चाकांवरील यश


भाग्यश्री सुनील दशपुत्रेज्या देशाचे बहुतेक रस्ते चालण्यासाठीसुद्धा सोयीचे नसतात, त्या आपल्या देशातल्या एका शहरात, एका मुलीने स्केटिंगमध्ये प्राविण्य मिळवायचंच असं ठरवलं! ती अकराएक वर्षांची असताना मे महिन्याच्या सुट्टीत कर्जतला गेली होती. तिथं तिच्या आत्याचं घर आहे. तिथं आयुष्यात प्रथमच तिनं स्केटस पाहिले. तिला ते पाहून नवल वाटलं आणि आकर्षणही वाटलं. तिनं त्या चाक लावलेल्या पट्टीवर चालायचा प्रयत्न केला आणि ती दाणकन पडली! तिला खूप राग आला पण तिनं चाकांकडे पाठ न फिरवता, मी ह्या चाकांवर चालून दाखवेनच असा ‘पण’ केला. खरोखरीच, ते अपयश हे तिच्या यशाची पहिली पायरी ठरलं.

रोलर स्केटिंग हा परदेशी लोकप्रिय असलेला खेळ आहे. भारतात तो हल्ली रुजू लागला आहे. तोही उच्चभ्रूंच्या वर्तुळात, महागड्या शिक्षणसंस्थांत वगैरे. आपला, सर्वसामान्य माणसांचा त्याच्याशी संबंध बर्फातलं स्केटिंग, सिनेमात आणि हिल स्टेशनला बघण्यापुरता.

रोलर स्केटिंग म्हणजे रस्त्यावर स्केट्स घालून फिरणं. त्याची साधनं, प्रशिक्षण, सगळंच महाग, पण बदलापूरच्या आदर्श कॉलेजमध्ये बारावी इयत्तेत शिकणार्‍या भाग्यश्री सुनील दशपुत्रे ह्या मुलीने ह्या क्रीडाप्रकारात भरभरून यश मिळवायला सुरूवात केली आहे.

अमॅच्युअर रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया या संस्थेच्या वतीनं औरंगाबाद इथं नुकत्याच पार पडलेल्या चौथ्या नॅशनल स्केटिंग चॅम्पियनशिप 2011 स्पर्धेत भाग्यश्रीनं स्केटिंगच्या ‘बिगिनर’ प्रकारात तीन सुवर्ण, ‘क्वॉड’ प्रकारात एक कांस्य आणि आठ प्रमाणपत्रं मिळवली आहेत!

तिनं बदलापूरच्या सूरज अॅकेडमीमध्ये प्रशिक्षण घेतलं आणि त्याच संस्थेचं प्रतिनिधीत्त्व करत तिनं पदकांची लूट केली! त्या संस्थेचे श्री. कौशिक व सौ. मनिषा गरेलिया हे तिचे मार्गदर्शक आणि मोलाची मदत करणारे गुरू आहेत. अॅकेडमी, घराजवळचा रस्ता, (फक्त उन्हाळ्यात), मंगलकार्याचे दोन हॉल ही भाग्यश्रीची सराव करण्याची ठिकाणं आहेत. ती रोज दोन तास तरी सराव करते.

हसतमुख पण कृशच म्हणावी अशी ही मुलगी कुठल्या खेळाची चॅम्पियन वगैरे असेल असं वाटत नाही. दीड-दोन किलो वजनाचे व्हिल-शूज, डोक्यावर हेडगार्ड, अंगात गुडघ्यापर्यंत फिट बसलेला ट्रॅकसूट, गुडघ्याला पार्म गार्ड, हाताला आर्म-गार्ड, संरक्षण स्टॉकिंग्ज एवढा सगळा सरंजाम सांभाळत, तोल सावरत स्केटिंग करताना तिला जगाचा विसर पडतो.

स्केटिंगच्या स्पर्धेत भाग घेतला की जिंकायचं एवढंच तिला माहीत आहे. तेराव्या वर्षांपासून स्केटिंग करणार्‍या भाग्यश्रीनं ठाणे, कल्याण-डोबिंवली, अंबरनाथ इथल्या सर्व स्पर्धांमध्ये सुवर्णपदकं मिळवली आहेत. स्केटिंगबरोबरच कराटे, तायक्वांडो, कबड्डी, खो-खो, रनिंग अशा अन्य स्पर्धांमध्ये तिनं भरपूर पदकं मिळवली आहेत. खेळाबरोबरच ती अभ्यासाकडेही लक्ष देते.

तिची खेळातच करिअर करायची इच्छा आहे, पण तशी परिस्थिती आणि पोषक वातावरणही नाही. गृहिणी असलेली आई आणि वाहनचालक बाबा ह्यांचा तिला पूर्ण पाठिंबा व आशीर्वाद आहेत. त्यांना तिचं कौतुक आहे, पण त्यांची ऐपत मुलीच्यासाठी भरपूर द्रव्य खर्चण्याची नाही. स्केटिंगमध्ये अधिक प्राविण्य मिळवण्यासाठी तिला साधारणत: पन्नास हजार रुपये किंमतीचे ‘इनलाईन स्केट्स’ घ्यायचे आहेत.

भाग्यश्री सुनील दशपुत्रे
09321757632
2/4, शर्वरी को.ऑ.हौ.सोसायटी, स्वामी विवेकानंद नगर, कुळगांव, बदलापूर (पूर्व), पिन कोड- 421503

- ज्योती शेट्ये

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.