वाघबारस - आदिवासींचे जीवन होते पावन!
दिवाळी सणाची सुरुवात ‘वसुबारस’ या दिवसापासून होते. परंतु आदिवासी भागात दिवाळी सणाचा पहिला दिवस म्हणजे ‘वाघबारस’. आदिवासींच्या जीवनात त्या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. तो त्यांनी वर्षभरात केलेले नवस फेडण्याचा मोठा दिवस असतो. अकोले तालुक्याच्या अतिदुर्गम भागात तर ‘वाघबारस’ साजरी करण्याची परंपरा अनोखी आहे. आदिवासी बांधवांनी ती जपलीही नेकीने आहे.
अकोले तालुक्यातील अनेक गावांत, वाड्या-वस्त्यांवर वाघोबाची मंदिरे आहेत. आदिवासी बांधव वाघाला देव मानतात. गावच्या वेशीवर वाघ्याच्या मंदिरात जाऊन पूजा केली जाते. तेथे सर्वजण एकत्र येऊन नवसपूर्ती करतात. जंगलातील हिंस्र प्राण्यापासून पाळीव प्राण्यांचे गाईगुरांचे रक्षण व्हावे, यासाठी कोंबडा, बोकड यांचा नैवैद्य दाखवला जातो. काही भागात डांगर, तांदळाची खीर यांचाही नैवद्य दाखवला जातो.