अमेरिकेतील पब्लिक स्कूल्स


_America_Public_School.jpgभारतात जशा महापालिकेच्या शाळा असतात तशी अमेरिकेत पब्लिक स्कूल्स असतात, पण भारतातील महापालिकेच्या शाळा व अमेरिकेतील पब्लिक स्कूल्स यांमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. महापालिकेच्या शाळांत गरीब पालकांची मुले जातात, कारण त्यांना खाजगी शाळा परवडत नाहीत, पण अमेरिकेत श्रीमंत पालक त्यांच्या मुलांची नावे ते ज्या विभागात राहतात तेथील पब्लिक स्कूलमध्ये घालण्यासाठी धडपडत असतात. इतकेच नाही, तर चांगल्या पब्लिक स्कूलसाठी त्या भागात घरही घेतात.

मी माझ्या नातवंडांची शाळा पाहण्यास गेले होते. शाळेचा पहिला दिवस हा पालकांनी शिक्षकांशी ओळख करून घेण्याचा असतो. पहिली ते तिसरीचे पालक रांगेत शाळेने दिलेल्या वेळेनुसार शाळेच्या प्रवेशद्वाराबाहेर शिस्तीने उभे होते. प्रवेशद्वारामधून  आत गेल्यावर पहिली ते तिसरीच्या वर्गांचे फलक लावलेले दिसले. साधारणपणे वीस ते पंचवीस मुलांचा एक वर्ग, अशा आठ तुकड्या पहिली ते तिसरीच्या मुलांच्या होत्या. मुलांना त्यांच्या त्यांच्या वर्गांचे क्रमांक देण्यात आले होते. त्यानुसार पालक मुलांना त्यांच्या वर्गांत घेऊन चालले होते. आम्ही आमच्या वर्गाचा क्रमांक शोधत नातवाच्या वर्गात गेलो.

वर्गात बेंच एका ओळीत लावलेले नव्हते. आयताकृती टेबल आणि समोरासमोर चार खुर्च्या असे चार मुलांसाठी एक टेबल अशी रचना होती. प्रत्येक मुलाच्या खुर्चीवर मोठा खोका होता, त्यावर मुलाचे नाव लिहिलेले होते. खोक्यात मुलांसाठी वह्या, पेन्सिली, रबर अशा गोष्टी होत्या. बाजूला एका बाकड्यावर सात ते आठ प्लास्टिक टब होते. प्रत्येक मुलाने त्याच्या खोक्यातील सामान त्या त्या टबमध्ये ठेवायचे. उदाहरणार्थ - पेन्सिलींचा टब, रबरांचा टब, इत्यादी. वह्यांऐवजी तेथे फाईली व फोल्डर यांचा वापर केला जातो. ते सर्व साहित्य शाळेतच ठेवले जाते. त्यामुळे मुलाचे दप्तराचे ओझे कमी होते.

शिक्षिका विद्यार्थ्यांची व पालकांची ओळख हसतमुखाने करून घेत होती. शाळेत शिपाई नसतात, ती संकल्पनाच तेथे नाही. शिक्षक सर्व कामे करतात. शिक्षकच त्यांचा वर्ग मनापासून सजवतात. मजा म्हणजे इयत्ता पहिली ते पाचवीच्या मुलांना कोणत्याही विषयाचे पुस्तक नाही; पाठ्यपुस्तके नाहीत! पुस्तकांशिवाय शिकवतात कसे? आणि मुले अभ्यास कशी करणार? त्यातून मुलांची परीक्षा कधीही घेतली जाते. पालकांना ते माहीतही नसते. मी माझ्या मुलाला विचारले, ‘अरे, मुलांना पुस्तके नाहीत, ती वह्या घरी आणत नाहीत, मग शाळेत काय शिकवतात ते पालकांना कसे कळणार?’ तेव्हा त्याने मोबाईलवर वेबसाईट उघडून दाखवली. त्यावर शिक्षकाचे नाव-पत्ता-फोन नंबर-ईमेल अॅड्रेस होता. त्यावर शिक्षक मुलांना रोज जे शिकवणार ते पालकांना कळणार होते. तेथे पुस्तके शिक्षकांसाठी असतात, त्यातून ते अभ्यासक्रम तयार करतात आणि मुलांना शिकवतात. एखादे मूल एखाद्या विषयात मागे पडत असेल किंवा प्रगती चांगली असेल तर त्यांच्या पालकांना ईमेलद्वारे तशी माहिती मिळते. मुलाचा विषय कच्चा असेल, तर दुसरे शिक्षक त्याला तो विषय वेगळा शिकवतात व त्याची प्रगती सर्वांबरोबर होईल असे बघतात.

