श्रम, श्रमपरिहार आणि तुकोबाराय!


आचार्य अत्रे यांच्या विनोदाचे किस्से जसे प्रसिध्द आहेत, तसेच त्यांच्या मद्यपानाचेही! अर्थात अत्रे आणि अन्य मद्यपि यांच्यात फार मोठा फरक आहे, तो म्हणजे अत्र्यांनी आपले मद्यपान समाजापासून लपवून ठेवले नाही!

अत्रे ज्यांना फारसे माहीत नाहीत अशी माणसे त्यांच्या या वैगुण्याचा (?) टिकेसाठी वापर करतात. त्यांची तोंडे बंद करण्यातही अर्थ नसतो. कारण या टिकेमुळे अत्र्यांवरचे प्रेम कधीच कमी होणार नाही, किंबहुना महाराष्ट्रातल्या बहुसंख्य मराठी माणसांनी गुणदोषांसकट अत्रे स्वीकारले आहेत.

एका संध्याकाळी, अत्र्यांचे मित्र 'मराठया'च्या कार्यालयात आले. दोन स्नेही जमले. मद्यपान सुरु झाले. अत्र्यांना ग्लानी आली. ते टेबलापलीकडे एक्झिक्युटिव्ह चेअरमागे भिंतीच्या कडेला झोपले.

तेवढयात एक गृहस्थ सहकुटुंब सहपरिवार कोणालाही परवानगी न विचारता अत्र्यांच्या केबिनमध्ये घुसले. आत गेल्यावर अत्र्यांची खुर्ची दाखवून, ते आपल्या पत्नीला आणि मुलांना म्हणाले’ ''हीच ती खुर्ची! जिथे बसून अत्र्यांनी अवघा महाराष्ट्र पेटवला. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात अत्र्यांनी खूप परिश्रम घेतले. ते नसते तर संयुक्त महाराष्ट्र झालाच नसता. अत्रे कुठे आहेत?''

अत्र्यांचे मित्र गप्प बसले. त्यांना काय बोलावे ते सुचेना. तोच अत्रे खुर्चीमागून उठले आणि त्या गृहस्थांना म्हणाले, ''इथेच आहे, जरा झोपलो होतो. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात खूप श्रम झाले, त्यांचा थकवा अजून गेला नाही, म्हणून विश्रांती घेत होतो.''

त्या गृहस्थांनी सहकुटुंब आणि सहपरिवार नमस्कार करुन ते बाहेर पडले. अत्र्यांनी बाहेर कोणालाही न सोडण्याबद्दल तंबी दिली आणि पुन्हा झोपले. त्या गृहस्थांच्या बोलण्यातला संदर्भ पकडून त्याला साजेसे उत्तर देणे हे कुठल्या मद्यपि माणसाला जमेल का? म्हणजे मद्यपानाचा कितीही अतिरेक झाला तरी अत्र्यांनी मद्याची पकड बुध्दीवर येऊ दिली नाही.

अत्रे एकदा संतवाङ्मय परिषदेला गेले होते. परिषद नांदेड इथे होती. त्यांच्या बरोबर रणजित देसाई होते. अत्रे ज्या दिवशी परिसंवादात बोलणार होते. त्या दिवशी सकाळी सात-साडेसात वाजल्यापासून साहेबांनी आपला कार्यक्रम सुरू केला. तो कार्यक्रम दुपारी बारा-साडेबारापर्यंत चालला होता. अत्र्यांना डुलकी लागली. ते बसल्या जागीच झोपले. 'आज साहेब काही बोलणार नाहीत' असे वाटून रणजित देसांईनी संयोजकांना तसा निरोप पाठवायचे ठरवले, पण संपर्क होऊ शकला नाही. तास-दोन तासांनी, अत्र्यांना जाग आली. ते उठून आवरायला लागले. ते पाहून रणजित देसाई म्हणाले, ''साहेब! आजचे व्याख्यान राहू दे. मी निरोप देऊन येतो. तुमचे झोक जातायत. सकाळपासून खूप झाले.''

दोघे परिसंवादाच्या स्थळी येऊन पोचले, तेव्हा परिसंवाद सुरू झाला होता. एका वक्त्याचे व्याख्यान सुरु होते. ते झाल्यावर, सूत्रसंचालन करणा-यांनी घोषित केले की, '' आता महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार बोलतील.'' त्याबरोबर अत्रे एकदम उठून उभे राहिले आणि म्हणाले, ''आधी मी बोलणार आहे.'' दत्तो वामन पोतदार म्हणाले,'' हरकत नाही. आधी बाबुरावांना बोलू दे. मग मी बोलेन.''

व्यासपीठावर गेल्यावर अत्र्यांनी आपल्या वक्तृत्वाचा चमत्कार करून दाखवला. सलग तीन तास अत्रे फक्त 'तुकोबा' या एका विषयावर अस्खलित बोलले. अत्रे खाली बसल्यावर दत्तो वामन पोतदार व्यासपीठावर आले आणि म्हणाले, ''बाबुराव, तुकोबांवर एवढे बोललेत! माझ्याजवळ बोलण्यासारखे काहीही राहिलेले नाही.''

कार्यक्रम संपला. सगळयांसाठी कॉफीपानाची व्यवस्था करण्यात आली होती. पण तिकडे न जाता अत्र्यांनी रणजित देसांईना गाठले. म्हणाले,'' रणजित! चल, निघ इथून, लॉजवर जाऊन प्यायची आहे.''

रणजित देसाई अवाक होऊन पाहात राहिले, म्हणाले, 'अजून पिणार?'

रणजित देसाईच्या खांद्यावर हात ठेवून, त्यांना सभागृहातून बाहेर नेत अत्रे म्हणाले, ''सकाळपासून खूप झाली रे! पण या तीन तासांत तुकोबारायाने पार उतरवून टाकली.''

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.