दोन विनोदवीरांची जुगलबंदी!


आचार्य अत्र्यांप्रमाणेच शा.दादा कोंडके हे महाष्ट्रातील प्रख्यात विनोदवीर! हजरजबाबीपणात दादांचा हात धरू शकेल असा माणूस शोधून सापडणार नाही. दादांशी गप्पा मारायला जायच म्हणजे ते बोलतील ते सगळा वेळ ऐकायचं आणि पोट दुखेपर्यंत हसायचं! हसून हसून पोट दुखलं हे दादांशी गप्पा मारताना अनुभवायला यायचं!

'विच्छा माझी पुरी करा' या नाटकाचे प्रयोग त्यावेळी जोरात चालले होते. हा नाट्यप्रयोग म्हणजे दादांच्या हजरजबाबीपणाची कमाल होती. चालू घडामोडींवर दादांनी मारलेले टोमणे हे अनेकांना हसवून गेले तर अनेकांना पोटदुखी करून गेले. आचार्य अत्रे यांचा उल्लेख या नाटकात एकदा होत असे तर कोतवालाच्या लग्नप्रसंगात 'मराठा'चा उल्लेख होत असे ते दोन प्रसंग असे-

राजा: काय हे! आमच्या राज्याचा कोतवाल एवढा आजारी आणि आम्हाला खबर नाही? प्रधानजी! राजवैद्यांना त्यांची प्रकृती दाखवायला सांगा.

प्रधान: दाखवली महाराज!

राजा: कोणाला?

प्रधान: आपले ते हे...(हवालदाराला उद्देशून) तू सांग रे!

हवालदार: (गोंधळतो) आपले ते हे...म्हणजे डॉक्टर लागू!

राजा: (आश्चर्याने) लागू? पण आमचे फॅमिली डॉक्टर कुलकर्णी असताना हे लागू कुठून आले?

हवालदार: आले नाहीत. अत्र्यांनी आणले.

यात हवालदाराची भूमिका दादा करायचे. त्यावेळी रंगभूमीवर आलेलं आचार्य अत्र्यांचं 'डॉ.लागू' हे नाटक जोरात सुरु होतं. त्यामुळे डॉ.लागू अत्र्यांनी आणले हे खरचं होतं.

नाटकाचा शेवटचा प्रसंग! कोतवालाचं मैनावतीशी लग्न होत आहे. तयारी करताना कोतवाल शिपायाला बाशिंग बांधायला सांगतो. शिपाई कोतवालाला बाशिंग बांधण्याऐवजी आपल्याच डोक्याला बांधू लागतो. कोतवाल ओरडून हवालदाराला ते दाखवतो-

कोतवाल: हे हवालदारऽऽ! हे येडं बघ, ए!

हवालदार: थांबा! थांबा! मला चांगला राग येऊ द्या.(थोडं थांबून) ए हलकट, ए नालायक, ए पाजी, ए बदमाश, ए चोर, ए डाकू, ए डँबीस-चारसोबीस, ए दरवडेखोर हरामखोर....

आयला! बरं झालं सकाळी 'मराठा' वाचला.

यावर नाटयगृहात एक प्रचंड हास्यकल्लोळ उसळायचा. कारण संयुक्त महाराष्ट्राच्या विरोधकांची विशेषणं प्रेक्षकांनी 'मराठया'त वाचलेली असायची.

दादांच्या विनोदानं 'पोटदुखी' लागलेल्या कोणीतरी अत्र्यांकडे,''दादा कोंडके तुमची बदनामी करतो' अशी चुगली केली. अत्र्यांनी वसंत सबनीसांना निरोप पाठवला ''जरा त्या कोंडक्याला माझ्याकडे घेऊन या.''

वसंत सबनीसांना विषय काय असावा त्याची कल्पना आली. कारण खूप दिवस आधीपासून ते दादांना समजावून सांगत होते.''दादा, तू अत्र्यांच्या नादाला लागू नकोस. त्यांनी भल्याभल्यांची चड्डी सोडली. आपण तर किस झाड की पत्ती,''

दादांनी सबनीसांचं बोलणं ही मनावर घेतलं नाही आणि टोमणे मारणं बंद केलं नाही. अत्र्यांचा निरोप आल्यावर वसंत सबनीस म्हणाले,'' दादा. तुला सांगूनसुध्दा तू ऐकलं नाहीस. खा आता शिव्या, अत्र्यांनी मला तुला घेऊन बोलावलंय.''