शिक्षकांप्रमाणे मुख्याध्यापकही प्रत्येक मुलाला नावाने ओळखतात. मुले शाळेत येण्याआधी शिक्षक व स्वतः मुख्याध्यापक शाळेच्या गेटवर मुलांचे स्वागत करण्यासाठी उभे राहतात. इयत्ता पाचवीची मुलेही स्वयंस्फूर्तीने शाळेसाठी कामे करतात. ती मुले शाळेच्या गेटपाशी रांगेत उभी असतात. पालकांची गाडी शाळेच्या गेटपाशी आली, की पाचवीची मुले गाडीचा दरवाजा उघडून लहान मुलांना बाहेर काढतात आणि मुलांना वर्गात जाण्यास मदत करतात. त्यामुळे पालकांचा वेळ वाचतो. काही वयस्कर स्त्री-पुरुषसुद्धा सकाळी लवकर येऊन स्वयंस्फूर्तीने शाळेसाठी कामे करतात. ते कधी हातात ‘स्टॉप’चा बोर्ड घेऊन रस्त्यावरील गाड्या थांबवतात व शाळेत चालत येणाऱ्या मुलांना रस्ता क्रॉस करण्यास मदत करतात.

_America_Public_School_1.jpgशाळांमध्ये एक नियम काटेकोर असतो. मधल्या सुट्टीत डबा वर्गात बसून खायचा नाही; शाळेच्या कँटिनमध्ये जाऊन खायचा. मुले कँटिनमधील पदार्थही खाऊ शकतात, पण त्यासाठी पालकांना आधी पैसे भरावे लागतात. मुलांना तेवढ्या पैशांचे कूपन मिळते. मुलांच्या हाती पैसे दिले जात नाहीत. कोणते पदार्थ कँटिनमध्ये मिळणार याचा तक्ता मुलांना महिनाभर आधीच दिला जातो. त्यामुळे मुले ज्या दिवशी त्यांच्या आवडीचा पदार्थ असेल त्या दिवशी कँटिनमध्ये जाऊन खाऊ शकतात. अशा प्रकारे कँटिनमध्ये नियोजनपूर्वक कामे केली जातात. मुलांनी शाळेमध्ये मस्ती केली, द्वाडपणा केला की मुलांना मार मिळत नाही किंवा शिक्षा त्यांना होत नाही. मुलांचा रिपोर्ट पालकांना वेळोवेळी मेलद्वारे कळवला जातो व पालकांना शाळेत भेटण्यास बोलावले जाते.

पालकांचाही शाळांमध्ये सहभाग असतो. पालक विविध स्पर्धांचे, छंदवर्गांचे आयोजन करतात. उदाहरणार्थ बुद्धिबळ, रोबोटिक्स, संगणक वर्ग, स्पेलिंगच्या स्पर्धा, इत्यादी. पालक एकत्र येऊन कधी शाळेच्या वेळेच्या एक तास आधी तर कधी शाळा सुटल्यानंतर असे वर्ग घेतात. बुद्धिबळाचा तास दर शुक्रवारी सकाळी शाळा सुरू होण्याआधी एक तास चालू असतो. पालक त्यांच्या मुलांना घेऊन सकाळी साडेसहाच्या आधी शाळेत येतात. दोन मुलांना समोरासमोर बसवून खेळ कसा खेळावा, खेळताना कसा विचार करावा याचे प्रशिक्षण दिले जाते. शाळांमधील पूर्वप्राथमिक ते दुसरीपर्यंतचे काही पालक शाळेत येऊन शिपायापासून कारकूनापर्यंतची सर्व कामे जबाबदारीने करतात. शाळेमध्ये ‘पीटीए’ म्हणजे ‘पॅरेण्ट्स-टीचर्स असोसिएशन’ असते. त्यांच्या बैठका होतात. त्यांत विविध कार्यक्रमांविषयी चर्चा होते. पालक स्वेच्छेने कोणते काम करण्यास तयार आहेत त्याची नोंद ठेवली जाते. उदाहरणार्थ - शाळेतील मैदानात छोटा बगीचा तयार करण्याचा झाल्यास मुले व पालक दिवस ठरवून सकाळी शाळेत येतात आणि झाडे लावण्याचे काम करतात. झाडांना रोज पाणी घालण्याचे काम वाटून घेतले जाते. शाळा सुटल्यावर ज्या पालकांनी जबाबदारी घेतली असेल ते पालक व पाल्य झाडांना पाणी घालतात. मुले व पालक भर थंडीतही शाळेसाठी कामे करतात. येथे नमूद करावेसे वाटते, की ज्या स्त्रिया नोकरी करत नाहीत त्या जबाबदारी घेतातच, पण ज्या स्त्रिया नोकरी करतात, त्यांच्या त्यांच्या नोकरी-उद्योगाच्या ठिकाणी मोठ्या पदांवर कामाला आहेत अशा स्त्रियाही शाळेसाठी जबाबदारीने, स्वेच्छेने कामे करतात. त्यामुळे मुलांनाही लहानपणापासून स्वेच्छेने व जबाबदारीने काम करण्याची सवय लागते. शाळेमध्ये आनंदमेळा असतो, तेव्हा वेगवेगळे खेळ ठेवले जातात. पालक त्यासाठीही वेळ देतात. काही पालक शाळेच्या वाचनालयात मदत करतात तर काही शाळेच्या विज्ञानजत्रेत परीक्षक म्हणून सहभागी होतात. अशा रीतीने पालक हा या शाळांतील महत्त्वाचा घटक असतो, कारण ते वेळात वेळ काढून शाळेच्या सर्व उपक्रमांत सहभागी होतात. ते त्यांचीही जबाबदारी मुलांची शाळा, त्यांचे शिक्षण ही आहे, या भावनेतून शाळेसाठी झटत असतात आणि दाखवून देतात, की देशाची प्रगती फक्त सरकारमुळे नाही तर देशातील कर्तव्यदक्ष नागरिकांमुळे होते.

