मराठवाड्याची पहिली महार, मांग, वतनदार परिषद

प्रतिनिधी 29/12/2016

लातूर जिल्हा उस्मानाबाद जिल्ह्याचे १९८२ मध्ये विभाजन होऊन स्थापन झाला. सोलापूर जिल्ह्यातील जी गावे उस्मानाबाद जिल्ह्याला जोडण्यात आली, त्यांपैकी येडशी आणि कसबे-तडवळे ही दोनच मोठी होती. कसबे-तडवळे हे येडशी ते ढोकी या रस्त्यावरील गाव. त्या गावाची वस्ती १९४०-५० च्या काळात शंभर घरांची असेल. त्यात ब्राह्मण समाजाची घरे अधिक होती. तेथील श्रीरामाचे मंदिर पुरातन आणि परिसरात प्रख्यात असे आहे. त्यामानाने लहान अशा त्या गावात १९४१ साली हैदराबाद संस्थानाच्या ताब्यातील इलाख्यामधील महार, मांग आणि वतनदार परिषद झाली होती व त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वत: उपस्थित झाले होते. परिषदेच्या निमित्ताने, सोलापूर जिल्हा आणि मराठवाडा विभाग यांमधील दलित समाजाचे जणू पहिले अधिवेशनच घडून आले!

राजवट निजामी असल्याने महार, मांग आणि वतनदार परिषद तर घ्यायची पण त्याचबरोबर त्या राजवटीचे बाबासाहेब आंबेडकर आणि अन्य राष्ट्रीय नेते यांच्यावर जी भाषणबंदी घातलेली होती ती लक्षात घेता परिषद शक्यतो मुंबई आणि हैदराबाद राज्यांच्या सरहद्दीवर असलेल्या गावात घ्यायची असा हेतू संयोजकांचा होता. त्यासाठी कसबे-तडवळे  हे गाव मराठवाड्यातील जास्तीत जास्त लोकांना सोयीचे होते. परिषद तडवळ्याला घेण्याची सूचना हरिभाऊ तोरणे यांनी पुण्यात १९४० साली झालेल्या बैठकीत केली होती. तोरणे यांनी  कसबे- तडवळ्यांच्या शाळेत १९१४ ते १९२१ या काळात शिक्षक म्हणून काम केले होते. त्यामुळे त्यांना त्या भागातील कार्यकर्त्यांची जिद्द माहीत होती. त्याशिवाय त्या काळात ‘दलित शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन’चे अध्यक्ष आमदार जिवाप्पा ऐकाळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना समक्ष भेटून विनंती केल्यामुळे २२ आणि २३ फेब्रुवारी १९४१ रोजी पहिली महार, मांग आणि वतनदार परिषद आंग्लाई आणि मोगलाई यांसाठी घेण्याचे ठरले. २२ फेब्रुवारी रोजी उद्घाटन आणि २३ फेब्रुवारी रोजी खुले अधिवेशन असा कार्यक्रमही ठरला.

तडवळे गाव ते केवढे आणि त्यातील त्या काळातील दलितांची ताकद ती किती असणार? पण तेथील शाळेत शिक्षक असलेल्या भगवानराव भालेराव या तरुणाने त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या साहाय्याने अधिवेशन यशस्वी करण्याचा चंग बांधला. बाबासाहेबांसारखा मोठा आणि राष्ट्रीय पातळीवरचा नेता प्रथमच त्या भागात येणार असल्याने त्यांच्या स्वागतासाठी, जय्यत तयारीसाठी व याचा तपशीलवार आराखडा करण्याचे काम सुरू झाले. अधिवेशनाच्या दोन दिवसांच्या कालावधीत पैसे गोळा करण्याचे आणि खर्च वजा जाता उर्वरित रक्कम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना निधी म्हणून देण्याचे ठरले.

अधिवेशनाला लोकांनी तरी येण्यास पाहिजे त्यासाठी आधी जाहिराती छापण्याचे ठरले. त्यासाठी स्वागत समितीची स्थापना झाली. पंढरपूरच्या ‘अकबर प्रिंटिंग प्रेस’मधून प्रसार पत्रके छापली गेली. ती भगवानराव त्या परिसरातील गावात वाटण्यासाठी सर्व भागांत फिरू लागले. शिवाय, सांगोल्याच्या फिरत्या ‘जनता टॉकिज’च्या पडद्यावर स्लाईडद्वारे प्रसार केला गेला.

