अब्रुनुकसानीचीच फिर्याद पण गैरसमजातून!

अब्रुनुकसानीचीच फिर्याद पण गैरसमजातून!


फिर्यादी, खटले यांची मारामारी हा अत्र्यांच्या आयुष्यातला महत्त्वाचा भाग आहे. किंबहुना महाराष्ट्रातल्या कोर्ट केसेसचा इतिहास जर कोणी लिहायचा ठरवला तर तो इतिहाससुध्दा आचार्य अत्रे यांच्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकणार नाही.

'बाबूने वकील व्हावे! 'अशी अत्र्यांच्या वडिलांची, केशवराव अत्रे यांची इच्छा होती. अत्र्यांनी पदवी घेण्यापूर्वीच केशवराव अत्रे यांचे निधन झाले. वडिलांची इच्छा पूर्ण करायची म्हणून अत्रे, वकिलीच्या अभ्यासासाठी मुंबईला गेले. त्यांनी कायद्याच्या अभ्यासासाठी महाविद्यालयात प्रवेश घेतला. अत्र्यांनी शिक्षणाबरोबर अर्थार्जन करण्यासाठी शिक्षकाची नोकरी पकडली, पण अत्रे वकील होऊ शकले नाहीत. कायद्याच्या अभ्यासाची परीक्षा हुकली ती हुकलीच! पुढे अत्र्यांनाही वकील होण्यात रस राहिला नाही. ते पुण्यात परतले ते 'मास्तर' म्हणूनच. हासुध्दा अत्र्यांच्या आयुष्यातला विनोदच म्हणावा लागेल!

अत्रे वकील झाले नसले तरी आयुष्यभर कोर्टाशी संबंधित राहिले-कधी आरोपी म्हणून तर कधी फिर्यादी म्हणून. ते वकील झाले असते तर त्यांचा जो वेळ कोर्टात गेला असता तेवढाच त्यांचा वेळ  कोर्टात गेला, तो आरोपी अथवा फिर्यादी म्हणूनच.

या सर्व  खटल्यातला 'पिपल्स ओन' कंपनीचा खटला अत्र्यांच्या आयु्ष्यात वादळ निर्माण करून गेला. त्यात केवळ ते नव्हे तर त्यांचे चुलते दिनुकाकाही होते. अत्र्यांची अतिशय दैदिप्यमान कारकीर्द घडत आसतानाच हा
खटला संपूर्ण आयुष्याला ग्रहण लावतो की काय अशी भीती निर्माण झाली होती. याच खटल्यादरम्यान अत्र्यांना मद्यपानाचे व्यसन लागले.

जानेवारी 1940 मध्ये साप्ताहिक नवयुग सुरु झालं. आणि अत्र्यांच्या मागे खटल्यांचं सुत्र सुरु झालं. नवयुगच्या चौथ्या अंकापासूनच हे सत्र सुरु झालं. पहिला खटला दाखल झाला तोच अब्रुनुकसानीचा! आणि फिर्यांदी कोणी आंडूपांडू नव्हता, तर हा खटला दाखल केला होता तो मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री डॉ. नारायण भास्कर खरे यांनी आणि या लेखाची व्याप्ती होती पाच ते सहा ओळी.

डॉ. ना. भा. खरे अत्यंत सरळ आणि वृ्त्तीने साधे भोळे होते. त्यांचं राजकारण रोखठोक पध्दतीचं होतं. महात्मा गांधींनी मोठा धूर्त डाव टाकून खऱ्यांना मुख्यमंत्री राजिनामा द्यायला लवला. आपल्याला राजिनामा गांधीनीच द्यायला लावला ह्या गोष्टीनं डॉ.खऱ्यांच्या मनात पक्कं घर केलं. त्यामुळे त्यांचा गांधींवर प्रचंड राग होता. अशातच गांधींनी त्यांना पत्र पाठवून ''माझी तब्येत अलीकडे बिघडली असून, ती आपल्याकडून तपासून घ्यावी आणि आपल्याकडून औषधोपचार करुन घ्यावा अशी मला इच्छा झली आहे. तरी आपण माझी प्रकृति तपासायला कधी येता ते कळवावे.'' अशी विचारणा केली.

