गोंदण : आदिम कलेचा वारसा


मानवी त्वचेवरील ‘गोंदण’. ‘गोंदण’ हा आदिवासींचा सांस्कृतिक वारसा आहे. त्यातून सांस्कृतिक ओळख पटते. शिवाय ते सौंदर्याचे लक्षण आहे, ते औषध आहे. ते मनोसामाजिक, सामाजिक-सांस्कृतिक संकल्पना या दृष्टीने संवाद साधण्याचे माध्यमही आहे - ती आदिवासींची संस्कृती अंकित करणारी ‘व्हिज्युअल भाषा’ आहे.

ज्या काळात कला किंवा कलाकार ही संकल्पना अस्तित्वात नव्हती, त्या काळात आदिवासी लोकांनी कलेचा व सौंदर्याचा उत्तम नमुना म्हणून गोंदणकलेची जगाला देणगी दिली!

कृत्रिम गोंदण अश्मयुगापासून चालत आले आहे. इतिहासपूर्व काळातील आदिवासी लोक गोंदवून घेत होते असा पुरातत्वीय दाखला आहे. मानवाने भूताखेतांपासून स्वत:चे रक्षण व्हावे म्हणून कपाळावर, हातावर व शरीरावर सांकेतिक गोंदवून घेण्याचा हा प्रघात पाडला. त्यानंतर त्यास सौंदर्यमूल्य प्राप्त होऊन गोंदण ही कला रूढ झाली असावी. त्वचा हा अशा तऱ्हेने कलेचा पहिला कॅनव्हास बनला. टोकदार वस्तूने त्वचेवर टोचणे हा त्यातील पहिला आघात.‘गोंदण’ करताना झालेली जखम भरून निघण्यासाठी राखेचा वापर केला जाई. आदिम मानव अग्नीमध्ये काठ जाळून त्याद्वारे कातडी कट करत असे व जखमेवर पदार्थ लावून ‘गोंदण चिन्ह’ तयार करत असे. आदिम मानवाने गोंदून घेण्याची प्रक्रिया करत असताना अग्नीपासून होणारी वेदना सहन केली, कारण त्यांचा पवित्र जीवनावर विश्वास होता. गोंदण करताना रक्तस्राव होई. त्याने रक्त देणे ही क्रिया निसर्गदेवतांशी जोडली.

वाडवळ समाज व संस्कृती


सुमारे हजार वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील उत्तर कोकणचा प्रांत ‘महिकावती नगरी’ किंवा ‘बिंबस्थान’ म्हणून ओळखला जाई. त्या परिसरातच वाडवळ समाजाची वस्ती आहे. ज्येष्ठ संशोधक अशोक सावे वाडवळ शब्दाची उपपत्ती ‘वाडवडील’ या शब्दातून शोधू पाहतात. ‘वाड’ म्हणजे मोठे-महान-कीर्तिवंत आणि ‘वडील’ म्हणजे पूर्वज. म्हणजे वाडवळांचे पूर्वज महान कीर्तिवंत असले पाहिजेत.

संक्षिप्त इतिहास

‘महिकावतीची बखर’ (लेखक - केशवाचार्य व इतर) हा प्राचीन दस्तऐवज आहे. बखरीत महिकावती राजधानी असलेल्या बिंब राजांचा इतिहास (वंशावळी) वर्णलेला आहे. बिंब राजे सोमवंशी व सूर्यवंशी क्षत्रिय राजे होते. ज्यांना वाडवळ असे संबोधले जाते ते त्यातील सोमवंशी राजांशी संबंधित आहेत. महिकावतीच्या बखरीबरोबर ‘बिंबाख्यान’(लेखक रघुनाथ पुतळाजी राणे), ‘अर्ली हिस्ट्री ऑफ बॉम्बे’ ‘उत्तर कोकणचा इतिहास’ (लेखक रा.ब. पु. बा. जोशी), ‘ओरिजिन ऑफ बॉम्बे’ (लेखक डॉ.. जी. द. कुन्हा) इत्यादी ग्रंथांमधून सोमवंशी क्षत्रियांचा इतिहास उपलब्ध होतो.

