उदय टक्‍के - हायटेक फिंगर्स


ज्यांच्या केसालाही धक्का लागला तर सर्व महाराष्ट्रभर प्रतिक्रिया उमटेल अशा बाळासाहेब ठाकरे ह्यांचे केस तो कापू शकत होता! त्यासाठी त्यांची मर्जी संपादन करून, तो त्यांचा हेअर स्टायलिस्ट बनला. त्याचे नाव उदय टक्के. पण मित्रमंडळी त्याला म्हणतात बाबुराव.

उदय आमच्या ट्रेकिंग ग्रूपमधला मित्र. तो आमच्यासारखा साधासुधा होता, पण आता, तो एकदम हाय-टेक कुशल आणि यशस्वी व्यावसायिक झाला आहे. त्याने खूप मोठी भरारी घेतली आहे, पण स्वभावाने तो जुना बाबुरावच आहे!

त्याचे दूरदर्शनवर दर्शन सातत्याने होते, त्याच्याबद्दल सगळ्या पेपरांत लिहून येत असते. फोटो झळकत असतात, करिअर काऊन्सिलिंगच्या पुरवण्यांत तर तो, त्याच्या ‘उद्योगा’मध्ये असलेल्या प्रचंड संधींबद्दल वारंवार सांगत असतो. त्याला मातृभूमी प्रतिष्ठानचा ‘यशस्वी नवउद्योजक’ म्हणून पुरस्कार मिळाला, तेव्हा त्याचे कौतुक वाचून मी त्याला फोन केला. त्याच्या मुलाने फोन घेतला, कारण ‘साहेब’ जयपूरमध्ये स्टेजवर प्रात्याक्षिक दाखवण्यात व्यस्त होते! त्याचे भारतभर (बहुधा सरदार लोकांचा पंजाब प्रांत सोडून, अन्य सर्व राज्यांत) असे स्टेज शो, एक ते पाच दिवसांच्‍या कार्यशाळा, शिबीरे सातत्याने चालू असतात. मुंबईत त्याची सरकारमान्य अभ्यासक्रम शिकवणारी इन्स्टिट्यूट आहे. तिथे केस आणि त्वचा ह्याबद्दल सर्वकाही शिकवले जाते.

उदयची भेट घेण्यासाठी वेळ ठरवून, त्याच्या ठाण्याच्या ‘ब्यूटी सलोन’जवळ पोचले तेव्हा त्याची व्यवसाय पार्टनर धनश्री साठे मला घ्यायला खाली आली. धनश्री तिची अ‍ॅकेडमिक करिअर उत्तम असूनसुद्धा त्‍या व्यवसायात उतरली आहे. धनश्रीही बाबुराव आणि त्याची पत्‍नी हर्षदा टक्के ह्यांच्याप्रमाणे परदेशात ठिकठिकाणी जाऊन सौंदर्यशास्त्राच्या अनेक शाखांचा अभ्यासक्रम पूर्ण करून आली आहे.

उदयच्‍या ‘सलोन’मध्ये प्रवेश करताच डाव्या हाताची भिंत वर्तमानपत्रांतील त्याच्या संबंधीच्या कात्रणांनी आणि त्याच्या निरनिराळ्या फोटोंनी भरून गेलेली दिसते. सुसज्ज आणि स्वच्छ पार्लरमध्ये अनेक विद्यार्थी काम करत होते. क्लास चालू होता. बाबुरावची आणि माझी खूप वर्षांनी भेट झाली. त्याने सर्व विद्यार्थ्‍यांना ‘ही ट्रेकिंगवाली मैत्रीण’ अशी माझी ओळख करून दिली. त्‍याने त्‍यावेळी स्वत: केलेल्या मुंबई ते नेपाळ सायकल-प्रवासाबद्दल विद्यार्थ्‍यांना सांगितले. त्यांच्या सरांचा हा पैलू विद्यार्थ्‍यांना नव्याने कळला असावा!

इतक्या वर्षांनंतर, बाबुरावचा सदाहसरा चेहरा आणखी हसतमुख झाला आहे. त्याच्या व्यक्तिमत्त्वाला छान झळाळी आली आहे. तो कोणत्याही व्यक्तीचा मेकओव्हर (म्हणजे व्यक्तीचे दार्शनिक रूप पूर्णपणे बदलणे) करण्यात पटाईत झाला आहे. बाबुरावने स्वत:लाही छान बदलले आहे. देशविदेशात शिकताना त्याने सर्व उत्तम गोष्टी आत्मसात केल्या आहेत.