- माधवी विचारे
(प्रेरक ललकारी, सप्टेंबर २०१८ वरून उद्धृत)

-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-

न्यू जर्सीचे डॉ. प्रकाश लोथे यांनी माधवी विचारे यांच्या लेखास दिलेली जोड

माधवी विचारे ह्यांचा ‘अमेरिकन पब्लिक स्कूल्स’ हा लेख छान आहे. त्यातील शेवटचे वाक्य अतिशय महत्त्वाचे आहे – ‘देशाची प्रगती सरकारमुळे होत नसून जबाबदार पालकांमुळे होते.’
माधवी लहान इयत्तांतील मुलांबद्दल लिहीत आहेत. अमेरिकेतील मिड्लस्कूल आणि हायस्कूलमधील शिक्षण तर फारच उत्कृष्ट प्रकारचे असते. संगीत व क्रीडा/खेळ यांवर खूप भर असतो. त्यामुळे मुलांची सर्वांगानी वाढ होते. जागतिक पातळीवरील खेळाडू हायस्कूलपासून तयार केले जातात. नेतृत्वाचे, वक्तृत्वाचे धडे नवव्या इयत्तेपासून देण्यात येतात.

मंदबुद्धी (अभ्यासात मागे असणाऱ्या) मुलांसाठी वेगळे वर्ग असतात. त्यांना मठ्ठ म्हणून कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर फेकून देण्यात येत नाही. शिक्षकांचे पगार खूप नसले, तरी त्यांना इतर सवलती व भत्ते असतात.

अर्थात, हे सगळे करायचे तर त्याला अर्थबल हवे. तो पैसा प्रॉपर्टी टॅक्सद्वारे वसूल केला जातो. आम्ही अमेरिकेत जे कर भरतो त्यांतील चाळीस टक्के पैसा शालेय खर्चासाठी असतो, पण नुसता पैसा ओतून प्रश्न सुटत नाहीत. तेथील सर्वसामान्य पालक शाळेच्या कारभारात लक्ष घालतात व स्वयंसेवक म्हणून हातभार लावतात. म्हणून चांगल्या गावांतील शाळाही उत्तम असतात. त्यामुळे त्या शहरांतील घरांच्या किंमतीही जास्त असतात.

इनर सिटीमधील शाळांतून मात्र जबाबदार पालकांचे सहकार्य नसल्याने पैसा असूनही शिक्षणाची दुर्दशा असते.

तेथील शिक्षणाचे वैशिष्ट्य असे, की त्यात वैयक्तिक प्रगतीवर भर दिला जातो. शिक्षणक्रम निरनिराळ्या बुद्धीच्या मुलांकरता ‘कस्टम मेड’ केला जातो. ‘पोपटपंची’ला स्थान नसते, पण त्याचबरोबर भारतातील शाळांसारखे मेहनतीला फार महत्त्व दिले जात नाही. कठोर शिक्षा तर अजिबात वर्ज्य आहे.

प्रसिद्ध सिने दिग्दर्शक श्री.एम. नाईट श्यामलम ह्यांनी फिलाडेल्फिया शहरातील पब्लिक स्कूल्सचा अभ्यास करून हेच दाखवले आहे, की अमेरिकेच्या उत्तम गावांतील शाळा जगात सर्वोत्तम आहेत, पण तेथून चार-पाच मैल दूर असलेल्या इनर सिटीतील शाळा मात्र दयनीय अवस्थेत आहेत. तेथील शाळा-कॉलेजांतून एण्टरप्रिन्यूअरशिपवर (Enterprenauership) फार जोर असल्याने जगातील नव्वद टक्के नवीन पेटंट्स अमेरिकन तरुण मिळवतात. ते अजून चीन, जपान व जर्मनी यांनाही जमलेले नाही.

- प्रकाश लोथे, prakashlothe@aol.com

लेखी अभिप्राय

अतिशय छान माहिती,अनुकरणीय आहे

किरण शेषराव साकोळे12/11/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.