कनाशी - शाकाहार जपणारे गाव

अज्ञात 13/01/2015

चकधर स्‍वामींनी कनाशी गावाला भेट दिल्‍यापासून गेली सातशे वर्षे गावाने शाकाहाराची परंपरा पाळली आहे.कनाशी हे खानदेशातील दोन हजार लोकवस्तीचे, महानुभव पंथाचे छोटेसे गाव. महानुभव पंथाची उपासनापद्धत आणि शिकवण यांचे तेथे प्राबल्य असल्यामुळे शेकडो वर्षांपासून तेथे मांसाहारावर अघोषित बंदी आहे! भिन्न विचार अन् भिन्न रुची अशी माणसे एका गावात नांदत असतानाही त्यांचे शाकाहारावर मात्र एकमत आहे.

खानदेशात जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यांचा समावेश होतो. रूढी, परंपरा आणि त्यांचा इतिहास यांमुळे त्या जिल्ह्यांची सांस्कृतिक, सामाजिक अशी स्वतंत्र ओळख आहे. तेथील कृषिसंस्कृती, खाद्यसंस्कृती वेगळी आहे. तेथील बोलीभाषा, अहिराणीचा गोडवा वेगळाच आहे. तेथील धार्मिक स्थळेही जगप्रसिद्ध आहेत. पाटणादेवी, उपनदेव, शहादा-प्रकाशा, ऋषिपांथा, कनाशी, म्हसदी, शेगाव आदी ठिकाणांना पर्यटक सतत भेटी देत असतात.

कनाशी हे जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यापासून साधारण आठ किलोमीटर अंतरावर गाव आहे. महानुभाव पंथाच्या उपासनेची सुमारे आठशे वर्षांची परंपरा त्या गावाला आहे. देशात कनाशी नावाची पाच ते सहा गावे असतील; परंतु जळगावातील कनाशीने त्या गावाची वेगळीच ओळख निर्माण केली आहे. तेथे येणारा भाविक सहसा रिकाम्या हाताने जात नाही असे म्हटले जाते. येणारा प्रत्येक कष्टी असो वा आनंदी भाविक असो त्याने जाताना त्या गावातील शिकवण आणि तेथील आदरातिथ्यांचे कौतुक केले नाही तरच नवल! बाराव्या शतकातील तत्त्वज्ञ, समाजसुधारक आणि महानुभव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांनी कनाशीला भेट दिल्याची आख्यायिका सांगितली जाते.

टिक्केवाडीचे ग्रामदैवत – भुजाईदेवी


भुजाईदेवीचे मंदिरकोल्हापुरातील भुदरगड तालुक्यात दक्षिणेकडे टिक्केवाडी हे गाव आहे. सह्याद्रीच्या दोन डोंगरांमध्ये वसलेल्या टिक्केडवाडीची लोकसंख्या दोन-अडीच हजारांची. टिक्केवाडी गावाचे ग्रामदैवत म्हणजे भुजाईदेवी.

भुजाईदेवी हे जागृत देवस्थान मानले जाते. देवीचे मंदिर टिक्केवाडी गावापासून दोन किलोमीटर अंतरावर, डोंगराच्या पायथ्याशी दाट निसर्गाच्या छायेत वसलेले आहे. देवीचे मूळ नाव अष्टभुजाईदेवी. गावकरी तिचा उल्लेेख ‘भुजाईदेवी’ असा करतात. भुजाईदेवीची यात्रा फेब्रुवारी महिन्यातील ‌‌‌‍‍पौर्णिमेच्या पहिल्या मंगळवारी भरते. टिक्केवाडीतून कराड, सातारा, सोलापूर, निपाणी, बेळगाव, गोवा, मुंबई इत्यादी ठिकाणी वास्तव्यास नोकरीस गेलेले लोक यात्रेला देवीच्या दर्शनाला येतात. जत्रेच्या कालावधीत गावात सासणकाठ्या, लेझीम, दांडपट्टा इत्यादी मर्दानी खेळ होतात. सासणकाठ्या खेळताना वेळूच्या काठीला देवीचा झेंडा लावून तो हलगीच्या तालावर गावात नाचवला जातो. तो झेंडा गावच्या एकोप्याचे प्रतीक मानले जाते.

मानसीश्वराची दिवाबत्तीतील जत्रा


मानसीश्‍वराचे मंदिरवेंगुर्ले-शिरोडा येथील मानसीश्वराचे स्थान आहे श्री देव मानसीच्या देवचाराचे. म्हणून त्याला मानसीश्वर असे म्हणतात. तेथे भाविकांचा महापूर असतो, पण कानठळ्या बसणारे आवाज नसतात आणि डोळे दिपून टाकणारी रोषणाई केली जात नाही.