दादा आणि सबनीस, दोघं 'मराठा'च्या कार्यालयात पोचले. अत्र्यांच्या केबिनमध्ये गेले. पाठोपाठ चहा आला.

''बसा, सबनीस. चहा घ्या. आज काय काम काढलत?''
काही नाही. कोंडकेला घेऊन आलोय.''

'' हेच का ते ? काय हो तुमच्या नाटकात तुम्ही आमची बदनामी करता.''

दादा अतिबेरकी! त्यांना अत्रे साहेबांना नाटकाच्या प्रयोगाला बोलवायचं होतं. ती संधी आयती चालून आली होती.

'' साहेब! आपण आमचं नाटक बघायला या. तुम्हाला जर वाटलं की मी आपली बदनामी करतोय तर पुढच्या प्रयोगातून तो भाग गाळून टाकू.''

'पुढच्याच प्रयोगाला येतो' असं अत्र्यांचं आश्वासन घेऊन दादा आणि सबनीस तिथून निघाले.

प्रयोगाचा दिवस उजाडला. नाही म्हटलं तरी दादांच्या मनात चलबिचल चालू होती. दुरुन अत्रे  साजरे दिसले तरी त्यांच्याशी भेट झाल्यावर दादांची थोडी गडबड उडालीच होती.

गण, गवळण, बतावणी झाली. मध्यंतरात अत्र्यांनी आत जाऊन दादांना विचारलं, ''ते आम्हाला मारलेले टोमणे कधी आहेत?''

''ते वगात आहेत. वग पूर्ण बघायवाच लागेल आपल्याला त्यासाठी.'' दादा.

झालं. वग सुरू झाला.'डॉ.लागू अत्र्यांनी आणले' या विधानाला साहेबांनी हसून दाद दिली. साहेब नाटक पाहण्यात रंगून गेले.

शेवटचा प्रसंग आला. कोतवाल हवालदाराला उद्देशून म्हणाला 'हे हवालदारऽऽ हे येडं बघ ए!''

हवालदार: थांबा! थांबा! मला चांगला राग येऊ द्या...(थोडं थांबून) ए हलकट, ए नालायक, ए पाजी, ए बदमाश, ए चोर, ए डाकू, ए डँबीस चारसोबीस, ए दरवडेखोर

हरामखोर... आयला! बरं झालं सकाळी मराठीतलं एक वृत्तपत्र वाचलं....

यावर अत्रे ताडकन उठून उभे राहिले आणि म्हणाले ''ए गाढवा!! 'मराठा' म्हण'' मग पुन्हा दादांनी ते वाक्य 'मराठा'चा उल्लेख करून म्हटलं.

दादांनी 'मराठा'चा उल्लेख करणं ही 'मराठया'ची किंवा अत्र्यांची बदनामी नव्हती तर तो सन्मान होता. मग असा सन्मान अत्रेसाहेब कसा नाकारणार?

आचार्य अत्रे यांच्यामध्ये गुणग्राहकता होती, अत्र्यांनी आवर्जून 'मराठा'चा उल्लेख करायला लावला हा जणू दादांसाठी आशीर्वादच ठरला!

'मंत्रा'वेगळा आशुतोष गोवारीकर...