मी त्याच्यासोबत केबिनमध्ये शिरले तर तेथील भिंती प्रमाणपत्रांनी भरलेल्या होत्या. त्याच्या पदव्यांबद्दल जाणून घ्यायचे असेल तर उदय टक्के याची वेबसाईटच बघावी; सगळे कौतुक येथे नमुद करणे कठिण आहे. त्याची पत्‍नी हर्षदा त्याला ट्रेकिंगमध्ये भेटली. तो म्हणाला, ''ती ह्या सर्व कौशल्यांमध्ये माझ्यापेक्षा दोन पावले पुढेच आहे.''

हर्षदाचे त्याच्या व्यवसायात मोठे योगदान आहे. त्याची यात्रा खार, दादर आणि ठाणे अशा त्रिस्थळी, ठरावीक वेळी आणि ठरावीक दिवशी चालू असते. त्‍याचा दिवस प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि संध्याकाळपासून व्यवसाय असा व्यस्त असतो. आठवड्यात एक दिवस, तो पुण्याच्या अ‍ॅकेडमीत जातो. तो सुटी घेत नाही. त्‍याशिवाय दौरे आणि दुस-या राज्यांतून आलेल्या मंडळींना शिकवणे चालूच असते. मी तिथे गेले त्या दिवशी सदतीस माणसे जोधपूरहून आली होती. राजस्थानच्या लोकांनी आता फेटे बांधायचे सोडलेत, तेव्हा ह्या व्यवसायाला तिथे बरकत आली असावी. बाबुराव ह्या व्यावसायिकांची ‘तयारी’  करून घेणार!

आमच्या थोड्या गप्पा झाल्या आणि मग उदय शिकवण्याकडे वळला. एक मुलगी मॉडेल म्हणून आली होती. तो तिच्या लांब केसांचा कट करण्याचे प्रात्यक्षिक दाखवू लागला. उदयसारखी मंडळी केस कापण्यापूर्वी केवढा विचार करतात! ज्याचे केस कापायचे त्याची/तिची lifestyle काय आहे; स्वत:ला किती वेळ देऊ शकतात, जॉब profile, गालांची ठेवण, चेह-याचा आणि डोक्याचा आकार, केसांचा पोत, जात, जाडी, लांबी आणि नियोजित कट किंवा स्टाइलने येणारा ‘लूक’ ती/तो कशी कॅरी करू शकते/शकतो... बापरे बाप! केवढे प्रश्न! त्याने हे सगळे प्रश्न शिष्यगणाकडून हसतखेळत वातावरणात सोडवून घेतले आणि बोटे व कात्री कौशल्यपूर्ण रीत्या चालवत थोड्या वेळात त्या मुलीचे रूपडे बदलून टाकले. प्रत्येक व्यक्तीचे केस आणि नखे वाढणे ही नैसर्गिक गोष्ट आहे. पण व्यक्तीने त्यांची निगा राखणे आणि सजवणे वगैरेला महत्त्व आले आहे.

उदयचा जन्म केशकर्तनाचा व्यवसाय असलेल्या घरात झाला. पण तो पारंपरिक, चाकोरीबद्ध जीवनात अडकला नाही. त्‍याने काळाबरोबर बदलत सर्व आधुनिक तंत्रांचा आणि मंत्रांचा योग्य अवलंब केला. त्‍याने भारताबाहेर जाऊन, नामवंत संस्थांमध्ये शिक्षण आणि अनुभव घेतला. त्‍याआधारे त्याने व्यवसाय तर वाढवलाच, पण १९९६ साली ‘केस’ आणि ‘त्वचा’ ह्याबद्दल सर्व काही शिकवणारी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट स्थापन केली. आतापर्यंत एकंदर दोन हजारांच्या आसपास स्त्री-पुरुष तेथून प्रशिक्षित झाले आहेत. अनुभवी पार्लर-ओनरसुद्धा बदलत्‍या काळ आणि फॅशन यांसोबत अपडेट राहण्यासाठी, नवनवीन शिक्षण घेण्यासाठी तिथे येत असतात. उदयच्‍या इन्स्टिट्यूटमधून वर्षाला साधारण अडीचशे जण व्यावसायिक बनून बाहेर पडतात.