शिरोड्यातील सागरकिनारी फडकणारी असंख्य भगवी निशाणे लक्ष वेधून घेतात. मंद सुवासासह कमळांची दाटीवाटी पाहायला मिळते आणि नकळत ‘वाहऽऽ फारच सुंदर’ अशी दाद देऊन हात जोडले जातात.

‘मानसी’ म्हणजे जन्मदात्री देवता. पश्चिम बंगालमध्ये मानसी देवतेची मोठी ख्याती आहे. त्या देवचारासमोर कुणीही आकांडतांडव करू नये, जल्लोष साजरा करताना मर्यादा पाळावी असा तेथील अलिखित संकेत आहे. त्या स्थानी होणाऱ्या जत्रेसाठी ग्रामस्थांकडून पेट्रोमॅक्सच्या गॅसबत्ती देण्याबरोबरच मानसीश्वराच्या नावाने ‘शिड’ (भगवे निशाण) उभे केले जातात. देवाची यात्रा फेब्रुवारी महिन्यात अत्यंत शांततेत भरते. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकमधून भक्त यात्रेला उपस्थित असतात.

सोनुर्लीतील लोटांगणाची जत्रा


घालीन लोटांगण, वंदीन चरण,
डोळ्यानं पाहीन रूप तुझे...

सोनुर्ली माऊलीचे मंदिरसोनुर्लीतील माऊलीची यात्रा लोटांगणाची जत्रा म्हणूनच प्रसिद्ध आहे! सोनुर्ली सावंतवाडी जिल्यात आणि तालुक्यात येते. कोकणची दक्षिण काशी म्हणूनही सोनुर्ली माउली देवस्थान प्रसिद्ध आहे.

श्रीदेवी माऊलीसमोर नतमस्तक होताना तिने केलेल्या कृपादृष्टीचे आभार कसे आणि किती व्यक्त करावे, असा भाव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर असतो. मातेसमोर शिरसाष्टांग दंडवत घातल्यानंतर, त्या अवस्थेत परिक्रमा पूर्ण करणे हे माऊलीच्या जत्रेत श्रद्धेचे प्रतीक समजले जाते. उपवास करून, उत्सवाच्या रात्री परिक्रमा पूर्ण केली आणि माऊलीचे तीर्थ अंगावर झेलले की भक्त धन्य होतो! महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक या राज्यांतून भक्तगण देवीच्या दर्शनास येतात. कार्तिक कृष्ण प्रतिपदा हा यात्रेचा दिवस.

सोनुर्ली देवीक्त साष्टांग नमस्कार घातल्यामुळे देवापुढे पूर्णपणे नतमस्तक होतो. त्याच्या मनातील अहंकार दूर होतो. जमिनीवर पूर्णपणे आडवे झाल्यामुळे आणि विशेषत: जमिनीकडे तोंड असल्यामुळे काही क्षणांपुरता त्याचा आसपासच्या घडामोडींशी संपर्क तुटतो. अशी भावना लोटांगण यात्रेमागे आहे.

साष्टांग नमस्कार करण्याची पद्धत ठरावीक आहे. देवासमोर पालथे पडून पोटाला जमिनीवर टेकवावे. दोन्ही हातांना डोक्यावर नेऊन दंडवत करावा. त्यामुळे भक्ताच्या शरीराची कपाळ, छाती, हात, पाय, गुडघे अशी आठ अंगे जमिनीशी जोडली जात असतात. शरीराला ताण पडत असतो आणि मनी शांततेची अनुभूती घेता येते.

भक्ताने त्याच्या इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी; तसेच, मन:शांतीसाठी देवीला लोटांगणाचा नवस बोलण्याची शतकानुशतकांची प्रथा आहे. तो नवस जत्रेत फेडला जातो.

इरवीर

अज्ञात 16/12/2012

श्रद्धेपायी केवढा खटाटोप!