भारतात काय किंवा जगभरात, कुठेही काय, चित्रपटसृष्टीतले ग्लॅमर बहुधा कलावंतांच्या खात्यावर जमा होते. चित्रपटनिर्मितीचा मुख्य सूत्रधार आणि श्रेय किंवा अपश्रेयांचा धनी हा, खरे तर, दिग्दर्शक असायला हवा. परंतु बहुतांश, सगळे तेज आणि सगळे वलय कलावंत लुटून घेऊन जातात आणि दिग्दर्शकाला मिळते आपण कॅप्टन असल्याचे केवळ मानसिक समाधान! आशुतोष गोवारीकर हा याबाबत सन्माननीय अपवाद ठरला आहे. कोल्हापूरचे चित्रतपस्वी भालजी पेंढारकर आणि व्ही. शांताराम यांच्यामागून दमदारपणे पावले टाकणारा आशुतोष गोवारीकर हा तरुण दिग्दर्शक कोल्हापूरने देशाला दिला. त्याने उमेदवारीच्या काळात सी.आय.डी.मालिकेतून शिवाजी साटम यांच्या साहाय्यकाचे काम केले. अमोल पालेकरच्या 'कच्ची धूप' या मालिकेतून आशुतोष अभिनेता म्हणून लोकांना प्रथम दिसला. पुढे तो 'होली', 'गूँज', 'कभी हां कभी ना', 'सलीम लंगडे पे मत रो' सारख्या सिनेमांत दिसला. पण त्याला अभिनय-कारकिर्दीत घट्ट मुळे रोवता आली नाहीत. मग दिग्दर्शन क्षेत्रातले पदार्पण असलेला 'पहला नशा'  हा त्याचा चित्रपट दणकून आपटला. त्याच्या, आमीर खान नायक असलेल्या 'बाजी'च्या दिग्दर्शनानेही बाजी मारली नाही. त्यामुळे 'लगान' हा त्याचा जीवन-मरणाचा प्रश्न बनला होता. आणि 'लगान' ने त्याला प्रतिष्ठा मिळवून दिली. तो दिग्दर्शक व अभिनेता म्हणून अनेक आव्हानांना खंबीरपणे सामोरा गेला. तो दिग्दर्शन करताना आपण अभिनेता असल्याचे जाणीवपूर्वक विसरतो. आशुतोषला हिंदी सिनेमातील व्ही. शांताराम, गुरुदत्त, राज कपूर आणि मनोजकुमार प्रभृतींनी दिग्दर्शनाबरोबर अभिनय केल्याने त्यांच्याबद्दल आदर आहे.

मतिमंदांची कलासाधना


‘विश्वास’चा अर्थ ‘ट्रस्ट’. अरविंद सुळे ह्यांच्या डोक्यात या शब्दाविषयीची जाणीव फार मोठी. ती अशी, की आपण ज्यांना मतिमंद म्हणतो त्या व्यक्ती/ती मुले मुळात हुशार असतात. परंतु डॉक्टर मंडळी मात्र त्यांच्या मेंदूत असणा-या कमतरतेविषयी बोलतात. “ही अशी मंडळी कुणावर तरी अवलंबून राहणार, त्यांची प्रगती होणार नाही,” ह्या अशा दृष्टिकोनामुळे ज्यांच्या त्यांच्या स्वत:च्या पालकांचेदेखील प्रोत्साहन मिळणे दुरापास्त होते. त्यामुळे अशा व्यक्ती निकामी होतात. सर्वत्र असणा-या अशा समजामुळे आणि विशेषत:, त्यांच्या स्वत:च्या पालकांना ह्या नकारात्मक विचारातून बाहेर काढण्यासाठी, आधी त्यांच्या हृदयात विश्वास  निर्माण केला पाहिजे. म्हणून सुळे ह्यांनी ‘विश्वास’ ह्या नावाचाच ट्रस्ट निर्माण केला!  सुळे म्हणतात, की “स्वत:च्या घरी जी जी कामे मुलांना करू दिली जात नाहीत ती ती कामे मुले इथे करतात. त्यांच्या मनामध्ये सकारात्मक विचार रूजवल्यामुळे मुले केर काढतात, सतरंज्यांच्या घड्या व्यवस्थित घालून त्या विशिष्ट जागेवर नेऊन ठेवतात. अशा पध्दतीची ही  कामे त्यांच्याकडून घरी पालक मंडळी करून घेत नाहीत. स्वत: पालकांनी मुलांच्या समजशक्तीबद्दल अविश्वास दाखवणे आम्हाला पटत नाही”.

ते म्हणतात, की ‘मतिमंद’ असा उल्लेख वारंवार करणे आम्हाला मान्य नाही. ‘विश्वास’ हे पाळणाघर नाही. आमची मुले स्वत: उसळी, सॅलड असे पदार्थ तयार करतात. त्यांनी तयार केलेले पदार्थ आम्ही त्यांनाच खायला देतो. त्यामुळे त्यांच्या ठायी आत्मविश्वास वाढायला मदत होते. लसूण सोलणे, वाल सोलणे ह्या क्रियांमुळे त्यांच्या बोटांची हालचाल नैसर्गिक रीतीने होऊ लागते.

लेखसूची...


