरणाशक्ती, तुळजापूरची ‘तुळजाभवानी’ अनेकांची आराध्य दैवत आहे. भक्तांच्या हाकेला प्रतिसाद देत धावणारी ती तुकाई; धारेसुरी, अरूणिका, मीनाक्षी, जांबूवादिनी, महिषासुरमर्दिनी अशा नावांनीही परिचित आहे. तुळजाभवानीच्या प्राचीनतेविषयी 14 नोव्हेंबर 1398 चा एक शिलालेख आहे. तसेच, शके 1126 चा ताम्रपटही आहे. इतिहासाचा आधार पाहता तो चौथ्या शतकातील आहे. त्यातील आख्यायिका सर्वश्रुत आहे. कर्नाटकातील सेन कर्नाट आणि कदंब घराणे तुळजाभवानीशी निगडीत होते. स्कंद पुराणात तुळजाभवानी मातेचा निर्देश आलेला आहे.