सोलापुरी शिलालेखांना आकार देणारा कुंभार
आनंद कुंभार यांचे घर सोलापूर पूर्व भागातील बोल्ली मंगल कार्यालयाजवळील अशोक चौक परिसरातील एका गल्लीत आहे. मी आणि नितीन अणवेकर त्या छोट्या चाळीवजा इमारतीतील त्यांच्या घराच्या समोरच्या एका खोलीत शिरलो अन् नजर हटणार नाही अशी माझी अवस्था झाली! नितीनचा पुस्तकांच्या त्या स्वर्गात येण्याचा अनुभव नेहमीचा असल्याने त्याच्या चेहऱ्यावर तो मला सोलापूर शहराचा वारसा दाखवत असल्याचा आनंद होता, तर मी त्या अभ्यास मंदिरावरील पुस्तकरूपी शिल्पांनीच मोहरलो होतो. खोली पुस्तके अन् त्या पुस्तकांच्या सावलीत बुडालेली होती आणि ते तर मंदिराचे बाह्यरूप होते. मुखमंडप, सभामंडप, त्यातील देव्हारे, शिखर... सारे मंत्रमुग्ध करणारे. सर्वत्र मासिकांचे अन् पुस्तकांचे गठ्ठे... मंदिराचे अंतराळ अन् गर्भगृह अशी दहा बाय वीसची ती खोली अंगावर रोमांच निर्माण करत होती. आनंद कुंभार यांचे वय पंचाहत्तरीच्या जवळपास... मन मात्र पंचविशीतील. भिंतीवरील दोन शर्ट टांगण्याची जागा फक्त रिकामी असावी. मी धाडसाने ‘किती पुस्तके आहेत?’ असे विचारले. ‘असतील सात-आठ हजार.’ ‘बापरे इतकी?’ असे मी म्हणाल्यावर कुंभार म्हणाले, ‘कोठे कोठे ठेवणार? त्यामुळे 1950 पूर्वी प्रसिद्ध झालेली एक हजार दुर्मीळ पुस्तके पुणे विद्यापीठाला भेट म्हणून दिली!”