मराठी नियतकालिकांत विविध विषयांवर लेखन सतत प्रसिद्ध होत असंत. अशा लेखनाची सूची करण्याचा व शक्य तिथं त्या लेखांची लिंक देण्याचा प्रयत्न इथं असणार आहे. लोकांसमोर अनेक विषयांवरील ज्ञान यावं, त्यांनी ते भ्रमराप्रमाणे टिपावं आणि अखंड ज्ञानसाधना चालू ठेवावी ही सदिच्छा. ह्या सूचीचा संग्रह होऊन वर्षअखेर किंवा केव्हाही, तुम्हाला लेखाचा संदर्भ गवसू शकेल. तुम्ही देखील लेखांची माहिती कळवू शकता.

साद वैचारिकता


बाळशास्त्री जांभेकरांपासून बाबासाहेब आंबेडकरापर्यंतचा काळ महाराष्ट्रात प्रबोधन काळ म्हणून मानला जातो. त्यानंतर महाराष्ट्रातील बौद्धिकता लोपली आणि तेथे बुद्धिमांद्य पसरले. त्याचे एक उघड कारण त्या कष्टमय काळातील भौतिक विकासाची गरज हे होते. त्यामुळे सुशिक्षित समाज उद्योग-व्यवसायाच्या, करियरच्या पाठी लागला. त्यात बूडून गेलां परंतु गेल्या पंचवीस-तीस वर्षांत अनेक नंव नवीन ज्ञानशाखांचा उदय झाला. सुशिक्षित मंडळी त्यांना कौशल्याने सामोरी गेली. प्रश्नांचा उत्तरे शोधण्याच्या जुन्या पद्धती, जुने वाद, जुने इझम काळाच्या पडद्याआड झाले. मात्र या ओघामध्ये बौद्धिक, वस्तुनिष्ठ, विवेकपूर्ण चर्चा मंदावल्या. साद वैचारकत्तेला या विभागामधून बुद्धिगम्य वातावरणाला वाव देण्याचा प्रयत्न असणार आहे. समकालीन सामाजिक, सांस्कृतिक महत्त्वाच्या मुद्द्यांवर येथे दर आठवड्याला एक ना दोन टिपण वितरीत केली जाईल आणि त्यावर मते-मतांतरे व्यक्त होत राहतील. ह्या चर्चेत रूढ धर्तीचा विचारांना फारसा वाव दिला जाऊ नये असा प्रयत्न आहे.

ध्येयासक्तदांपत्य – नंदिनी-सुधीर थत्ते


समाजात काही व्यक्ति अशा असतात की त्या विशिष्ट ध्येयाने प्रेरीत होतात आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी अहोरात्र प्रयत्नशील रहातात. समाज आणि देश अशाच काही मोजक्या व्यक्तींवर पुढे जातो. अशा व्यक्तींपैकी एक म्हणजे थत्ते दांपत्य – नंदिनी आणि सुधीर थत्ते. सुधीर हा विज्ञानातील पदण्युत्तर शिक्षण घेतलेला त्यांत उच्च पदवी म्हणजे पीएच.डी घेतलेला एक वरिष्ठ वैज्ञानिक असून, मुंबईतल्या प्रसिद्ध भाभा अणुसंशोधन केंद्रात बहुशाखीय प्रकल्पात कार्यरत आहे तर त्याची धर्मपत्नी-अर्धांगी नंदिनी, पदवी प्राप्त गृहिणी आहे. समाज कार्याची ओढ असणारे हे दांपत्य असून याच समाज कार्यातून त्यांची ओळख-देख झाली, त्यांतून प्रेमाचे बीज रोवले गेले आणि त्याचे रुपांतर लग्न गाठीत झाले. आपण ज्या समाजात वाढलो, ज्या मातीत खेळलो-बागडलो त्या मातीचे व समाजाचे ऋण फेडणे आपले परमकर्तव्य आहे याच भावनेतून त्यांचं (एकत्र) सहजीवन सुरु झाले ते आजतागायत अहर्निश सुरु आहे. हे दांपत्य म्हणजे (Made for each other)  मेड फॉर इच अदर या तत्वाने बांधले गेले आणि हेत तत्व त्यांनी ‘नोबेल नगरीतील नवल स्वप्ने.’ ही पुस्तक मालिका लिहीतांना स्वीकारले, ते आजतागायत हे पुस्तक कथेच्या रूपातून नोबेल पारितोषिक प्राप्त संशोधन आणि त्या संशोधनाचे मानकरी म्हणजेच संशोधक यांची ओळख सामान्य वाचकांना करुन देणारे गोष्टीरुप पुस्तक म्हणजेच “ नोबेल नगरीतील नवल स्वप्ने ” या कथा केवळ वाचकांनाच भावल्या किंवा विद्यार्थांना आवडल्या असे नव्हे तर प्रत्यक्ष नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ ज्यांच्या संशोधनावर व ज्यांच्यावर या कथेचे कथा बीज अवलंबून आहे खुद्द त्या संशोधकांनाही भावाल्या यांतच या पुस्तकाचे यश दडले आहे.