आठवडागणिक बदलणा-या फॅशनच्‍या जमान्‍यात त्‍या व्यवसायाला ग्लॅमर प्राप्‍त झाले आहे. जुन्या काळातले नट-नट्या (तेव्हा ग्लॅमरचा ठेका फक्त त्यांच्याकडे होता) जेवढ्या सजग नव्हत्या, त्यापेक्षा जास्त सजगता सर्वसाधारण तरुण-तरुणींत आली आहे. प्रत्येकाला त्‍याने ‘चांगले दिसावे’ हे गरजेचे वाटते. व्यक्तीच्या ज्ञानापेक्षा, गुणांपेक्षा, कौशल्यापेक्षा, ‘दिसण्याला’ इतके महत्त्व प्राप्‍त झाले आहे, की अशा सेवा देणा-या स्पा, सलोन, पार्लर, ब्युटी-सेंटर्स ही जीवनाचा अविभाज्य भाग बनत चालली आहेत. म्हणूनच, तिथे व्‍यवसायाच्‍या मोठ्या प्रमाणात संधी निर्माण झाल्या आहेत. त्‍या संधींचे सोने करण्याची इच्छा असणा-यांना योग्य ते शिक्षण आणि मार्गदर्शन देण्याचे काम टक्के दांपत्य आणि त्यांचे सहकारी करत आहेत.

उदय निघून गेला तरी मी तेथे रेंगाळत राहिले. विदयार्थी एकूण वातावरणाबद्दल भरभरून बोलत होते. त्यात गुरुपौर्णिमेचा उल्लेख झाला. म्हणून बाबुरावशी त्‍या रात्री फोनवर बोलले. तेव्हा तो म्हणाला, ‘अगं, मला त्या दिवशी हॉल घ्यावाच लागतो. तीनशेच्या आसपास लोक भेटण्यासाठी येतात. कृतज्ञता व्यक्त करतात.’ जोधपूरमध्ये त्याच्या व्यवसायबंधूंनी आणि विद्यार्थ्यांनी त्याची नाण्यांनी ‘तुला’  केली होती. केरळमध्ये त्याला डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. तिथे त्याला ‘कलाश्री’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

उदय टक्‍के हा महाराष्ट्राच्या सलोन आणि ब्युटी पार्लर्स असोसिएशनचा अध्यक्ष आहे. राष्ट्रीय पातळीवरच्या दोन संस्थांचा सदस्यही आहे. त्‍या संस्था सर्वत्र समान दर आणि दर्जा (स्वच्छता वगैरे) असावा म्हणून आग्रही असतात. त्‍या संघटित समाजाने मुंबईमध्ये उदय टक्केच्या नेतृत्वाखाली शाहरुख खानसारख्या बड्या प्रस्थाला नमवून, त्याच्या सिनेमाच्या नावातून ‘बार्बर’ हा शब्द काढून टाकायला भाग पाडले.

बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्‍यांनी उदयला बजावले होते, की ‘टक्के, ह्या क्षेत्रात आपला टक्का खूप वाढला पाहिजे.’ आमचा बाबुराव ती आज्ञा कसोशीने पाळत आहे. त्यासाठी कष्ट घेत आहे. खूप पुढे जाण्यासाठी आपले वर्चस्व स्थापण्याची त्याची महत्त्वाकांक्षा उदय नम्रपणे बोलून दाखवतो.

उदय टक्‍के - udaytakkes@gmail.com
 

- ज्योती शेट्ये

Last Updated On - 3rd April 2016
 

लेखी अभिप्राय

Masts.

अज्ञात03/04/2016

proud of u Sir ,feeling blessed as ur student

Deepali khandekar03/04/2016

Welldone sir

Ramesh Nanaware03/04/2016

उदयबद्दल बोलु तेवढं कमी आहे. Hats off

भरत बळवंत सुर्वे03/04/2016

Mast

Bhavesh Bidve03/04/2016

उदय टक्केंबद्दलचा हा लेख अतिशय मार्मिक आहे. तसेच नवोदित व्यावसायिकांसाठी मार्गदर्शनपर आहे. ज्योती शेट्ये यांचे लेखन कौशल्य वाखाणण्यजोगे आहे.

योजना विकास टक्के03/04/2016

Very nice

neminath patil 04/04/2016

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.