ओढ इतिहासाची!


ओढ इतिहासाची!

- अरूण निगुडकर

मी शाळेत असताना मला उपेंद्र गुरुनाथ मण्णूर नावाचे शिक्षक इतिहास विषय शिकवत. त्यांना अलेक्झांडर व इजिप्त यांत खूप रस होता. ते म्हणायचे, की अलेक्झांडर कधीच जगज्जेता नव्हता व पुरूने त्याचा पराभव केला होता. ते इजिप्तचे मनोरे व ममीज यांबद्दल असेच काहीबाही सांगत. आम्हा विद्यार्थ्यांना त्यांच्या अशा कथांबद्दल आकर्षण वाटे. आमचे दुसरे एक शिक्षक आम्हाला उलट सांगत, की 'मण्णूरसर सांगतात तो इतिहास नाही. त्यांच्याप्रमाणे तुम्ही पेपरात लिहाल तर तुम्हाला भोपळा मिळेल! पुस्तकात जसे लिहिलेय तसे लिहा. उगाच डोके चालवू नका.' मला त्यांचा राग येई.

अलेक्झांडर-पुरु यांचे युध्द ज्या ठिकाणी झाले व पुरूचे विजय मिळविला त्या काही रणभूमीचा नकाशापुढे, कॉलेजमध्ये मी इतिहास विषय घ्यायचे ठरवले व फॉर्म भरला. इतिहास विषय घेण्यास कॉलेजमध्ये अवघे दोन विद्यार्थी आले होते. त्यामुळे कॉलेजमध्ये मला विषय बदलण्याची पाळी आली. मी अर्थशास्त्र घेतले. परंतु माझी इतिहासाची आवड कायम राहिली.

माझी पहिली नोकरी महाराष्ट्र शासनाच्या प्रसिध्दी विभागातली. त्यावेळी पर्यटन हा प्रसिध्दी विभागाचा उपविभाग असल्याने मी अजंठा-वेरूळ असे प्रवास करत असे; प्रसिध्दी विभागातर्फे 15 ऑगस्ट, 26 जानेवारी असे विशेषांक, पुरवण्या काढण्यात मदतनीस म्हणून काम करत असे. त्यावेळी होमी तल्यारखान हे नगरविकास, पर्यटन, प्रसिध्दी, अल्पबचत खात्याचे मंत्री होते. त्यांचे दौरे असत. मी त्यांचा संपर्क मदतनीस व नंतर अधिकारी म्हणून काम करण्याची जबाबदारीही सांभाळत असे. त्यांच्या शिफारसीमुळे मी नंतर 'सिडको'मध्ये जनसंपर्क अधिकारी झालो.

जे.बी. डिसूझा हे त्यावेळी 'सिडको'चे मॅनेजिंग डायरेक्टर होते. नोकरीच्या काळात माझे जे फिरणे झाले त्यात मी वारंवार अजंठा-एलिफंटा-वेरूळ-औरंगाबाद अशा ठिकाणी जात असे. मी पर्यटकांना व शासकीय पाहुण्यांना दाखवण्यायोग्य स्थळांची अधिकाधिक माहिती गोळा करून नवे काही सांगण्याची वृत्ती माझ्यात जोपासत गेलो. मी माझा छंद व शासकीय जबाबदारी सेंट्रल लायब्ररी (टाऊन हॉल), मुंबई विद्यापीठ, शासकीय ग्रंथागार यांत कित्येत तास व दिवस बसून पार पाडू शकलो.

मला कधीकधी गंमत वाटते, की मण्णूरसर मला भेटले नसते तर माझ्यात इतिहास हा विषय जाणण्याची आवड निर्माण झाली असती का? माझी इतिहासात प्राध्यापक होण्याची इच्छा होती. परंतु मी सचिवालयात जी नोकरी केली ती प्रकाशने तयार करण्याची. म्हणजे एका परीने मी इतिहासाचे संकलन करत राहिलोच. आज माझ्याजवळ प्राचीन इतिहासासंबंधीची चारशे पुस्तके आहेत व नोंदी आहेत.

शासकीय नोकरीमुळे माझा एक फायदा झाला. परकीयांचा व स्वकीयांचा इतिहासासंबंधीचा ढोबळ दृष्टिकोन मला जवळून जाणता आला. परकीय पर्यटक अजंठयासारखे ठिकाण जाणून घेण्यासाठी जेवढा प्रयत्न करतात तेवढी सखोल दृष्टी भारतीय ठेवत नाहीत. भारतीयांना इतिहासात लिहिलेली सर्वच्या सर्व विधाने व नोंदी जशाच्या तशा ख-या वाटतात. शेकडो वर्षांमागे कुणी काही लिहिले असेल ते तसेच घडले, हे खरे कशावरून? असा विचारही करावयास भारतीय सहजासहजी तयार होत नाहीत.