ध्येयासक्त दांपत्य – नंदिनी-सुधीर थत्ते


समाजात काही व्यक्ती अशा असतात की त्या विशिष्ट ध्येयाने प्रेरीत होतात आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी अहोरात्र प्रयत्नशील राहतात. समाज आणि देश अशाच काही मोजक्या व्यक्तींच्या आधारावर पुढे जातो. अशा व्यक्तींपैकी एक म्हणजे थत्ते दांपत्य – नंदिनी आणि सुधीर थत्ते.

सुधीरला ‘अंकीय प्रतिमा संस्करण’ म्हणजेच डिजिटल इमेज प्रोसेसिंग या विषयात केलेल्या संशोधनासाठी भौतिकशास्त्रातली पीएच. डी. मिळाली आहे. तो मुंबईतल्या भाभा अणुसंशोधन केंद्रात बहुशाखीय प्रकल्पात वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून संशोधन करत आहे. तर त्याची अर्धांगी नंदिनी कला शाखेची पदवीधर असून आवड म्हणून गृहिणीपद भूषवित आहे. समाजकार्याची ओढ असणारे हे दांपत्य असून समाजकार्यातून त्यांची ओळख झाली, त्यांतून प्रेमाचे बीज रोवले गेले आणि त्याचे रुपांतर लग्नगाठीत झाले. आपण ज्या समाजात वाढलो, ज्या मातीत खेळलो-बागडलो त्या मातीचे व समाजाचे ऋण फेडणे आपले परमकर्तव्य आहे याच भावनेतून त्यांचे सहजीवन सुरू झाले.

एखाद्या संशोधनाला जेव्हा नोबेल पारितोषिक देऊन गौरवले जाते तेव्हा त्या संशोधनाविषयीची बातमी लोक वर्तमानपत्रांतून वाचतात. हे संशोधन खूप महान असणार याची त्यांना खात्री असते, पण हे संशोधन नेमके काय आहे या विषयीची माहिती मिळवण्याची त्यांची उत्सुकता पुरी होऊ शकत नाही. नोबेल विजेते संशोधन हे खूपच प्रगत आणि प्रगल्भ असल्यामुळे त्रोटक बातमी वाचून त्यांचे समाधान होत नाही. हे संशोधन मुलांनादेखील कळू शकेल एवढे सोपे करून लिहिले तर नोबेल पारितोषिकाविषयीच्या सर्वसामान्यांच्या मनातली उत्सुकतेचा वापर त्यांना विज्ञानाची गोडी लावण्यासाठी करता येईल, असे सुधीर आणि नंदिनीला वाटले. यातूनच  ‘नोबेलनगरीतील नवलस्वप्ने’ या पुस्तकाची कल्पना निघाली. नवनव्या विज्ञानसंशोधनाबाबत सतत वाचन करून स्वतःला अद्ययावत ठेवण्याची सुधीरची आवड आणि अवघड गोष्टीही अतिशय रंजकपणे सांगून मुलांनाही सहजपणे कळतील अशा रीतीने लिहिण्याची नंदिनीची शैली या दोहोंचा संगम ‘नोबेलनगरीतील नवलस्वप्ने’च्या निर्मितीत झाला. या कामासाठी हे दांपत्य म्हणजे जणू ‘मेड फॉर इच अदर’ होते. आणि त्यांच्या एकत्रित प्रयत्नांमधूनच सुरू झाला नोबेलनगरीतील नवलस्वप्नांचा प्रवास.