तडवळ्याचे वातावरण त्या काळात इतर गावांपेक्षा वेगळे होते. दलित समाजावर १९३७ आणि १९४५ अशा दोन वेळी वेगवेगळ्या कारणांनी बहिष्कार टाकण्यात आला होता. पण तशा परिस्थितीतही केशवराव देशपांडे यांच्यासारख्या ब्राह्मण शेतकऱ्याने इतरांचा विरोध न जुमानता दलित समाजाला सहकार्य केले. बाबासाहेब येणार आणि गावात एक दिवस मुक्काम करणार म्हटल्यावर लोकांनी स्वेच्छेने मदतीचा हात पुढे केला. त्यात श्रीमंत पाटील, मामा दडपे, शंकरराव निंबाळकर, गोपाळराव देशपांडे, केशवराव पाटील, ढवळे, गणेशलाल मारवाडी, बाबुराव देशपांडे आदींचा सहभाग होता.

गावाचे नाव जरी कसबे-तडवळे असले तरी रेल्वे स्टेशनचे नाव कळंबरोड स्टेशन आहे. अशा रेल्वे स्टेशन ते भीमनगर रस्त्यावर स्वागताच्या कमानी लावण्यात आल्या. बाबासाहेबांचा मुक्काम गावातील शाळेत ठरला होता. ठरल्याप्रमाणे बाबासाहेब रेल्वेने बार्शीमार्गे २२ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.०० वाजता तडवळ्याला आले. गावोगावच्या दलितांनी त्यांचे वाटेत सत्कार केल्याने रेल्वे उशिरा आली. गावात सुंदर झूल घालून सजवलेल्या एकावन्न बैलगाड्यांत ताफ्यासह हलगी, तुतारी यांच्या निनादाने त्यांची मिरवणूक काढण्यात आली. तिचे स्वागत सर्व जातींच्या प्रतिष्ठितांनी केले. आंबेडकरांनी भीमनगरमध्ये लोकांना मार्गदर्शन करताना जनतेला स्वत: खंबीर व्हा, शिक्षण घ्या, मला दुसऱ्या कोणी मारले असे सांगत येऊ नका, गावकी सोडा, मुले शाळेत घाला, पक्ष वाढवा असे आवाहन केले.

खुल्या अधिवेशनास हजारो दलित, मातंग समाजाचे कार्यकर्ते चालत किंवा मिळेल त्या वाहनाने आले होते. त्या अधिवेशनात निजामी हद्दीत राहणाऱ्या ‘अस्पृश्यां’च्या प्राथमिक शिक्षणाची सोय सरकारने तातडीने करावी, नवीन राज्यघटनेत निजाम हद्दीतील ‘अस्पृश्यां’ना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधीत्व मिळावे इत्यादी ठराव एकमताने संमत झाले. त्याच अधिवेशनात बाबासाहेबांनी गांधींचा ‘हरिजन सेवक संघ’, ‘कॉंग्रेस’ आणि गांधीजी हे मुस्लिमांची, राजेरजवाड्यांची मनधरणी करतील पण ‘अस्पृश्यां’च्याबाबत काहीही करणार नाहीत अशा कडवट शब्दांत टीकाही केली. खालसा मुलुखात आणि निजामशाहीत महारांची स्थिती जवळपास सारखीच आहे. वतनदार, महार यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटलेला नाही, त्यांच्या प्राथमिक शिक्षणाची सोय नाही, लाखो एकर सरकारी जमीन पडिक असून ती अस्पृश्यांना कसण्यासाठी मिळत नाही व लोक उपाशी राहतात. ही दु:खे सरकारच्या नजरेस आणण्यासाठी अस्पृश्यांनी संघटना करावी. हैदराबादच्या नवीन होणाऱ्या राज्यघटनेने त्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात योग्य ते प्रतिनिधीत्व मिळवण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी त्यांनी जरूर तेव्हा संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. अधिवेशन संपल्यावर ते बार्शीला गेले, तेथेही त्यांचा भव्य नागरी सत्कार झाला होता.

मराठवाड्यात निजामाची बंदी असतानाही त्याच्या सरहद्दीवरील एका छोट्या गावात ही पहिली परिषद झाली, तो काळ पाहता एवढे मोठे अधिवेशन यशस्वी झाले हे विलक्षण म्हणायला हवे!

लेखी अभिप्राय

NICE DR BABASAHEB AMBEDKAE

VAISHALI RAJU …25/01/2017

14 एप्रिल 1976 साली भटक्या विमुक्त लोकांना मिळालेली जमीन आज 40 वर्षा नंतर परत करण्या साठी थिंक महाराष्ट्र ने मदत करावी म्हणजे वर उल्लेख केलेली नोंद प्रत्यक्षात आमलात आली असे वाटेल नोंद : लाखो एकर सरकारी जमीन पडून आहे ती अस्पर्श लोकांना कासण्या साठी मिळत नाही

रामचंद्र जाधव 25/01/2017

it is very knowledgefull information .
Dr.Babasaheb Ambedkar is really a hero and legend of this India.
symbol of knowledge.

Er.Rahul Balaj…25/05/2017

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.