भीमाशंकर कठारे मराठी उद्यमशीलतेसाठी चार दशके!
‘उद्योजकता म्हणजे काय रे भाऊ?' अशी मानसिकता मराठी भाषिकांची पन्नासएक वर्षांपूर्वी होती. व्यापार-उदीम हे मराठी माणसाचे काम नाही, ते रक्तात असावे लागते अशी लोकधारणा पक्की होती. कित्येक मराठी पिढ्या शिक्षण, नोकरी, लग्न, संसार, परंपरा या पंचकडीत जगत राहिल्या. काळाप्रमाणे फार मोठा बदल घडून आला असे म्हणणे धारिष्ट्याचे ठरेल, पण मला डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे वाक्य आठवते. ते वाक्य मराठी माणसाला अगदी फीट बसते. “चांगल्या पगाराच्या नोकरीसाठी शिकत राहणे ही मानसिकता पालक आणि पाल्य यांच्यात जोपर्यंत आहे, तोपर्यंत नोकरच जन्माला येणार!''
नाही म्हटले तरी, बहुसंख्य मराठी मंडळी नोकरीपेशातील असल्याने त्यांची आर्थिक साक्षरता नोकरी, बदली, प्रमोशन, इन्क्रिमेंट, बोनस अशी मर्यादित दिसून येते. त्याउलट गुजराती, जैन, मारवाडी, पंजाबी, कच्छी लोकांची आर्थिक साक्षरता ‘बाजारपेठेशी लेनदेन’पर्यंत असते. म्हणून त्यांचे लोण देशभर पसरले आहे. आधुनिक युग हे आर्थिक आहे, वेगवान आहे. तेव्हा ते कसे- आपण कसे याचा विचार करत बसू नये. काळानुरूप बदलावे ना!