लेखक-कवी घडवणारी वढू खुर्द शाळा


_Lekhak_Kavi_Ghadavanari_Shala_1.jpgआमची वढू खुर्दची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हणजे उपक्रमांचे माहेरघर. वढू खुर्द गाव पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यात आहे. शाळेत वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम नेहमी राबवले जातात. त्यातून मुलांचा सर्वांगीण विकास होण्यात मदत होत आहे. आमच्या शाळेत प्रामुख्याने साहित्यिक उपक्रम होतात, पण त्याबरोबर विद्यार्थ्यांना मनोरंजनात्मक अध्ययन पद्धती अनुभवता यावी यासाठी शाळेने नागपंचमीला मेहंदी, दहीहंडी, दिवाळीत पणत्या रंगवणे, आकाशदिवे बनवणे, परिसर सहल, गणेशोत्सव, भोंडला, स्नेहसंमेलन, बालआनंद मेळावा, झाडांची शाळा उपक्रम, परिसरात जाऊन अध्यापन, सापांविषयी प्रत्यक्ष साप दाखवून माहिती अशा प्रकारचे विविध व नाविन्यपूर्ण प्रयोग नेहमी केले. त्यामुळे शिक्षणप्रक्रिया आनंददायी होऊन मुलांना शाळेची गोडी लागली आहे. तसेच, विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढण्यास मदत झाली आहे.

आमच्या शाळेच्या विद्यार्थ्याचा साहित्यिक उपक्रम राज्यभर गाजला. त्यात सर्वप्रथम मुलांना वाचनाची गोडी लावली गेली. त्यासाठी येथील वाचनालयात पुस्तकांची संख्या वाढवण्यात आली आणि वाचनालय विद्यार्थी, पालक, शिक्षक व ग्रामस्थ यांसाठी खुले केले गेले. मुलांच्या प्रेरणा साहित्य मंडळाकडून पुस्तकांची देवघेव केली जाते.

विद्यार्थी वाचनालयातून पुस्तके घेऊन अवांतर वाचन करतात. तसेच, शिक्षक, पालक व ग्रामस्थ यांतून पस्तीस सदस्य वाचनालयाला मिळाले. वाचनालयाची पुस्तके वाढावी यासाठी पुस्तक भेट उपक्रम शाळेने सुरू केला. त्याखेरीज वाढदिवसाला पुस्तक भेट देणे सुरू झाल्याने वाचनालयात नवनवीन पुस्तकांची भर पडत गेली. शाळेत येणाऱ्या पाहुण्यांना व अधिकारी वर्गाला शाल, श्रीफळ न देता पुस्तक भेट दिले जाऊ लागल्याने शाळेची वेगळी ओळख निर्माण झाली.

शाळेत पुस्तकांबरोबर वर्तमानपत्रे, मासिके आणि विविध प्रकारचे दर्जेदार दिवाळी अंक मागवले; तसेच, वाचनात कमी पडणाऱ्या मुलांसाठी स्मार्ट रिडरची सोय करण्यात आली. त्यामुळे वाचनाच्या आनंददायी प्रक्रियेत त्यांनाही सहभाग घेता आला. पुढे, या उपक्रमाचे स्वरूप अधिक व्यापक होत गेले. शाळेत १५ ऑक्टोबर हा दिवस वाचनप्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येऊ लागला. यावेळी ग्रंथदिंडी व ग्रंथप्रदर्शन असे कार्यक्रम राबवण्यात आले. या कार्यक्रमास विद्यार्थी व पालक यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

_Lekhak_Kavi_Ghadavanari_Shala_2.jpgजागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने एप्रिलमध्ये सलग पाच तास अखंड वाचन घेण्यात येते. विद्यार्थ्यांना निसर्गात वाचनाचा आनंद मिळावा म्हणून येथील शिक्षणप्रेमी ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांना वाचनझोपडी तयार करून दिली आहे. विद्यार्थी उत्साहाने त्या वाचनझोपडीत वाचन करतात. वाचनझोपडीत पुस्तके ठेवली जातात. विद्यार्थी त्यांच्या आवडीप्रमाणे पुस्तक ग्रंथपालाकडून घेऊन त्याचे वाचन करतो. आमच्या शाळेला एकूण पंचेचाळीस साहित्यिकांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना लेखनाबाबत मार्गदर्शन केले आहे. त्यात उत्तम सदाकाळ, मनोहर परदेशी, प्रा.कुंडलिक कदम, लक्ष्मण सूर्यसेन, गणेश फरताळे, विश्वनाथ गोसावी, भरत दौंडकर, अस्मिता मराठे, अमोल कुंभार, संदिप गारकर अशा साहित्यिकांनी कथाकथन, काव्य संमेलन व इतर मार्गदर्शन केल्याने त्यातून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी स्वरचित कथा व कविता सादर करण्यास सुरुवात केली. त्यातूनच विद्यार्थ्यांचा ‘शिंपल्यातले मोती’ आणि ‘मनातल्या कविता’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. विद्यार्थी कवितेचे लेखन व त्याचे सादरीकरण उत्तमरीत्या करू लागले. पुण्यात ठिकठिकाणी होणाऱ्या काव्य संमेलनात विद्यार्थ्यांचे काव्यवाचन झाले.

शिक्षणा फाउंडेशन या संस्थेने विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण ओळखून हवेली तालुक्यात बालसाहित्य संमेलनाचे आयोजन केले. बालसाहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक फ.मु. शिंदे होते तर प्रमुख पाहुणे लेखक उत्तम सदाकाळ होते. त्यात विद्यार्थ्यांच्या काव्यस्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक वढू शाळेने मिळवला. उपशिक्षणाधिकारी सुमिळ कुऱ्हाडे यांनी एकदा शाळेला भेट दिली असता, त्यांनी गंमत म्हणून ‘फुलपाखरू’ या विषयावर विद्यार्थ्यांना कविता करण्यास सांगितले. विद्यार्थ्यांनी दहा मिनिटांत कविता तर केलीच, शिवाय तिचे सादरीकरणही केले. ते पाहून कुऱ्हाडे खुश झाले. त्यांनी त्यानंतर झालेल्या शिक्षक मेळाव्यात विद्यार्थी व शाळा यांचा उल्लेख आवर्जून करून जिल्ह्यातील बाललेखक व कवी घडवणारी शाळा म्हणून शाळेतील शिक्षकांचे अभिनंदन केले. ‘रोटरी क्लब ऑफ शिक्रापूर’ने प्रेरणा पुरस्कार देऊन या बालचमूचा सत्कार केला.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वढू खुर्द,
तालुका - हवेली, जिल्हा-पुणे ४२१२०८

- सचिन शिवाजी बेंडभर, sachin.bendbhar06@gmail.com

लेखी अभिप्राय

स्तुत्य उपक्रम. सातत्य मात्र हवे आहे. देशातील इतर शाळांसाठी प्रेरक.

नामदेव तेलोरे24/10/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.