‘वाचू आंनदे’

प्रतिनिधी 01/07/2011

वाचक निव्वळ बघे नव्हेत!

वाचकसमूह, वाचकगट हे नवी मानसिक-सामाजिक-नैतिक ऊर्जाकेंद्रे बनू शकतात का? वाचक होणे म्हणजे त्या काळापुरते स्वत:भोवती कोष विणणे, इतरांपासून वेगळे होणे. असे होत असले तरीदेखील वाचक नुसतेच बघे नसतात. त्यांची साहित्यव्यवहारासंबंधी काहीएक भूमिका असते. दुर्दैवाने, त्यांना आजच्या घडीला साहित्यजगतात चालणा-या सा-या व्यवहारांशी जोडून घेतले जात नाही. हे व्यवहार सत्ताधारी, कंपुवादी अशा हितसंबंधींच्या जाळ्यात अडकले आहेत. वाचकांनी एकत्र येऊन, जात-पात-धर्म-वंश ह्यांच्या पलीकडे जाऊन निव्वळ ‘वाचक’ म्हणून त्यांचे समूह निर्माण होणे ही साहित्य आणि लोकशाही यांच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट ठरेल.’ प्रसिध्द साहित्यिक मिलिंद बोकील ह्यांची ही भूमिका.

बाजारीकरणाच्या विळख्यात अडकलेल्या साहित्य-संमेलन आणि इतर साहित्य-व्यवहारांपासून दूर ठेवल्या गेलेल्या वाचकांचे ‘प्रबोधन करताना’ त्यांनी ती मोकळेपणाने व्यक्त केली.
 

ठाण्यातील रेवती आणि वसंत गोगटे ह्यांच्या ‘वाचू आनंदे’ ह्या घरपोच पुस्तकसेवा देणा-या वाचनालयाच्या अकराव्या वर्षांतील पदार्पणानिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला साहित्यिक आणि समीक्षक संजय भास्कर जोशी ह्यांनी घेतलेल्या अभिनव प्रश्नमंजुषेची उपान्त्य आणि अंतिम फेरी झाली. गुणवंत वाचकांचा शोध आणि सन्मान करण्यासाठी घेतल्या गेलेल्या ह्या स्पर्धेत धनश्री केतकर, विनायक गोखले आणि भालचंद्र दाते हे पहिले तीन विजेते ठरले, तर मंगेश निमकर व चंद्रकात पाटकर उपविजेते ठरले. सर्व विजेत्यांना ‘वाचू आनंदे’ तर्फे रोख पारितोषिके प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आली.
 

स्पर्धेच्या सुरुवातीला, संजय भास्कर जोशी ह्यांनी पुस्तक कसे वाचावे ह्यासंबंधी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. ‘प्रत्येक पुस्तक कव्हर टू कव्हर, म्हणजे मुखपृष्ठ ते ब्लर्ब असे संपूर्ण वाचावे, वाचलेल्या पुस्तकाविषयी आपल्याला काय वाटले ते लिहावे आणि आवडलेल्या पुस्तकाची पोच त्या-त्या लेखकाला आवर्जून द्यावी. असे वाचन लेखक-वाचक, दोघांनाही समृध्द करते’ असे ते म्हणाले.
 

रेवती गोगटे ह्यांनी वाचनालयामुळे ‘विस्तारलेल्या त्यांच्या कुटुंबा’विषयी आनंद व्यक्त केला. वाचनालयाच्या पहिल्या वर्धापनदिनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या विद्या बाळ ह्या समारंभालादेखील हजर होत्या. कार्यक्रमाच्या शेवटी वसंत गोगटे ह्यांनी ह्या वाटचालीत मदत केलेल्या सर्वांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला. तसेच, पुस्तकांची घरपोच सेवा देणा-या वाचनालयाच्या कर्मचा-यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
 

वसंत व रेवती गोगटे या दांपत्याने ‘वाचू आनंदे’ हा उपक्रम सुरू केला तो एका प्राप्त परिस्थितीत. रेवती यांनी बँकेतून ‘व्हिआरएस’ घेतली होती. वसंत गोगटे क्रॉम्प्टनची डिलरशिप करायचे, त्यात मंदी आल्याने डिलिव्हरी करणा-या मुलांना काम नाही अशी स्थिती ओढवली. रेवती यांना स्वत:ला वाचनाची आवड. त्यांचा स्वत:चा पुस्तकसंग्रह घरात होता. त्यांनी त्या आधारे आरंभी दोन सभासद नोंदवून घरपोच पुस्तकांच्या लायब्ररीस सुरुवात केली. दरम्यान, मुलगा-मुलगी स्थिर होऊन नोकरी–जीवनमार्गाला लागल्याने, वसंत-रेवती यांनी लायब्ररीवर लक्ष केंद्रित करुन त्या सेवेत आधुनिकता, तत्परता आणली, ‘ऑन लाइन’ ग्रंथनोंदणी सुरू केली.
 

‘वाचू आनंदे’चे तीनशे सभासद आहेत. ते दरमहा दोनशे रुपये वर्गणी देतात. रेवती म्हणाल्या, की दहा वर्षांनंतर आता, या व्यवसायात स्थिरता येईल असे वाटते. मुख्य म्हणजे आमच्या डिलरशिपच्या आधीच्या व्यवसायातल्या मुलांना काम देऊ शकलो, त्यांना लोखंडातून पुस्तकांत आणले हा आनंद मोठा आहे.
 

त्यांचे निरीक्षण म्हणून त्यांनी सांगितले, की बहुतेक सभासद आम्ही पाठवू त्या पुस्तकांमधून वाचण्याच्या पुस्तकांची निवड करतात. दहा टक्के मात्र वर्तमानपत्रांतली परीक्षणे वगैरे पाहून खास पुस्तके मागवतात. त्यांची ireadindia.com ही वेबसाइट आहे.
 

संपर्क – रेवती-वसंत गोग़टे – (022)25862049, 9833138641, 9820038642

प्रतिनिधी – thinkm2010@gmail.com 

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.