माधुरी दीक्षित - नेने


खळखळत्या हसण्यातून 'मधुबाला'ची आठवण देणारी, पडद्यावर 'एक-दोन-तीन ' गुणगुणत अवघ्या तरुण पिढीचा मूड पकडणारी, 'हम आपके है कोन' मधल्या, कौटुंबिक खट्याळपणामुळे 'आजोबा' पिढीलाही आवडणारी. धक् धक् करूनही 'धसका' न बसलेली, वयाची उत्सुकता कायम टिकवलेली, सिनेमा पार्ट्यात 'न' मिसळणारी, राजकीय लोकांत उठबस 'न' करणारी, कुठल्याही वलयांकित - गॉसिप प्रकरणात न अडकलेली,'प्रहार'सारख्या नाना पाटेकरांच्या सिनेमात 'मेकअप' न करण्याचा 'प्रयोग' करण्याचा आत्मविश्वास असलेली आणि 'चोली के पिछे क्या' चे चित्रण करतानाही ओंगळ न वाटणारी; उलट तरीही तद्दन फिल्मी रसिकांच्या मनात रेंगाळलेली आणि लग्नोत्तर दोन मुलांची आई होऊनही, पडद्यावरच्या पुनरागमनाची उत्सुकता टिकवलेली, रजतपटलावरचे सौंदर्यसम्राज्ञीपद टिकवलेली माधुरी दीक्षित.

नाट्यकलाकार - डॉ. शरद भुथाडिया


डॉ. शरद भुथाडिया गेली पंचवीस वर्षे कोल्हापुरात बालरोग तज्ज्ञ म्हणून खाजगी प्रॅक्टिस व महानगरपालिकेत काम करत आहेत. बलसाड-गुजरातमधील गुजराथी शिंपी कुटुंबात जन्मलेले भुथाडिया इथे स्थलांतरित होऊन कायम वास्तव्यासाठी आले. त्यांचे शाळा-कॉलेजचे शिक्षण कोल्हापुरात झाले. ते मेडिकल कॉलेजात शिकत असताना त्यांनी सोलापुरातील हौशी नाट्यसंस्थेचे नाट्य आराधनाचे संस्थापक-दिग्दर्शक डॉ. वामन देगावकर यांच्या हाताखाली (1974-82) एकांकिका-नाटकांतून छोट्यामोठया भूमिका सादर केल्या. त्यामुळे त्यांना
डॉ. देगावकर हे गुरुस्थानी आहेत. त्यांनी स्पर्धांमधून 'उध्वस्त धर्मशाळा' , 'महापूर', अशी  पाखरे येती' अशा नाटकांतून अभिनय केला.

कोल्हापुरात आल्यावर 1882  पासून कोल्हापुरातील 'प्रत्यय' या संस्थेमध्ये भूमिका व दिग्दर्शन. आणखी एक नाट्यसंस्था न काढता 'लृ' सारख्या सामाजिक-साहित्यिक चळवळीचा वारसा घेऊन जन्मलेली पुरोगामी विचारांची ही संघटना. आशयघन सामाजिक जाणिवांची  नाटके करणारी संस्था म्हणून तिची ओळख. तिने कोल्हापुरात वेगळ्या नाटकांचा प्रेक्षक घडवण्याचे मोलाचे काम केले.

एका राजकीय कैद्याचा अपघाती मृत्यू (दारिओ फो), घोडा (ज्युलिअस हे), राशोमन (आकिरा कुरुसावा), दुशिंगराव. आणि त्यांचा माणूस (बरल्टॉड ब्रेश्ट) अशा विदेशी नाटककारांची तसेच दि. धों. कुळकर्णी, दत्ता भगत, गो. पु. देशपांडे,  विंदा करंदीकर, रुद्रप्रसाद आणि लक्ष्मीनारायण लाल अशा भारतीय व मराठी नाटककारांची वेगळ्या जाणिवांची नाटके डॉ. भुथाडियांनी दिग्दर्शित केली व त्यांत अभिनयही केला. त्यांनी संस्थेतील नव्या कलाकार पिढीला दिशादर्शनाचे व मार्गदर्शनाचे कामही केले. त्यांच्या व 'प्रत्यय'च्या वेगळ्या प्रयत्नांना महाराष्ट्र राज्य नाटय स्पर्धेत पारितोषिके मिळाली. त्यांना दिल्लीच्या संगीत नाटक महोत्सवात सहभागी होण्याचा मानदेखील अनेकदा मिळाला. 

