खाद्यसंस्कृती महाराष्ट्राची
महाराष्ट्रात दर कोसावर फक्त भाषा नाही तर खाण्यापिण्याच्या रीतीभातीही बदलतात! महाराष्ट्राच्या उत्तरेकडील राज्ये गहू हे मुख्य अन्न असलेली आणि दक्षिणेकडील राज्ये केवळ भाताच्या विविध पदार्थांवर भूक भागवणारी; त्यांच्या मधोमध महाराष्ट्राचे स्थान आहे. ते त्यामुळे त्यास ‘सँडविच स्टेट’ असेही म्हणतात. पण त्याचमुळे चौरस आहार ही संकल्पना मराठी माणसाच्या रोजच्या साध्या जेवणातही प्रत्यक्षात उतरली आहे! सुपीक जमीन, अनुकूल हवामान यांमुळे महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत इतर राज्यांपेक्षा अधिक संपन्न आहे. महाराष्ट्र हे एकमेव राज्य सगळ्या प्रकारची फळे, धान्ये, कडधान्ये, तेलबिया यांचे उत्पादन घेणारे म्हणून प्रसिद्ध आहे. अशा साऱ्या अनुकूलतेमुळे महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृती विविधांगांनी समृद्ध झाली आहे. बांद्यापासून चांद्यापर्यंत आणि जळगावपासून सोलापूरपर्यंत प्रत्येक प्रदेशाचे त्याचे स्वत:चे असे खाद्यवैशिष्ट्य आहे. ते त्या त्या मातीत इतके रुजलेले आहे, की तेथील मुले शिक्षण-नोकरीनिमित्त अन्य प्रांतात वा परदेशात गेलीच तर जाताना पापड, लोणची, भाजणी, मेतकुट या सर्वसाधारण पदार्थांच्याबरोबर त्यांच्या जिभेचे चोचले पुरवणाऱ्या स्थानिक वस्तुवैशिष्ट्यांचे ओझे हसत हसत घेऊन जातात.