शेताच्या  बांधावर स्थापलेले इर दैवत. रात्रीची जेवणे सुरू होती. भावाच्या दोन नातवंडांमध्ये मारामारी झाली. पुतणीचा मुलगा अमोल आणि पुतण्याचा मुलगा विवेक. कारण काय, तर विवेकने अमोलची शेंडी जोरात ओढली! त्याने असा प्रकार अनेक वेळा केला. त्यामुळे अमोलला वेदना व्हायच्या. तो कळवळून आईकडे तक्रार करायचा, पण कोणी त्याच्याकडे फारसे लक्ष देत नसे. त्यामुळे त्याने विवेकवर हल्ला केला. दोघांचे भांडण सोडवताना शहाण्या माणसांचीही दमछाक झाली, पण अमोलचा राग काही थंड होत नव्हता. तेव्हा वहिनी (नातवंडांची आजी) मुलीला म्हणाली, “तुले बी ती कातरीसनी ठी देवाले काय झाय? शायमान तो जाई तव्हय आणखी पोरे ओढतीन” मोठा भाऊ बापू हा माझ्याकडे पाहून म्हणाला, “हाही असाच भटूगुरूजींची शेंडी ओढून त्यांना लहानपणी त्रास द्यायचा.”

मी शाळेत जात होतो, त्यावेळी वर्गामध्ये चार-पाच मुले शेंडीवाली असायचीच. त्यांच्याही शेंड्या ओढण्याचा प्रकार घडे. त्यामुळे मुलांमध्ये शिवीगाळ, मारामारी व्हायची. गुरुजी मग अशा मुलांना चांगले बदडून काढत. मुले टोप्या घालत तोपर्यंत त्यांना शेंडी लपवता येई. टोप्या हळुहळू लुप्त झाल्या. मुले चांगली दहावी-अकरावीत येईपर्यंत त्यांच्या डोक्यावर शेंडी असे. कधी कधी कुस्तीच्या कड्यामध्येही (आखाड्यात) एखादा पैलवान शेंडीवाला दिसे. काही काही मुलांच्या डोक्यावर दोन-दोन शेंड्या असायच्या. एक टाळूवर तर दुसरी मानेच्या बाजूने, डोक्यावर साधारणपणे टक्कल पडते त्या ठिकाणी. टाळूवरची शेंडी शाकाहारी देवाची, नवसाची तर दुसरी इरांची, बोकडबळीची. ती डोक्याच्या शेंड्यावर असते म्हणून तिला शेंडी म्हणत असावेत.
 

एको देव केशव: - गुरुपाडवा


ही आगळीवेगळी कहाणी आहे एका दत्तमूर्तीची आणि तिच्या पूजेची. दत्ताची मूर्ती संत दासोपंतां नी निर्माण केलेली आहे. ती तांब्याची व अंदाजे दहा किलो वजनाची आहे. दासोपंतांना आपला समाधिकाल जवळ येत चालला असे जेव्हा जाणवले तेव्हा त्यांनी ती बातमी भक्तांना व शिष्यांना सांगितली. साहजिकच, शिष्यांना दु:ख झाले. त्यांनी ‘हा दु:खद प्रसंग पुढे ढकलावा’ म्हणून दासोपंतांकडे विनवणी केली. परंतु दासोपंतांनी ‘आज नाही तर उद्या तरी हा प्रसंग घडायचाच आहे. त्यासंबंधी विनाकारण चिंता किंवा दु:ख करण्यात काही अर्थ नाही’ असे समजावले. शेवटी, भक्तांनी ‘आपले सान्निध्य सतत जाणवत राहील अशी वस्तू आपल्या हाताने आम्हांस द्यावी आणि मग वियोग घडावा’ अशी मागणी केली.

आख्यायिका अशी आहे, की त्या सर्वांच्या मागणीनुसार दासोपंतानी नदीकाठातून शाडू आणून त्याची दत्तमूर्ती तयार केली. ती दत्तमूर्ती स्वहस्ते धान्याच्या कणगीत पुरून ठेवली आणि सर्वांना सांगितले, की ‘आजपासून एक महिन्याने ही मूर्ती पितळेची होईल. दुसर्‍या महिन्यात तांब्याची होईल, तिसर्‍या महिन्यात चांदीची व चवथ्या महिन्यात सोन्याची होईल आणि पाचव्या महिन्यात मूर्ती रत्नखचित होईल. या गोष्टीवर विश्वास ठेवा आणि पाच महिने संपल्यानंतर मूर्ती बाहेर काढा.’

संतकवी दासोपंत यांची अंबेजोगाई येथील समाधी दासोपंतांनी आपली जीवनयात्रा संपवली. त्यानंतर दुसरा महिना संपला आणि एका अतिजिज्ञासू भक्ताने कुणाला न समजता एकांतात कणगीत हात घालून मूर्ती उकरून पाहिली. ती खरोखरीच तांब्याची झाली होती. त्याने आपण मूर्ती पाहिली ही वार्ता गुप्त ठेवली. पाच महिने संपले आणि सर्वांनी समारंभाने मूर्ती बाहेर काढली. पाहतात, तो ती तांब्याची! आणि मग शोधाअंती खरा प्रकार समजला.