डॉ.खरे या पत्रांन अधिकच चिडले. त्यांना वाटलं हे पत्र आपली कुरापत काढण्यासाठीच गांधींनी पाठवलं आहे. त्यावर डॉ. खरे यांनी गांधींना उलट टपाली कळवून टाकलं की, ''तुमची प्रकृति प्रत्यक्ष येऊन तपासाण्याची काही आवश्यकता नाही. तुमची प्रकृति मी चांगलीच जाणतो. तुम्हाला एकाच औषधाची जरुरी आहे. आणि ते म्हणजे जमाल गोटा. तुम्हाला चांगला जमाल गोटा मिळाल्याशिवाय तुम्ही ताळयावर येणार नाही.

अत्रे त्यावेळी काँग्रेसमध्ये होते. त्यामुळे काँग्रेस राजकरणाचा पुरस्कार करणं हे नवयुगचं धोरण होतं. डॉ. खरे यांनी गांधींना पाठवलेल्या उत्तराची दखल घेणं क्रमप्राप्तच होतं. नवयुगच्या पहिल्या पानावर 'विनोदी टिपण' ह्यात ख-यांच्या पत्राला उद्देशून अत्र्यांनी लिहिलं 'दुसऱ्यांना जमाल गोटा देण्यापलीकडे डॉ. खरे ह्यांना वैद्यकी व्यवसायाचे फारसे ज्ञान नसावे.''

अत्र्यांनी हे अर्थातच गंमतीगमतीने लिहिलं होतं. डॉ खऱ्यांची बदनामी करण्याचा किंवा त्यांच्या भावना दुखवण्याचा कोणताही हेतू त्यात नव्हता. डॉ. खरे इतके त्यावेळी चिडलेले होते की अत्र्यांच्या विधानातली गंमत विचारात न घेता त्यांनी सरळ नागपूरच्या कोर्टात फिर्याद केली ती सुध्दा संचालक म्हणून चंदूलाल हिराचंद गांधी आणि सहसंपादक म्हणून पां. वा. गाडगीळ यांनाही त्यात गोवलं.

अत्र्यांनी आपलं वकिलपत्र ऍड. नानासाहेब देव यांना दिल. या खटल्याच्या कामासाठी नागपूरला गेलेले आसताना एक दिवस दुपारी अत्रे डॉ. खरे यांच्या घरी गेले. डॉ. खऱ्यांसाठी तो आश्चर्याचा धक्काच होता. कोणतीही कटूता मनात न ठेवता, डॉक्टरांनी अत्र्यांचं स्वागत केलं, त्यांना संत्र्याचा रस दिला, आणि अत्र्यांच्या घरी येण्याबद्दल वाटलेलं आश्चर्य बोलून दाखवलं कारण एखादा आरोपी फिर्यादीला भेटायला घरी जातो हे ते प्रथमच अनुभवत होते. दोघांच्या मोकळया वातावरणात गप्पा सुरु झाल्या.

अत्रे म्हणाले, ''अहो डॉक्टर, मी आपलं सहज गंमतीने ते लिहले होते, तुम्हाला एवढा राग येईल याची मला कल्पना नव्हती!''

यावर हसून डॉ. खरे म्हणाले, ''अहो, विनोद हा माझा आवडता रस आहे. तुमच्या एवढाच मी त्या रसाचा भोक्ता आहे. पण तुमच्या या विनोदामागे काही तरी राजकारण असावे असा मला संशय आला म्हणून मी तुमच्यावर फिर्याद केली''

''तसा तुम्हाला संशय येण्याचं कारण?'' अत्र्यांनी विचारलं. ''तुमच्या 'नवयुग' पत्राचे संचालक हे जे चंदुलाल गांधी आहेत ते कोण आहेत?''

''ते एक सोलापूरचे तरुण धनिक आहेत!''
''महात्मा गांधींशी त्यांचं काही नातं आहे.?''
''छे, छे, मुळीच नाही, नुसत्या नामसाहश्यापलीकडे त्यांचा काडी मात्र संबंध नाही.''
''असं म्हणता? मला वाटलं हा तुमचा चंदुलाल गांधी त्या महात्मा गांधींचा कोणी तरी नातेवाईक असावा, म्हणून त्यानी माझी खोडी काढली असावी! म्हणून इतक्या तातडीने मी ही तुमच्यावर फिर्याद केली''

डॉ. खऱ्यांनी खुलासा केल्यावर, उभयतांमध्ये समझोता झाला आणि पुढच्याच तारखेला 'आपापसात तडजोड झाल्यामुळे, खटला चालवण्याचे कारण उरलं नसल्याचं' डॉ. खरे यांनी कोर्टाला कळवून टाकलं केवळ 'गांधी' या आडनावावरुन गैरसमज झाल्यानं भरलेला खटला, तिथेच संपला.