मण्णूरसरांनी याच पारंपरिक अनास्थेकडे माझे लक्ष नेमके वेधले. पुरूने अलेक्झांडरचा पराभव केला असेल तर त्यावर इंग्रजीत भरपूर लिखाण असलेच पाहिजे हा विचार काही वर्षांपूर्वी परत माझ्या डोक्यात आला व त्यावर मी ज्या ज्या पुस्तकांतून असे लिखाण आढळले त्याच्या नोंदी व विचार करत राहिलो. पाश्चात्य इतिहासकार एक विशिष्ट दृष्टी समोर ठेवून भारताचा ‘इतिहास नाही’ इथपासून भारतीयांचा इतिहास आर्यांनी (म्हणजे परकीय पाश्चात्य) भारतीयांवर केलेल्या आक्रमणापासून सुरू होतो, भारताला पाश्चात्यांनी विज्ञान दिले. अलेक्झांडरमुळे ग्रीक शिल्पकला भारतात आली. मोगलांमुळे भारताला शास्त्रीय हिंदुस्थानी संगीताचा परिचय झाला वगैरे कितीतरी गैरसमज पाश्चात्यांनी आपल्या शिक्षणपध्दतीत घुसवले.

भारतीयांना स्वत:चा इतिहास आहे. भारतीय संस्कृती ही सर्वात प्राचीन विज्ञान-संस्कृती आहे. ती जातिनिष्ठ नसून व्यवसायावर आधारित आहे व हे व्यवसाय कुणीही कुठल्याही जाती-वंशांतील भारतीय लोक करू शकत. त्यामुळे ज्ञानोपासना हाच भारतीय प्राचीन संस्कृतीचा मानदंड ठरला आहे. प्राचीन भारतीय समाजव्यवस्थेमध्ये वाल्मिकी, व्यास, मनू, भृगू, विश्वामित्र हे वर्णाने ब्राह्मण नसलेले विद्वान ब्राह्मण वा ऋषी झाले होते, तर द्रोण हे ब्राह्मण वंशात जन्मलेले विद्वान क्षत्रिय म्हणून राजमान्य झाले. पुलस्य हा राक्षसवंशीय त्याच्या विद्याव्यासंगामुळे इंद्राकडून महर्षी म्हणून सन्मानित झाला. मुळात भारतीय समाजात जातपात सध्या जितकी अधोरेखित होते तेवढी पूर्वीच्या समाजव्यवस्थेमध्ये नव्हती. भरतमुनींनी सरस्वतीच्या काठी (शारदा विद्यापीठ) भारतीय संगीताचा पाया घातला. सप्त व पाच मिळून बारा स्वर व बावीस श्रुती शोधल्या. वीणा हे भारतीय वाद्य त्यावरून प्रचारात आले. भारतीय विज्ञानाधिष्ठित संस्कृतीचा काळ इसवी सनपूर्व नऊ हजार वर्षांइतका मागे गेला आहे.

ज्या गोष्टी सर्वमान्य झाल्या आहेत त्यांत अशा भारतीय संस्कृतीचा नव्याने शोध घेणारी साधने प्रचारात आली आहेत. डी.एन.ए., सीटी स्कॅन, रेडिऑलॉजी, एक्सरे, प्लॅनेटरी सॉफ्टवेअर, सिस्मोग्राफी, सी कार्बन 14, इमेजरी, मरीन आर्किऑलाजी अशा विज्ञान शाखा-उपशाखांचा नीट उपयोग करून घेता येतो हे सरस्वती या प्राचीन लुप्त नदीला हरयानातील कालायत येथे भारतीय शास्त्रज्ञांनी प्रगट व्हायला लावले आहे यावरुन सिध्द होते. भारतात इस्त्रो, बीएआरसी, ओएनजीसी, नीऑट, राजस्थान हरयाना वॉटर बोर्डस् जी उपकरणे वापरत आहेत त्यांचा उपयोग इतिहासाचे खरे उत्खनन व त्याचे धागेदोरे जुळवण्यात होत आहे या सर्वांचा उपयोग करून आम्ही आमच्या इतिहासाचे सर्वेक्षण केले पाहिजे. मी वर्तमानपत्रांतून अनेक विषय या दृष्टीने मांडले. त्यांत कैलास, अजंठा, सरस्वती, अंतराळातून इचित्रण, कारी रणभूमी, भूगर्भावरून इतिहासाचा शोध, ताज विज्ञान, मोगलांचे स्त्री सैनिक, भारतीय संगीत, पिरॅमिड्स, सिंध व सिंधू, आर्किओ- ऍस्टानॉमी, पुरूच्या युध्दभूमीचा शोध, अलेक्झांडर भारतातून का पळाला, ताजचे मानांकन राहील काय? नेपोलियन इत्यादी विषयांचा समावेश आहे. मी व्यवसाय वेगवेगळे करत गेलो, पण इतिहासाच्या वस्तुनिष्ठ अभ्यासाचा छंद सतत जोपासत गेलो. मला तोच माझा सतत जीवनाधार वाटत आला आहे. असा ध्यास, असे वेड जीवन अर्थपूर्ण करत असते.

मी अलिकडे अजंठयातील विज्ञान यावर एक सीडी तयार केली आहे. तिच्या मदतीने मी (पेनड्राइव्हचा उपयोग करून) तीस ते चाळीस मिनिटांचे भाषण (इंग्रजी वा मराठीत) देतो. मी पुरूविजय ही दुसरी सीडी तयार करण्यात सध्या गुंतलो आहे.

- अरूण निगुडकर

ई-मेल : arun.nigudkar@gmail.com

फोन : (022) 25212996

 

 

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.