हरी घंटीवाला


एखाद्या गोष्टीची जनतेला जाहीरपणे माहिती देण्यासाठी पूर्वी दवंडीचा वापर केला जाई. लसीकरण मोहीम, गावातील यात्रा, जनजागरण मोहीम यांसारख्या विषयांबाबतीत नागरिकांना माहिती व्हावी या हेतूने गावागावात दवंडी देण्यात येत असे. त्या निमित्ताने लोक एकत्र येत, घडामोडीबाबत चर्चा करत, पण माहिती तंत्रज्ञानाच्या युगात ही पध्दत कालबाह्य झाली आहे. चावडीवरील गप्पा बंद झाल्या असून त्यांना दूरचित्रवाणीवरील चर्चांचे आणि इंटरनेटवरील सोशल नेटवर्किंगचे स्वरूप आले आहे. माहिती कळवण्यासाठी दवंडी देणे कमीपणाचे मानले जात आहे.

गावागावातील दवंडीचा आवाज केव्हाच बंद झाला असला तरी शिवडी, चुनाभट्टी आणि जीटीबी नगर या, मुंबईतील सहा किलोमीटर परिसरातल्या नागरिकांना दवंडीची गुंज नित्यनेमाने ऐकायला मिळते. दवंडीवाला आपल्या येण्याची वर्दी थाळीरूपी घंटा वाजवत देतो. त्याचे नाव हरिचंद भार्तुराम डिक्का. स्थानिक लोक त्याला ‘हरी घंटीवाला’ या नावाने ओळखतात. अठावन्‍न वर्षांचा हरी घंटीवाला जन्म, मृत्यू, शोकसभा, संमेलन, धार्मिक घडामोडी यांपासून ते वीज, पाणी, रस्ते, वाहतूक, आरोग्य आदी कोणत्याही विषयाची पण स्थानिकांशी संबंधित प्रत्येक बातमी तो लोकांपर्यंत पोचवतो.

त्याच्या येण्याची चाहूल लागताच स्थानिक एकत्र गोळा होतात. घंटानाद ऐकून बातमीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करतात आणि हरी घंटीवाला आपल्या पहाडी आवाजात काही वेळातच त्यांना घडामोडीची विस्तृत माहिती करून देतो. स्थानिकांमध्ये त्या संदर्भात चर्चा रंगू लागते, पण तो मात्र आपले काम पूर्ण करण्याकरता अरुंद चाळींतून वाट काढत पुढे निघून जातो. 

कोजागिरी पौर्णिमा


‘को जागर्ति?’ असे देवीने विचारले. शिवाजी महाराजां नी तिला ‘मी जागा आहे आणि मी स्वराज्य व सुराज्य निर्माण करीन’ असे वचन दिले. ते त्या वचनाला जागले अशी कथा प्रचलीत आहे. ‘को जागर्ति?’ ही मुळात एक कविकल्पना; त्यामुळे ती वेगवेगळ्या महापुरुषांच्या संदर्भात योजून पुराणकथा रचल्या जातात त्यांतलीच ही एक. आख्यायिकांनुसार, उत्तररात्री साक्षात लक्ष्मी येऊन (संस्कृतमध्ये) 'को जागर्ति' (म्हणजे 'कोण जागत आहे') असे विचारते, म्हणून या दिवसाला 'कोजागरी पौर्णिमा' असे म्हणतात.
 

आश्विन पौर्णिमा हा प्राचीन काळात कौमुदी महोत्सव मानला जाई. वात्स्यायना ने ह्याला ‘कौमुदी जागर’ असे म्हटले आहे; तर 'वामनपुराणा 'त ह्याला ‘दीपदानजागर’ असे म्हटले गेले आहे. पण एकंदरीत, आरंभकाळात, या दिवशी सा-या नगरामध्ये उत्साहाचे वातावरण असे. नगर स्वच्छ करून, घरे सुशोभित करण्यात येत. रात्री लोक सुंदर वस्त्रे-आभूषणांनी नटून शहरात हिंडत. रात्री दीपाराधना करत. नृत्यगीतांच्या मैफिली चालत, रात्रभर जागरण होई.