तरीही डॉ. शरद भुथाडिया म्हटल, की त्यांनी समर्थपणे सादर केलेला किंग लिअर डोळयांसमोर येतो. पूर्वीच्या पिढीतील नानासाहेब फाटक, गणपतराव जोशी अशा मान्यवरांच्या पंक्तीत उल्लेख करावा असे अभिनयकौशल्य भुथाडियांनी ती भूमिका साकार करताना दाखवले. राज्य नाट्य स्पर्धेतील त्या नाटकाचे पुढे कोलकात्याच्या नांदीकार महोत्सवात, दिल्लीतील महाराष्ट्र कल्चरल सेंटरमध्ये आणि 2001 साली केरळमध्ये भरलेल्या राष्ट्रीय शेक्सपीयर फेस्टिवलमध्येही प्रयोग झाले. नाट्यपरिषद, नाट्यदर्पण, नाट्यगौरव पुणे, फाय फौंडेशन (इचलकरंजी) अशा नामांकित पुरस्कारांचा लाभ नाटकाला झाला. ज्येष्ठ व श्रेष्ठ नाटककार विजय तेंडुलकरांनी 'रामप्रहर' या आपल्या लोकप्रिय सदरात त्यांचा उचित शब्दात गौरव केला - ''शेक्सपीयरचे एक अति बिकट नाटक 'किंग लिअर'  मराठी रंगमंचावर त्या संध्याकाळी आम्ही स-मूर्त आणि साक्षात पाहिले! ते हौशी मंडळींनी उत्साहाने उभे केलेले मूळ 'लियर'चे छायारूप नव्हते. ते अव्वल 'किंग लिअर'च होते. त्याच्या सा-या रौद्र-भीषण व करुण जोशासकट. एक मोठा नट - एक मोठी भूमिका जगवताना पाहिला. मराठी रंगभूमीला मिळालेल्या या नव्या नटश्रेष्ठाचे नाव डॉ. शरद भुथाडिया. मी फार खूष आहे माझ्या मनात नायगराचा धबधबा अजून कोसळतच आहे! 'लिअर' नावाचा उधाणलेला समुद्र आपल्या अक्राळविक्राळ लाटांचे तांडव नाचत माझे सारे अस्तित्व अजून क्षणोक्षणी नव्याने हादरवत आहे. 'लिअर'च्या प्रतिभावंत भाषांतरकाराला आणि हे सगळे वैभव माझ्यापुढे साक्षात मांडणा-या डॉ. शरद भुथाडिया नावाच्या नटश्रेष्ठाला मी सलाम करत आहे''

व्यावसायिक नाटके

भुथाडीया यांनी 1993 ते 95 या कालावधीत ‘ज्याचा त्याचा प्रश्न’ (ले. अभिराम भडकमकर, दि - चंद्रकांत कुळकर्णी) व ‘राहिले घर दूर माझे’ (ले. शफाअतखान, दि - वामन केंद्रे) भूमिका केल्या. त्याही अनेकांना आवडल्या. त्या दरम्यान ते काही काळ मुंबईत 'पूर्णवेळ कालाकार'  म्हणून राहिले होते. परंतु पुढे, ते वैद्यकीय व्यवसाय व ‘प्रत्यय’ संस्थेच्या कार्यासाठी कोल्हापुरात परत गेले. ते 'प्रत्यय' मध्ये  नवनवे उपक्रम करत असतात. कै. प्रकाश संत ह्यांच्या 'ओझं' कथेवरील एकांकिकेत सहभाग व त्याचे अनेक ठिकाणी स्पर्धांत प्रयोग झाले, बक्षिसेही मिळाली.

डॉ. भुथाडिया 'अवंतिका' सारख्या मालिकांतून तसेच मोजक्या मराठी चित्रपटांतूनही दिसले.

आगामी.

राष्ट्रीय नाटयशाळेच्या एका प्रकल्पांतर्गत भीष्म सहानीलिखित 'कबीरा खडे बजार मे' या नाटकाची निर्मिती 'प्रत्यय' तर्फे केली जात आहे. त्याचे दिग्दर्शन अनिरुध्द सुरवट करताहेत तसेच आईनस्टाईन वर्ष असल्याने एकपात्री नाट्यप्रयोग करण्याचा डॉ. भुथाडियांचा विचार आहे.

- राजीव जोशी