मराठा आंदोलन आणि व्यवस्था परिवर्तन
मराठा मोर्चेकरी आक्रमक झाले त्यावेळची गोष्ट. एका बाजूला महाराष्ट्रभर विविध ठिकाणी पसरलेल्या आंदोलनाची अवस्था निर्नायकी होती. मुख्य कार्यकर्ते जे माध्यमांतून व्यक्त होत होते ते ठामपणे व संयमाने बोलत होते. त्यांचा निर्धार, मागणी मान्य करून घेतल्याखेरीज शांत व्हायचे नाही असाही दिसत होता. परळीच्या ठिय्या आंदोलनाने त्या सर्व घडामोडींना निर्णायक वळण आणण्याच्या दिशेने त्याची बाजू पकडून ठेवली होती. मात्र एकूण काबू कोणाचाच कोणावर राहिला नव्हता.
दुसऱ्या बाजूला सरकारही हतबल जाणवत होते. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा इनिशिएटिव्ह राहिला नव्हता. किंबहुना, फडणवीस सरकारची ती दुबळी बाजू आहे. ते नुसती आश्वासनांची खैरात करतात असे दिसते. सरकारने शेतकऱ्यांचे कर्जमाफी आंदोलन आणि त्यांचे दूधभाववाढ आंदोलन आश्वासने देऊनच संपवले. त्यामागे विचार, धोरण असावे असे काही जाणवले नाही. त्यामुळे अशा छोट्यामोठ्या आंदोलनांमध्ये नागरिकांचे हाल अपरिमित होतात. ते असंघटित असल्याने त्यांच्यावर जो अन्याय होतो त्याकडे कोणाचेच लक्ष जात नाही. विशेषत:, तशा काळात सर्वच नागरिकांना होणारा मनस्ताप अतिशय जाचक असतो. परंतु ना सरकारला, ना मोर्चेकऱ्यांना त्याबद्दलची जाणीव; नागरिकांच्या हालअपेष्टा दूर करणे हे फार दूरचे काम!